चिखली (एकनाथ माळेकर) – जिल्ह्यात हवामान बदलामुळे विविध साथीचे आजार निर्माण झाले असून, खासगी तसेच सरकारी दवाखाने फुल्ल आहेत. त्यातच ग्रामीण भागात गोवरचे रुग्णदेखील आढळून येत आहे. शासकीय माहितीनुसार, जिल्ह्यात चार गोवर-रुबेलाचे रुग्ण आढळून आले आहेत. तथापि, कोरोना पसरण्याची शक्यता नाही, अशी माहिती वैद्यकीय सूत्राने दिली आहे.
उत्तरेत जोरदार शीतलहर आल्यामुळे बुलढाणा जिल्ह्याचे तापमान घसरलेले आहे. त्यामुळे सर्दी, खोकला, पडसे या साथीच्या आजाराने डोके वर काढलेले आहे. परंतु, त्यामुळे ग्रामस्थांनी घाबरून जाण्याची काहीही गरज नाही. कोरोनाचा नवीन व्हेरिएंट आला असला तरी, महाराष्ट्र त्याचे अद्याप पेशंट सापडलेले नाहीत. तसेच, बुलढाणा जिल्ह्यात कोरोना उद्रेकाची स्थिती नाही. तरीही, गेल्या काही दिवसांत गोवरचे काही रुग्ण आढळून येत आहेत. सद्या जिल्ह्यात गोवर-रूबेलाचे चिखली तालुक्यातील सातगाव भुसारी, मेहकर तालुक्यातील जानेफळ, नांदुरा तालुक्यातील धोलड येथे गोवरचे रुग्ण आढळले असून, शेगाव तालुक्यातील गायगाव येथे आढळलेला रुग्ण रुबेलाचे असल्याचे स्पष्ट झालेले आहे. वैद्यकीय उपचाराने हे आजार बरे होतात. तसेच, गोवर हा ग्रामीण भागात सतत होणारा आजार असून, त्याला घाबरण्याचे काहीच कारण नाही, अशी माहिती वैद्यकीय तज्ज्ञांनी दिली आहे.
जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. कोरोना कीटदेखील राज्य सरकारकडून प्राप्त झालेले आहेत. परंतु, तशी काहीच परिस्थिती नाही, अशी माहिती वैद्यकीय सूत्राने दिली आहे. तरीही आरोग्य यंत्रणा सज्ज असल्याचे हे सूत्र म्हणाले.
बुलडाणा जिल्ह्यात एकाच वेळी ९ जणांना स्क्रब टायफसची लागण झाली असल्याचेही निदर्शनास आले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात ६, शेगाव तालुक्यात २, आणि जळगाव तालुक्यात एका रुग्णाला या रोगाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. आफ्रिका येथील जंगलातील चिगरमाईट या कीटकाच्या चाव्यामुळे हा रोग होतो. त्यामुळे चिगरमाईट या कीटकांचा बुलढाणा जिल्ह्यात शिरकाव झाला की काय, अशी भीती सर्वांना वाटते आहे. या रूग्णापैकी ५ रुग्णांवर खामगाव शहरात उपचार सुरू आहे. तर गंभीर लक्षणे असलेल्या एका रुग्णाला अकोल्यात उपचार सुरू आहेत.
तीव्र ताप येणे, डोकेदुखी, संधे दुखी, थंडी वाजणे, मळमळ होणे, सुस्ती चढणे, शरीरात कंपण सुटणे, कोरडा खोकला, न्यूमोनियासदृश आजार, अंगावर चट्टे येणे, खाज सुटणे, जखम होऊन खिपल पकडणे आदी लक्षणे या आजाराची आहे.
जिल्ह्यात बेड, औषध पुरवठा सज्ज; अपर जिल्हाधिकारी यांची माहिती
देशात कोरोनाच्या चौथ्या लाटेची शक्यता पाहाता, जिल्हा प्रशासन सज्ज असून, रुग्णांना ऑक्सिजन, बेड, तसेच औषधीसाठा सज्ज ठेवण्यात आल्याची माहिती अपर जिल्हाधिकारी बुलढाणा यांनी दिलेली आहे. नागरिकांनी सोशल डिस्टन्सचे पालन करावे, कोरोना लसीकरणाचा बुस्टर डोस घ्यावा, गर्दी होऊ नये, याबाबत काळजी घ्यावी, असे आवाहनही अपर जिल्हाधिकारी यांनी केलेले आहे.
————-