आ. सौ. श्वेताताई महाले यांच्याकडे विद्याधर महाले यांच्यासारखी हॉटलाईन असल्याने त्यांच्याकडून करुन कामे करून घ्यावी – हवामानशास्त्र अभ्यासक पंजाबराव डख
चिखली (एकनाथ माळेकर) – चिखली विधानसभा मतदारसंघांमध्ये निवडून आलेल्या सौ.श्वेताताई महाले या कर्तव्यदक्ष आमदार तर आहेतच. सोबतच विकासाचा ध्यास घेऊन त्यांची वाटचाल सुरू आहे. चिखली विधानसभा मतदारसंघाचे भाग्य असे की सौ.श्वेताताई महाले यांचे पती हे उपमुख्यमंत्री यांचे खाजगी सचिव असल्याने त्यांना कामे करणे सोपे झालेले आहे. त्यामुळे चिखली विधानसभा मतदारसंघातील जनतेने विशेषतः लोकप्रतिनिधी यांनी आणि आता नवनिर्वाचित सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी आमदार सौ.श्वेता ताई महाले यांच्याजवळ विद्याधर महाले यांच्यासारखी हॉट लाइन असल्याने त्यांच्याकडून आपापल्या गावातील विकास कामांसाठी आग्रह धरून गावांचा विकास करण्याचे काम करण्याचे आवाहन प्रसिद्ध हवामान शास्त्र अभ्यासक पंजाबराव डख यांनी केले. ते आमदार श्वेताताई महाले पाटील यांच्या वतीने नवनिर्वाचित सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांच्या सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
आज (दि.२४) आमदार सौ. श्वेताताई महाले यांच्यावतीने चिखली विधानसभा मतदारसंघातील बुलढाणा आणि चिखली तालुक्यातील नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये जे सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य निवडून आले, त्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यास २८ पैकी तब्बल २५ गावांचे सरपंच, सदस्य हजर होते. याप्रसंगी डख यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत हवामानाविषयीदेखील माहिती दिली.
गावांच्या विकासाची संधी मिळाल्याने संधीचे सोने करा – आ. सौ. श्वेताताई महाले
गावातील जनतेने आपणास गावाच्या विकासासाठी निवडून दिलेले आहे. गावाच्या गरजेनुसार गावाचा सर्वांगीण विकास करण्याचे ध्येय ठेवून आपण गावाच्या विकासासाठी झटत राहिले पाहिजे. आपल्या जन्म आणि कर्मभूमीचे ऋण फेडण्याची उत्तम संधी जनतेने आपणास दिलेली आहे. आपले कार्यकर्तृत्व आणि कोणताही पक्ष, जात , धर्म असा अभिनिवेश न बाळगता आपण विकासात्मक वाटचालीतून आपल्या गावाला उत्तुंग शिखरावर नेण्याचे आवाहन आ. सौ. श्वेताताई महाले पाटील यांनी या नव निर्वाचित सरपंच व ग्राम पंचायत सदस्य यांच्या सत्कार सोहळ्यात बोलताना केले.
त्या पुढे म्हणाल्या की, काँग्रेसने निवडणुकीत दहशत फैलवण्याचे काम केले. झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेसने दादागिरी, गुंडा गर्दी करून दहशत माजविण्याचे काम केले. ते एवढ्यावरच थांबले नसून निवडणुकीच्या नंतरसुद्धा निवडून आलेल्या सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांचे फोटोंची बातमी लावून घेऊन अनेक सरपंच आमच्याच पक्षाचे निवडून आल्याचे देखावादेखील काँग्रेसच्या माजी आमदाराने करून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला असला तरी या सत्कार सोहळ्यासाठी २८ पैकी २५ गावातील नवनिर्वाचित सरपंच व ग्राम पंचायत सदस्य उपस्थित राहिल्याने काँगेसच्या दाव्यातील हवा काढून घेतली असून, माजी आमदाराने दिलेल्या पेड बातमीत केवळ फोटो आले तर मी घेतलेल्या सत्कार सोहळ्यात सर्व सरपंच आणि ग्राम पंचायत सदस्य स्वतः पक्ष, जात , धर्म विसरून विकासाच्या राजकारणासाठी उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचे जाहीर आभारदेखील आमदारांनी मानले. तसेच ग्रामपंचायत निवडणुकांमधून भाऊ भाऊ यांच्यामध्ये वितुष्ट निर्माण होते. प्रेमाचे , रक्ताचे नाते खराब होते, गावातील राजकारण हे खुटावरून जातीवरून, धर्मावरून केल्या जाते , त्यासाठी एकमेकांमध्ये हेवे दावे निर्माण होऊन जवळच्या नात्यात दुरावा निर्माण होतो, म्हणून माणसातील जिव्हाळ्याचे नाते टिकावे वैर भाव वाढू नये, यासाठी मी ग्रामपंचायतच्या निवडणुका अविरोध करण्याचे आवाहन केले होते. आता निवडणुका संपलेल्या आहेत आता सर्वांनी मनात असलेला द्वेष , वैर भाव हा संपायला पाहिजे, त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन गावाच्या विकासासाठी झटले पाहिजे, असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.
माजी आमदाराच्या व्हिडिओ क्लिपची उडविली खिल्ली
उदयनगर निवडणुकीमध्ये कोणत्याही पक्षाचे पॅनल नव्हते. पक्ष विरहित निवडणुका झालेल्या असतानाही माजी आमदाराने उदयनगरच्या निवडणुकीमध्ये विजयावर जी मुजोरी जो उन्माद व्यक्त केला, त्यामध्ये काँग्रेसची संस्कृती किती मुजोर, दादागिरी व गुंडागर्दीची आहे हे दिसून येत असून, भारतीय जनता पार्टी सद्यस्थितीमध्ये गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्तेत असतानाही कोणत्याही कार्यकर्त्यांनी आतापर्यंत माज दाखवला नाही. आलेली सत्ता ही जनसेवेसाठी वापरण्याचा प्रत्येक कार्यकर्ता व नेता प्रयत्न करत असून, काँग्रेसची संस्कृती मुजोर संस्कृती असल्याचा घनाघाती टोला आ. श्वेताताई महाले यांनी हाणला.
जलजीवन मिशनमधून होणारे काम चांगल्या प्रकारे करुन घेण्याचे विद्याधर महाले यांचे आवाहन
निवडून आलेल्या सदस्यांपैकी महिला सदस्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी प्रत्येक महिलेच्या डोक्यावरचा हंडा उतरवण्यासाठी जलजीवन मिशन अंतर्गत प्रत्येक गावाला शुद्ध नळाचे पाणी मिळण्याचा ध्यास ठेवलेला आहे. आमदार श्वेताताई महाले यांच्या माध्यमातून प्रत्येक गावामध्ये जनजीवन मिशन अंतर्गत योजना मंजूर झालेल्या आहे. सदर योजनेतील कामे अतिशय चांगल्या दर्जाची व्हावी, यासाठी महिला सदस्यांनी जातीने लक्ष जेणेकरून प्रत्येक मायबहिणीच्या डोक्यावर हंडा उतरवण्याचे कामात आपलासुद्धा खारीचा वाटा उचलण्याचे आवाहन विद्याधर महाले यांनी यावेळी करुन, ज्याप्रमाणे प्रत्येक घराला शुद्ध पाणी देण्याची नियोजन आमदार सौ श्वेताताई महाले यांनी केले, त्याचप्रमाणे प्रत्येक शेताला रस्ता हे ध्येयसुद्धा त्यांनी ठेवलेले आहे. येत्या काही दिवसातच आमदार सौ श्वेताताई महाले यांच्या माध्यमातून प्रत्येक शेतकर्याच्या शेताची वाट दुरुस्त करून देऊन समृद्धीची नवीन पहाट त्यांच्या माध्यमातून उगवणार असल्याचे प्रतिपादनदेखील यावेळी आ. सौ. श्वेताताई महाले यांचे पती तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खाजगी सचिव विद्याधर महाले यांनी यावेळी केले.
आ. सौ. श्वेताताई महाले यांनी एकट्या चिखली शहरासाठी १२२ कोटी रुपयांचा निधी खेचून आणला – डॉ प्रतापसिंह राजपूत
आमदार सौ. श्वेताताई महाले आमदार झाल्यानंतर आणि राज्यांमध्ये शिवशाही सरकार आल्यानंतर चिखली शहरासाठी आमदार सौ. श्वेताताई महाले यांचे विशेष प्रयत्नाने १२२ कोटी रुपयांचा निधी खेचून आणला आहे. येत्या काही दिवसातच चिखलीचा काया पालट झालेला आपल्याला दिसेल तसेच माजी आमदार यांनी त्या सरपंचाची यादी प्रसिद्ध करावी. काँग्रेसचे माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी २४ सरपंच निवडून आणण्याचा दावा केला आहे, त्या सरपंचाच्या नावाच्या यादीसह त्यांची नावे जाहीर करण्याचे आवाहनदेखील जिल्हा उपाध्यक्ष डॉ प्रतापसिंह राजपूत यांनी यावेळी केले.
पांढरदेवचे चेतन म्हस्के हे सर्वात कमी वयाचे सरपंच म्हणून विशेष सत्कार
पांढरदेव तेथील नवनिर्वाचित सरपंच हे सर्वात कमी वयाचे सरपंच म्हणून निवडून आलेले आहेत. त्यांचा विशेष सत्कार आ. सौ. श्वेताताई महाले यांच्या हस्ते करण्यात आला. विशेष म्हणजे, याबाबतची सविस्तर बातमी ब्रेकिंग महाराष्ट्रने प्रकाशित करून राज्याचे लक्ष वेधले होते.
अविरोध झालेल्या ग्रामपंचायतींना ५१ लाखाचा प्रतिकात्मक धनादेश
ग्रामपंचायत अविरोध करा ५१ लाखाचा निधी मिळवा, असे आवाहन आ. सौ. श्वेताताई महाले पाटील यांनी ग्रामपंचायतच्या निवडणुकी दरम्यान केले होते. त्यांच्या आवाहनानुसार ज्या ग्रामपंचायती अविरोध झाल्या, त्यांना प्रतिकात्मक स्वरूपात ५१ लाखाचा धनादेश देण्यात आला. त्यामध्ये मुंगसरी, सावंगीगवळी, ढालसावंगी, गट ग्राम पंचायत करतवाडी-घान – मानमोडच्या नवनिर्वाचित सरपंच यांना प्रतिकात्मक धनादेश देण्यात आला. अविरोध झालेल्या ग्रामपंचायतीना आमदार निधी, २५१५ आणि इतर विविध शासकीय योजनामधून मिळणार्या योजनेचा मिळणार्या निधीमधून इतर गावांच्या तुलनेत जास्त निधू तरतूद करुन अतिरिक्त ५१ लक्ष रुपये निधू उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच या ५१ लाखाच्या निधितून कोणकोणती कामे प्राधान्याने घ्यायची याची यादीसुद्धा देण्याचे आवाहन करण्यात आले.
भास्करराव आढळकर यांचा काँग्रेसमधून भाजपात जाहीर प्रवेश
या सत्कार सोहळ्यात काँग्रेसचे पदाधिकारी भास्करराव आढळकर यांनी आ. सौ. श्वेताताई महाले यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काँग्रेसमधून भाजपात जाहीर प्रवेश केला. त्यांचा आ. सौ. श्वेताताई महाले यांनी सत्कार केला.
नवनिर्वाचित सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य यांचा भगवा फेटा बांधून व सन्मानपत्र देऊन सत्कार
चिखली विधानसभा मतदारसंघातील चिखली आणि बुलढाणा तालुक्यातील झालेल्या ग्रामपंचायतीचे निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या उपस्थित असलेल्या सर्व स्त्री, पुरुष सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांचे भगवा फेटा बांधून सत्कार करण्यात आला. तसेच सर्व सदस्य सरपंचांना सन्मानपत्र सुद्धा देण्यात आले. पाटोदा सरपंच प्रदीप सोळंकी, कव्हळा सरपंच रवी डाळिंबकर, रानअंत्री सरपंच तात्याराव लहाने, करतवाडी सरपंच शारदाताई म्हळसणे, पेनसावंगी सरपंच सविताताई शेजोळ, भोकर सरपंच गजानन फो, पांढरदेव सरपंच चेतन म्हस्के, भानखेड सरपंच उमाताई गायकवाड, ईरला सरपंच मोहन खंडागळे, चिखला सरपंच डॉक्टर पराग वाघ, किन्ही सवडत, सरपंच आकाश बांडे, पिंपरखेड सरपंच शिवदास कांबळे, डासाळा सरपंच विजय मोरखेडे, मोहदरी सरपंच बाळू राठोड, सातगाव भुसारी सरपंच वनिताताई देशमुख, बोरगाव वसू सरपंच अनिताताई माने, मुंगसरी सरपंच योगिताताई पवार, महिमल सरपंच पार्वती खंबायतकर, वरखेड सरपंच विनोद भाऊ कणखर, आंधई सरपंच हेमलता वीरशीद, धोडप सरपंच प्रदीप भाऊ कोल्हे, कोनड खुर्द सरपंच चंद्रकला जावळे, मनुबाई सरपंच अरुणा केदार, बेराळा सरपंच चंद्रकलाबाई सुरडकर, मिसाळवाडीचे युवा नेते हनुमान मिाळ आदी गावाचे सरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती.
चिखली येथील भूमिपुत्र डॉ.मनीष पाटील यांची अवंतिका कृषी विद्यापीठ मध्यप्रदेश येथे कुलसचिव म्हणुन नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा आ. सौ. श्वेताताई महाले पाटील यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. सर्व प्रथम मान्यवरांच्याहस्ते भारत माता, संत गाडगे महाराज, संत तुकडोजी महाराज आणि दीपप्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. आ. सौ. श्वेताताई महाले पाटील यांच्या संकल्पनेतून नवनिर्वाचित सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य यांचा सत्कार आयोजित करण्यात आला असल्याने मंचावर उपस्थित कोणत्याही मान्यवरांचा सत्कार करण्यात आला नाही. त्यांचा सत्कार शब्दसुमनांनी करण्यात आला. कारण आजचे सत्कारमूर्ती हे नव निर्वाचित सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य असल्याने मान्यवरांच्याहस्ते निवडून आलेल्या सत्कारमूर्तींचा सत्कार करण्यात आला.
यावेळी अॅड. विजय कोठारी, देविदास जाधव पाटील, मुक्तारसिंग पठाण, श्रीरंग अण्णा इंडोले, विकास नाना डाळींबकर, डॉ राजेंद्र वाघ, पंडित दादा देशमुख, प्रशांत ढोरे, डॉ गणेशराव कोल्हे, भारतभाऊ शेळके, सुनंदा शिनगारे, हनुमान मिसाळ, अनिल काकडे, संतोष भगत, सौ. व्दारका भोसले, सौ. नीताताई सोळंकी , सौ अर्चनाताई खबुतरे, भास्करराव राऊत, सुनील पोफळे, संतोष काळे, प्राध्यापक वीरेंद्र वानखेडे, बळीराम काळे, डॉक्टर शंकरराव तरमले, सौ. सिंधुताई तायडे, सौ सुनीताताई भालेराव, अशोक पाटील, सलीम परवेज, सुनील पडघान, अंबादास घाडगे पाटील, आशाताई घाडगे, सौ वंदनाताई वाघ, आदींसह भाजपचे पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.