तळेगावच्या सत्याग्रही घाटात एकाचवेळी दोन बिबट मृतावस्थेत मिळाल्याने वनविभागाला हादरा!
वर्धा (प्रकाश कथले) – अमरावती -नागपूर दरम्यानच्या महामार्गावर तळेगावच्या सत्याग्रही घाटात एकाचवेळी दोन बिबट मृतावस्थेत मिळाल्याने वनविभागही हादरला आहे. यातील एका बिबटाचा मृत्यू वाहनाच्या धडकेत झाल्याचा अंदाज आहे तर दुसर्या बिबटाचा मृतदेह महामार्गावरील वळणरस्त्याजवळच्या खोल खड्ड्यात कुजलेल्या अवस्थेत मिळाला. या घटनेने घाटातील जंगलातल्या वन्यजिवांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. भरधाव वाहने गुळगुळीत महामार्गाने धावतात. त्या परिसरात येथे वन्यजिवांचा वावर असल्याचा साधा फलकही लावला गेला नाही.
मरण पावलेला एक बिबट नर जातीचा होता. त्याचा मृत्यू तीन दिवसांपूर्वी झाल्याचा अंदाज पशुवैद्यकीय अधिकार्यांनी व्यक्त केला आहे. त्याचा मृतदेह कुजला होता.तो नर जातीचा होता. दुसर्या बिबट्यासोबत झालेल्या झुंजीत जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केला गेला आहे. दुसर्या बिबट्याचे वय सुमारे एक ते दोन वर्षाचे असावे. महामार्ग ओलांडताना त्याला कोठल्याही वाहनाने जोरात धडक दिली. तळेगाव वनपरिक्षेत्रातील सहवनक्षेत्र तळेगाव नियतक्षेत्रातील संरक्षित वनात या बिबट्यांचा वावर होता.
सकाळी साडेसहा वाजताच एक बिबट महामार्गावर मृतावस्थेत पडून असल्याची माहिती वनविभागाला मिळाली. त्यानंतर वनपरिक्षेत्राधिकारी, वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार कार्यवाही सुरु असतानाच आजूबाजूच्या जंगलक्षेत्राची पाहणी करीत असतांना कक्ष क्रमांक ५६च्या संरक्षित वनातील नाल्याजवळ आणखी एका बिबट्याचा कुजलेला मृतदेह मिळाला.
या घटनेची माहिती उपवनसंरक्षक, मानद वन्यजीव रक्षकांना देण्यात आली. मृत बिबट्यांचे शवविच्छेदन कारंजाचे पशुधन विकास अधिकारी डॉ.व्ही.बी.मडावी, साहूरचे डॉ.राहुल नानोटकर, आष्टीच्या डॉ.सोनाली कांबळे, सुरेश मांजरे यांनी केले. सहायक वनसंरक्षक जी.पी.बोबडे व मानद वन्यजीव रक्षक कौशल मिश्र यांच्या उपस्थितीत दोन्ही मृत बिबट्यांचे शवविच्छेदन करण्यात आले. मृत बिबट्याच्या शरीरातील सर्व अवयव सुरक्षित होते.