शेंदूरजन, ता. सिंदखेडराजा (राहुल साबळे) – बेमोसमी पाऊस, अतिवृष्टी, रोगराई, जनावरांचा उच्छाद यामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान होते. या नुकसानीची भरपाई मिळावी म्हणून केंद्र सरकारने पंतप्रधान पीकविमा योजना सुरू केलेली आहे. सिंदखेडराजा तालुक्यातील बहुतांश शेतकर्यांनी पीकविमा काढलेला आहे. मागील अतिवृष्टीत शेतकर्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यापोटी बहुतांश शेतकर्यांनी अर्ज करूनही त्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही. तसेच, ज्यांना मिळाली ती अतिशय तुटपुंजी आहे. याबाबत नुकसानग्रस्त शेतकरी पीकविमा कंपनीच्या तालुका प्रतिनिधीला शोधत आहेत, परंतु हा बहाद्दर अजिबात सापडत नाही. शेतकरी कृषी विभागात चकरा मारतात. तर तेथील कृषी सहाय्यक तालुका प्रतिनिधीचा नंबर देतात. परंतु, हा बहाद्दर फोनही उचलत नाही. त्यामुळे शेतकर्यांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. पीकविमाप्रश्नी स्वाभिमानी शेतकरी संघटना चिखली, बुलढाण्यात आक्रमक भूमिका घेत असताना सिंदखेडराजा तालुक्याचे पदाधिकारी याप्रश्नी शांत का आहेत, त्यांना शेतकर्यांची ही लूट दिसत नाही का, असा प्रश्नही शेतकरी उपस्थित करत आहेत.
सिंदखेडराजा तालुक्यात अतिवृष्टी, पावसाने मोठ्या प्रमाणात सोयाबीनसह इतर पिकांचे नुकसान झालेले आहे. याबाबतच्या तक्रारी शेतकर्यांनी ऑनलाईन दाखल केल्या आहेत. तसेच, कंपनीकडे अर्जही दिलेले आहेत. परंतु, शेतकर्यांना अतिशय तुटपुंजी नुकसान भरपाई मिळाली, तर काही शेतकर्यांना तीदेखील मिळालेली नाही. त्यामुळे अनेक नुकसानग्रस्त शेतकरी अर्ज घेऊन कृषी विभागाच्या कार्यालयाचे उंबरठे झिजवत आहेत. ४० ते ५० किलोमीटरचा प्रवास करून आलेल्या या शेतकर्यांना कृषी विभागाच्या कार्यालयात उडवाउडवीची उत्तरे मिळतात. पीक विमा कंपनीच्या तालुका प्रतिनिधीला बोला, हा त्याचा नंबर आहे, असे सांगून कंपनीच्या तालुका प्रतिनिधीचा नंबर दिला जातो. त्या नंबरवर फोन केला तर तो बहाद्दर फोनच उचलत नाही, किंवा फोन बंद करून टाकतो. त्यामुळे शेतकरी तीव्र संताप व्यक्त करत आहेत. ऐनकेन त्याने फोन उचललाच तर, मी येतो येतो, असे तो सांगतो. परंतु, कृषी कार्यालयाकडे येतच नाही. शेवटी वाट पाहून शेतकरी आल्या पावली माघारी जात आहेत. दरेगाव येथील एका शेतकर्यासोबत स्वतः ब्रेकिंग महाराष्ट्र प्रतिनिधीने हा अनुभव घेतला आहे. त्यामुळे शेतकर्यांच्या तक्रारी ऐकून घेऊन त्यांना दिलासा देण्यासाठी तालुका कृषी अधिकारी यांनी स्वतः पुढाकार घ्यावा, अशी मागणी शेतकरी करत आहेत.
सिंदखेडराजा तालुक्यातील शेतकर्यांना पीकविमा नुकसान भरपाई न देऊन, पीकविमा कंपनीने कोट्यवधी रूपये हडपले आहेत. याप्रश्नी स्वाभिमानी शेतकरी संघटना चिखली, बुलढाण्यात तीव्र आंदोलन करत आहेत. परंतु, सिंदखेडराजा तालुक्यातील शेतकरी वार्यावर सोडले आहेत. संघटनेचे तालुका पातळीवरील नेते मूग गिळून का बसलेत? ते याप्रश्नी तालुका कृषी अधिकारी, कंपनीचा संबंधित तालुका प्रतिनिधी, तहसीलदार यांना जाब कधी विचारणार? गोरगरीब शेतकर्यांना न्याय कधी मिळवून देणार? असे प्रश्न संतप्त शेतकरी करत आहेत.
———————