Breaking newsHead linesMaharashtraPachhim Maharashtra

भाजपचे आ. जयकुमार गोरे यांची फॉर्च्युनर कार ३० फूट उंचीवरून नदीत कोसळली, गोरेंसह तिघांची प्रकृती स्थीर!

सातारा/पुणे (जिल्हा प्रतिनिधी) – नागपूरचे हिवाळी अधिवेशनाहून पुणेमार्गे माण येथे जात असताना फलटण येथील बाणगंगा नदीच्या पुलावरून भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांची गाडी तब्बल ३० फूट उंचीवरून नदीपात्रात कोसळली. या भीषण अपघातात आ. गोरे यांच्यासह चौघेजण गंभीर जखमी झाले असून, त्यांना पुणे येथील रूबी हॉल क्लिनिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. आ. गोरे आता शुद्धीवर आले असून, त्यांच्यावर अतिदक्षता कक्षात उपचार सुरु आहेत. इतर तिघांची प्रकृतीही स्थीर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. या घटनेने माण-खटाव मतदारसंघात खळबळ उडाली असून, अनेक कार्यकर्ते पुण्याकडे रवाना झाले होते. परंतु, कार्यकर्त्यांनी मतदारसंघातच थांबावे, डॉक्टरांनी भेटण्यास मज्जाव केला आहे, अशी माहिती आ. राहुल कुल यांनी दिली आहे.

फलटण येथील बाणगंगा नदीच्या पुलावरून जाताना आमदार जयकुमार गोरे यांची फॉर्च्युनर ही कार सुमारे ३० फूट ऊंच असलेल्या पुलावरून खाली कोसळली. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी पुलावर लावण्यात आलेल्या तारा तोडून नदीपात्रात कोसळली. गाडीमध्ये जयकुमार गोरे यांच्यासह चार जण प्रवास करत होते. अपघातात जखमी झालेल्या आमदार गोरे यांना पुणे येथील रुबी हॉल क्लिनिक या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. दरम्यान, रुबी हॉस्पिटलचे डॉक्टर कपिल झिरपे यांनी जयकुमार गोरे यांच्या प्रकृतीसंदर्भात माध्यमांना माहिती देताना सांगितले, की सुदैवाने जयकुमार गोरे यांना अपघातात जास्त दुखापत झालेली नाही. ते शुद्धीवर आले असून, आता बोलतदेखील आहे. त्यांची पल्स आणि बीपी व्यवस्थित आहे. छातीला थोडासा मार लागला आहे. पॅनिक व्हायची गरज नाही. पेनकिलर दिल्याने त्यांना बरे वाटत आहे, असे डॉ. झिरपे यांनी सांगितले.

माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनाच गोरेंनी अपघातानंतरचा पहिला फोन केला. त्यांच्या फोननंतर खासदार निंबाळकर पुढच्या ५ मिनिटांत घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर पाहिलेली भीषण परिस्थिती खासदार निंबाळकर यांनी प्रसारमाध्यमांना सांगितली. ते म्हणाले “पहाटे ३ वाजता जयकुमार गोरे यांनी मला फोन करुन त्यांचा अपघात झाल्याचं सांगितलं. माझा फलटणजवळ अपघात झालाय पण मला लोकेशन सांगता येणार नाही, असं त्यांनी मला सांगितलं. त्यानंतरच्या पुढच्या ५ ते ७ मिनिटांत मी अपघातास्थळी पोहोचलो. त्यांची गाडी ५० फूट नदीत पडली होती. पोलिसांच्या मदतीने तत्काळ आम्ही त्यांना गाडीबाहेर काढलं. त्यांच्या गाडीचं प्रचंड नुकसान झालं होतं. त्यांच्या गाडीतील सगळे सीट्स तुटले होते. त्यांना तत्काळ पुढील उपचारासाठी पुण्याचा नेण्याचा निर्णय घेतला. त्यांच्यासोबत मी स्वत: पुण्याला आलो”
गाडीत जे जे कुणी होते, त्यांना पहिल्याप्रथम रुग्णवाहिकेत बसवून तत्काळ हॉस्पिटलला हलवलं. नंतर जयकुमार गोरेंना घेऊन आम्ही पुण्याच्या दिशेने रवाना झालो. रुबी हॉल क्लिनिकमध्ये त्यांना दाखल करण्यात आलं. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून डॉक्टर त्यांच्यावर उपचार करतायेत. कार्यकर्त्यांनी रुग्णालयात गर्दी न करता मतदारसंघातच थांबावं, असं आवाहन निंबाळकर यांनी केलं.

आमदार जयकुमार गोरे यांचा अपघात  झाल्यानंतर त्यांचे वडील भगवान गोरे यांनी त्यांची रुग्णालयात भेट घेतली. त्यानंतर भगवान गोरे यांनी रुग्णालयाबाहेर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.  ते म्हणाले, ‘माझं जयकुमार गोरे यांच्याशी बोलणं झालं आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. काळजी करण्यासारखं कारण नाही. मला अपघात झाल्यानंतर बीपीचा त्रास असल्यामुळे मला कळविले नाही. अपघात घडल्यानंतर मला फलटणवरून कॉल आला. त्यानंतर जोडीदारासोबत रुग्णालयात आलो’. ‘अपघातावेळी नेमका काय झालं हे वरच्यालाच माहीत असेल. पण रस्त्यावर ट्रॅफिक नसताना अपघात झाला. त्यामुळे या अपघाताबाबत मला शंका वाटत आहे. अपघातास्थळी मी गेलो होतो. तिथे अपघात होण्यासारखे काही नाही, असा संशय भगवान गोरे यांनी व्यक्त केला आहे. मला आमदार गोरे यांनी मला तब्येत ठीक असून आपण घरी जावा सांगितलं. मला वाटतं ते बोललो. फलटणमध्येच सातत्याने अपघात घडत आहे. त्यामुळे मला शंका वाटत आहे. मी कोणावर संशय घेऊ शकत नाही, असेही त्यांनी सांगितले.


आ. गोरे यांच्या गाडीला अपघात नेमका कसा झाला?

आमदार जयकुमार गोरे हे पुण्याहून आपली गावी दहिवडीकडे जात होते. सकाळी साडेतीन वाजेच्या सुमारास त्यांची गाडी फलटण येथील बाणगंगा नदीच्या पुलावर आली असता, चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडी थेट ३० फूट खोल नदीपात्रात कोसळली. चालकाला रस्त्याचा अंदाज न आल्यामुळे वेगाने असलेल्या गाडीचा हा अपघात झाला. या अपघातात जखमी झालेले आमदार जयकुमार गोरे यांना खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी तातडीने पुण्यात उपचारासाठी हलविले. गाडीत असणारे त्यांचे स्वीय सहाय्यक रुपेश साळुंखे, चालक कैलास दडस यांना बारामती येथे तर बॉडीगार्ड जनार्दन बनसोडे यांना फलटण येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सदर अपघाताचे वृत्त समजताच घटनास्थळी पोलिस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलिस अधीक्षक बापू बांगर, पोलिस उपअधीक्षक तानाजी बरडे, पोलिस निरीक्षक दादासाहेब पवार यांनी तातडीने धाव घेऊन बचावकार्य केले होते.
——————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!