कर्जत (प्रतिनिधी) – कर्जतमध्ये काम करताना बरे वाईट असे सर्व प्रकारचे अनुभव आले व अनेक चांगले अनुभव लक्षात राहण्यासारखे आहेत. कर्जत नगरपंचायतीमध्ये प्रशासकीय काम करताना सर्वाचे सहकार्य लाभले, असे म्हणत मावळते मुख्याधिकारी गोविंद जाधव यांनी सर्वाचे आभार मानले.
कर्जत नगर पंचायतमध्ये गेली तीन वर्ष सेवा देऊन कर्जतचे नाव राज्य पातळीवर गाजविण्यात मोलाचा वाटा असलेले मुख्याधिकारी गोविंद जाधव यांची बदली मंचर येथे झाल्यानंतर त्याच्या निरोपप्रसंगी व प्रभारी नूतन मुख्याधिकारी संतोष लांडगे यांच्या स्वागतासाठी कर्जत नगर पंचायतच्या प्रांगणात कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी नगराध्यक्षा उषा राऊत, उपनगराध्यक्षा रोहिणी घुले, माजी नगराध्यक्ष नामदेव राऊत, प्रा. विशाल मेहेत्रे, सर्व सामाजिक संघटनेचे भाऊसाहेब रानमाळ, माजी नगराध्यक्षा प्रतिभा भैलुमे आदींनी मनोगते व्यक्त केले.
प्रभारी नूतन मुख्याधिकारी संतोष लांडगे यांनी सांगितले, की कर्जत म्हटले की, रायगड जिल्ह्यातील कर्जत समोर येत असे, मात्र आपण सर्वांनी गावाची ओळख सर्वांना करून दिली असून, या कामातील सर्वाचा सहभाग खूप मोलाचा आहे. यामध्ये शहर आणि गावाकडून प्रशासकीय अधिकार्यांचे कामाचे कौतुक होणे निश्चित अभिमानास्पद असून, ते भाग्य मुख्याधिकारी गोविंद जाधव यांना मिळत असल्याने आता मलादेखील त्याच जबाबदारीने काम करावे लागेल. निश्चित सर्व कर्जतकराना सोबत घेत तेच कार्य पुढे नेईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
निरोप प्रसंगी मुख्याधिकारी गोविंद जाधव म्हणाले, माझी वसुंधरा १ आणि २ स्पर्धेत कर्जतकरांमुळे बक्षीस घेण्याचे भाग्य मिळाले हे आपले नशीब समजतो. कर्जतचा अनुभव पुढील प्रशासकीय सेवेत अनमोल राहील. यावेळी सर्व नगरपंचायत पदाधिकारी-कार्यालयीन कर्मचारी, सर्व सामाजिक संघटनेचे श्रमप्रेमी यासह सर्वसामान्य कर्जतकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बापू उकिरडे यांनी केले तर शेवटी आभार सुनील शेलार यांनी मानले.