रेखा जरे हत्याकांडप्रकरणी मुख्य आरोपी बाळ बोठेवर आरोप निश्चित
नगर (जिल्हा प्रतिनिधी) – राज्यभर गाजलेल्या यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे निर्घृण हत्याकांडप्रकरणी मुख्य आरोपी पत्रकार बाळ बोठे याच्यासह एकूण ११ आरोपींविरुद्ध आरोप निश्चिती झाली आहे. नगर जिल्हा न्यायाधीश सुनील गोसावी यांच्या न्यायालयात सुनावणी सुरू असलेल्या या खटल्यात आज झालेल्या सुनावणीत पोलिसांनी ठेवलेले हे दोषारोप सिद्ध झालेत. या गुन्ह्यातील बाळ बोठे याचा मोबाईल फोन अद्यापही अनलॉक असून, एक महिला आरोपी अद्याप फरार आहे. आता या खटल्याची नियमित सुनावणी सुनावणी सुरू होणार असून, तब्बल २५ महिने आणि ९० सुनावण्यांनंतर दोषारोप निश्चित झाले आहेत.
रेखा जरे हत्याकांडप्रकरणी मुख्य आरोपी तथा दैनिक सकाळचा माजी निवासी संपादक बाळ बोठे याच्यासह ज्ञानेश्वर उर्फ गुड्ड्या शिवाजी शिंदे, आदित्य सुधाकर चोळके, फिरोज राजू शेख, ऋषिकेश उर्फ तम्या वसंत पवार, सागर उत्तम भिंगारदिवे, राजशेखर अजय चकाली, शेख इस्माईल शेख अली, अब्दुल रहमान अब्दुल आरिफ, महेश वसंतराव तनपुरे, जयंत अकुला चंद्रप्पा अशी दोषनिश्चिती झालेल्या आरोपींची नावे आहेत. तर या गुन्ह्यातील मूळची हैदराबाद येथील पी. अनंतलक्ष्मी व्यंकटम सुब्बाचारी ही महिला आरोपी फरारी आहे.
नगर ते पुणे महामार्गावरील जातेगाव घाटात ३० नोव्हेंबर २०२० रोजी रेखा जरे यांचा गळा चिरून निर्घृण खून झाला होता. घटनेनंतर जरे यांच्या मुलाने आरोपीचा फोटो काढला होता. त्यावरून दोनच दिवसात सागर भिंगारदिवे याला पोलिसांनी कोल्हापुरातून ताब्यात घेतले होते. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर पत्रकार बाळ बोठे याने सुपारी दिल्याचे समोर आले होते. भिंगारदिवे ताब्यात घेताच बोठे हा फरार झाला होता. तत्कालीन जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील व उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील यांनी मोठ्या शिताफीने तपास करून हैदराबाद येथून बोठेच्या मुसक्या आवळल्या होत्या. पोलिस तपासात बोठेसह एकूण १२ आरोपी निष्पन्न झाले. या गुन्ह्यात आपल्याला गोवण्यात आल्याचा कांगावा बोठे याने करत जामीन मिळविण्यासाठी जिल्हा न्यायालय, उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयातदेखील धाव घेतली होती. परंतु, त्याला दिलासा मिळाला नव्हता.
सरकार पक्षातर्पेâ या खटल्यात अॅड. सचिन पाटेकर, सरकारी वकील उमेशचंद्र यादव यांनी जोरदार बाजू मांडली. गत सुनावणीत अॅड. पाटेकर यांनी हा गुन्हा अतिशय ंगंभीर असून, आरोपी हे सराईत आहेत. त्यांनी एकमेकांशी संपर्क करून कट रचला व हे हत्याकांड घडविले. त्यामुळे त्यांच्यावर दोषारोप निश्चित करावे, असा युक्तिवाद केला होता. त्यावर आज सुनावणी झाली असता, दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने १२ पैकी ११ आरोपीवर दोषारोप निश्चित केले आहेत. एक महिला आरोपी अद्याप फरार आहे. आता या खटल्याची नगर येथील जिल्हा न्यायालयात नियमित सुनावणी सुरू होणार आहे.
—————-