Breaking newsHead linesMaharashtraMetro CityMumbaiPolitics

Breaking News! राष्ट्रवादीच्या तीन आमदारांनी धाकधुक वाढवली!!

प्रसाद लाड की भाई जगताप? भाजपचे प्रसाद लाड यांची कडवी झुंज!

मुंबई (ब्रेकिंग महाराष्ट्र) : विधानपरिषदेच्या १० जागांसाठी मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली असताना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीन आमदारांनी महाविकास आघाडी सरकारची धाकधुक वाढवली आहे. यापैकी खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील हे नॉट रिचेबल झाले असून, पिंपरी-चिंचवडचे आमदार अण्णा बनसोडे यांची तब्येत बरी नाही तर कोपरगावचे आमदार आशुतोष काळे हेदेखील अद्याप मुंबईत पोहोचलेले नव्हते. त्यामुळे सरकारचे टेन्शन वाढले असले तरी, संध्याकाळपर्यंत हे आमदार मतदानाला येतील, असे राष्ट्रवादी काँग्रेसने स्पष्ट केले आहे.
विधानपरिषद निवडणुकीसाठी विधिमंडळात राजकीय शह-कटशहांना उधाण आले असून, भाजपचे प्रसाद लाड यांना मतांची जुळवाजुळव करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे अपक्ष आणि छोट्या पक्षांचे भाव चांगलेच वाढलेले आहेत. भाई जगताप यांना १० मतांची गरज पाहाता, त्यांना शिवसेनेकडून रसद मिळणार असली तरी, आणखी काही मते मिळवावी लागत आहेत. अतिशह संशय आणि सावधानतेच्या वातावरणात मतदान प्रक्रिया पार पडत आहे.
राज्यसभेच्या निवडणुकीनंतर आता विधानपरिषदेतही धक्कादायक निकालाची परंपरा सुरू राहणार का हे काही तासांमध्ये स्पष्ट होईल. या निवडणुकीत एक- एक मत महत्वाचे आहे. विधानपरिषद निवडणुकीत दहाव्या जागेसाठी काँग्रेसचे भाई जगतापविरुद्ध भाजपचे प्रसाद लाड यांच्यात ही लढत असणार आहे. भाई जगताप दुसर्‍या क्रमांकाचे उमेदवार असल्याने त्यांची मदार पसंती क्रम आणि अपक्षांवर आहे. काँग्रेस आमदारांचे संख्याबळ ४४ आहे. पहिले उमेदवार चंद्रकांत हंडोरेंना जिंकण्यासाठी २६ मते मिळू शकतील. मात्र भाई जगताप यांना जिंकण्यासाठी आठ मतांची जुळवाजुळव करावी लागत आहे. त्यांच्यासाठी राष्ट्रवादीचे नाथाभाऊ खडसे मैदानात उतरलेले आहेत. महाविकास आघाडीचे संख्याबळ पाहता शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रत्येकी दोन उमेदवार सहज जिंकून आणू शकतात. तर काँग्रेसही एक आमदार सहज जिंकून आणू शकतो. काँग्रेसने शिवसेनेकडे अतिरिक्त मतांचा जोगवा मागितला असून, दुसरीकडे प्रसाद लाड यांच्यासाठी देवेंद्र फडणवीस यांची शक्ती पणाला लागली आहे. त्यांच्या जाळ्यात राष्ट्रवादीचा एक आमदार अडकल्याची जोरदार चर्चा होती. परंतु, सायंकाळपर्यंत खरे चित्र स्पष्ट होईल. भाजप काही गडबड करण्याची शक्यता पाहाता, प्रत्येक राजकीय पक्षाने आपापले आमदार वेगवेगळ्या हॉटेलमध्ये ठेवले होते. काँग्रेसने वरळीतील फोर सिझन हॉटेलमध्ये ठेवलेले आमदार सुरक्षितपणे विधिमंडळात आणून, आपली मते फुटणार नाही, याची पुरेपूर काळजी घेण्यास सुरुवात केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!