– स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पीकविमा आंदोलनाची यशस्वी सांगता
चिखली (एकनाथ माळेकर) – चिखली तालुक्यातील शेतक-यांनी अॅग्रीकल्चर इन्सुरन्स विमा कंपनीच्या माध्यामातून पिकांचा विमा काढला आहे. नुकसानीपोटी विमा मंजूर झाल्यानंतर मात्र, अनेक शेतक-यांच्या बँक खात्यावर क्रूर थट्टा करणारी रक्कम जमा झाली. याबाबत हजारो लेखी तक्रारी शेतक-यांनी दिल्यानंतर सुद्धा कसलीही दखल प्रशासनाकडून घेतली जात नसल्याने दिनांक १९ डिसेंबररोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते विनायक सरनाईक, नितिन राजपूत यांनी शेतक-यांसह आक्रमक पावित्रा घेतला होता. दरम्यान, या आंदोलनाची प्रशासनाकडुन दखल घेण्यात आली असून, ४.३७ कोटी रुपये शेतक-यांना कमी दिल्याचा तफावत अहवाल तयार करण्यात आला आहे. तालुका तक्रार निवारण समितीने बैठक बोलवत शेतक-यांच्या तक्रारींची आढावा घेतला आहे. तर इतर मागण्यांचे लेखी अश्वासन दिल्याने आठ तासानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.
अतिवृष्टी व सततच्या पावसाने सोयाबीनसह इतर पिकांचे नुकसान झाले. उभ्या पिकास कोंब फुटले. तर नदीकाठच्या शेती व पिके होत्याची नव्हती झाली. तुपकरांच्या सह्याद्री वरील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या बैठकीनंतर रक्कम मंजुर झाली. परंतु कंपनीने शेतक-यांच्या खात्यावर तोकडी रक्कम जमा केली. काही शेतक-यांच्या खात्यात प्रिमीयम पेक्षा कमी रक्कम मिळाली. अजुनही शेतकरी विम्यापासुन वंचीत असल्याने हजारो लेखी तक्रारी शेतक-यांनी दिल्या. परंतु त्यावर निर्णय झाला नसल्याने तक्रार निरसन करण्यासाठी राज्य, जिल्हा व तालुका स्तरीय समिती असते; परंतु शेतक-यांच्या तक्रारी असतांना आढावा बैठक घेतली नसल्याने प्रशासन या प्रश्नी गंभीर नसल्याचा आरोप सरनाईक यांनी केला होता. दरम्यान या मागण्यांसाठी १९ डिसेंबररोजी ऐन अधिवेशन काळात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विनायक सरनाईक, नितिन राजपुत यांच्यासह शेतक-यांनी कृषी कार्यालयाचा ताबा घेत विमा कंपनीच्या मनमानीविरोधात ठिय्या आंदोलन सुरु केले होते.
दरम्यान, या आंदोलनाची दखल घेत तालुका स्तरीय समितीचे अध्यक्ष तहसीलदार यांनी तातडीने शेतक-यांच्या तक्रारीच्या अनुषंघाने आढावा बैठक घेतली असून, याबाबतचा अहवाल जिल्हा स्तरीय समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी यांना पाठवण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे तुटपुंजी रक्कम मिळालेल्या १६ हजार ६९२ शेतक-यांच्या खात्यावर ४ कोटी ३७ हजार ८२१ रुपयांची तफावत असल्याचा अहवाल तयार करण्यात आला असून, तो प्रस्ताव शासनास व कंपनीस सादर करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे चिखली तालुक्यातील १२०६ शेतक-यांचे खाते क्रमांक, आयएफएससी कोड पोर्टलवर चुकीचे भरल्यामुळे ७९ लाख ९६ हजार ९२३ रुपये रखडलेली रक्कमेची यादी विमा कंपनीकडून मागवण्यात आली असून, कृषी सहाय्यक यांना त्रुटी पुर्ण करण्यासाठी याद्या सादर करुन पैसे खात्यावर टाकण्यात येणार आहेत. तर स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत पिक विमा रक्कम न मिळालेल्या शेतक-यांची रक्कम दोन आठवड्यात जमा करण्यात येणार आहे. तर काढणी पश्चात नुकसान झालेल्या शेतक-यांची रक्कम केंद्र व राज्य शासनाकडुन प्राप्त होताच खात्यावर जमा करण्यासह इतर मागण्यांचे लेखी अश्वासन पिक विमा कंपनी व कृषी विभागाकडुन मिळाल्याने आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आले आहे. तर मागण्यांची पूर्तता न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सरनाईक, राजपूत यांनी दिला आहे.
दरम्यान, काल रात्री ८वाजता याबाबतचे लेखी पत्र तालुका कृषी अधिकारी अमोल शिंदे यांनी आंदोलनकर्ते यांना दिले आहे. या आंदोलनात भारत खंडागळे, अनिल चव्हाण, सुधाकर तायडे, रुषीकेश वाघमारे, रामेश्वर चिकणे, औचितराव वाघमारे, विलास वसु, दत्ता मोरे, गोकुळसिंग पवार, प्रल्हाद देव्हडे, नंदकिशोर सरनाईक, संतोष शेळके, ज्ञानेश्वर आंभोरे, रमेश पवार, प्रमोद पवार, कैलास शेळके, पवन डुकरे, अरुण पन्हाळकर, मधुकर चव्हाण, गणेश देशमुख, विठ्ठल परीहार यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. तर कसलाही अनुचीत प्रकार घडु नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त ठाणेदार लांडे यांनी ठेवला होता.
———————