मंत्री चंद्रकांत पाटलांच्या विरोधात कर्जत पदवीधर पत्रकार संघाचे पोलीस निरीक्षकांना निवेदन
कर्जत (प्रतिनिधी) – राज्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारावर केलेल्या कारवाईचा निषेध व्यक्त करत संबंधित खोटा गुन्हा मागे घेऊन पत्रकाराची जाहीर माफी मागावी, अशा आशयाचे निवेदन कर्जत तालुका पदवीधर पत्रकार संघाच्या वतीने कर्जतचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना देण्यात आले.
उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापुरुषांबाबत नुकत्याच केलेल्या अवमानकारक वक्तव्याने राज्यभर निषेधाचा वणवा पेटला असताना एका कार्यक्रमानंतर त्यांच्यावर शाइफेक झाली होती. या शाइफेकीचा व्हिडिओ पत्रकार गोविंद वाकड यांनी चित्रित केला होता. त्यानंतर हा व्हिडीओ राज्यभर वेगाने व्हायरल झाला. मात्र संबंधित व्हिडीओ सगळया अँगलमध्ये व्यवस्थितरीत्या काढलाच कसा? यावर शंका व्यक्त करत मंत्री पाटील यांनी संबंधित पत्रकारावर आक्षेप घेत प्रशासनाला चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर पत्रकार वाकड यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटकही करण्यात आली होती. पत्रकारांनी कोणत्या बातम्या कराव्यात? कोणत्या करू नये? कोणत्या घटनेचे चित्रीकरण करावे अगर करू नये? यावर निर्बध घालणारे चंद्रकांत पाटील कोण आहेत? असा सवाल पत्रकारांनी यावेळी उपस्थित केला. ही ‘लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाची गळचेपी असून मंत्री पाटील यांनी सत्तेचा गैरवापर करून पत्रकार वाकड यांच्यावर दाखल करण्यात आलेला खोटा गुन्हा गृहमंत्र्यांनी तात्काळ मागे घ्यावा व पत्रकारावर झालेल्या अन्यायाबाबत जाहीर माफी मागावी असे देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे. पत्रकार हे चांगल्या वाईट बाबी उजेडात आणून उपेक्षितांना न्याय मिळवून देण्याचे काम करत असतात परंतु पाटील यांच्या भूमिकेने राज्यभरातील पत्रकारांमध्ये नाराजी दिसून येत आहे. यावेळी निवेदन देताना दत्ता उकिरडे, सुनील कांबळे, विजय सोनवणे, आशिष निंभोरे, नाना साबळे, आदी उपस्थित होते.