Breaking newsBULDHANAHead linesMaharashtraPolitical NewsPoliticsWorld update

शेतकरी नेते रविकांत तुपकरांच्या पाठीवर शरद पवारांची कौतुकाची थाप!

– सोयाबीन – कापूस प्रश्नाबाबत रविकांत तुपकरांची केंद्रीय कृषीमंत्री तोमर यांच्याशी चर्चा
– माजी कृषीमंत्री शरद पवार यांचीही घेतली भेट

नवी दिल्ली (विशेष राजकीय प्रतिनिधी) – माजी केंद्रीय कृषिमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तथा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देत, तुमच्यामुळेच सोयाबीन, कापसाचा प्रश्न राजधानी नवी दिल्लीत, मागीलवेळीदेखील संसदेत पोहोचला होता, असे कौतुकोद्गार काढत, तुपकरांकडून सगळ्या मागण्या सविस्तरपणे समजून घेतल्या. गेल्या वर्षी सोयाबीन – कापसाचा प्रश्न तुमच्यामुळे संसदेत पोहचला, अशा शब्दात त्यांनी तुपकरांचे कौतुक केले. यावर्षी देखील या प्रश्नांसाठी उभारलेला लढा, बुलढाण्यातील एल्गार मोर्चा, मुंबईतील जलसमाधी आंदोलन याचा उल्लेख करत, शेतकर्‍यांसाठी तुमची भूमिका कौतुकास्पद आहे, अशा शब्दात पवार यांनी तुपकरांच्या पाठिवर शाबासकीची थाप दिली. यावेळी विदर्भ प्रमुख दामूअण्णा इंगोले व रामेश्वर अंभोरे उपस्थित होते.

दरम्यान, सोयाबीन – कापूस उत्पादक शेतकर्‍यांचे प्रश्न आणि मागण्यांबाबत रविकांत तुपकर यांनी केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्याशी सविस्तर चर्चा केली. १४ डिसेंबर रोजी दिल्ली येथे त्यांची बैठक पार पडली. या भेटीदरम्यान सोयाबीन – कापूस प्रश्नांबाबत सविस्तर आणि सकारात्मक चर्चा झाली, हे विशेष. तसेच तुपकरांनी देशाचे माजी कृषीमंत्री तथा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचीही भेट घेऊन मागण्यांबाबत त्यांच्याशी चर्चा केली. सोयाबीन – कापूस उत्पादक शेतकर्‍यांचा प्रश्न थेट केंद्र सरकारच्या दरबारी पोहचविण्यात शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना यश आले आहे. १३ डिसेंबर रोजी केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयुष गोयल यांच्याशी चर्चा झाल्यानंतर रविकांत तुपकरांनी १४ डिसेंबर रोजी केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांची भेट घेऊन त्यांनाही सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकर्‍यांच्या व्यथा, समस्या आणि मागण्यांबाबत अवगत केले. पोल्ट्री लॉबी केंद्रीय पशुसंवर्धन मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांना घेऊन सोयाबीन-कापसाचे दर कमी होण्याबाबत दबाव आणत आहेत, अशा वेळी शेतकर्‍यांचे मंत्री म्हणून केंद्रीय कृषीमंत्री या नात्याने सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकर्‍यांची बाजू आणि त्यांच्या हिताच्या मागण्या पंतप्रधानांकडे मांडाव्या, अशी विनंती तुपकरांनी ना. तोमर यांच्याकडे केली. त्यांनीदेखील सोयाबीन-कापूस उत्पादकांच्या समस्या आणि मागण्या सविस्तरपणे समजून घेतल्या. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि वाणिज्य मंत्री पीयुष गोयल यांना शेतकर्‍यांचे प्रश्न आणि मागण्यांबाबत पत्र देतो, शिवाय स्वत: भेट घेऊन शेतकर्‍यांची बाजू मांडतो, असा शब्द देखील केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी तुपकरांना दिला.

विद्यमान केंद्रीय कृषी मंत्र्यांची भेट घेतल्यानंतर रविकांत तुपकर यांनी देशाचे माजी कृषीमंत्री तथा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची देखील भेट देऊन सोयाबीन-कापूस उत्पादकांचे प्रश्न मांडले. शरद पवार यांनी अगदी सुक्ष्मपणे सर्व मागण्या समजून घेतल्या. या मागण्यांबाबत तुपकरांशी सविस्तर चर्चा केली. शेतकर्‍यांच्या हिताच्या या सर्व मागण्या रास्त आहेत, त्यामुळे केंद्रीय वाणिज्य मंत्री, केंद्रीय कृषी मंत्री यांना प्रत्यक्ष भेटून या मागण्यांबाबत त्यांच्याकडे पाठपुरावा करतो, अशी हमीदेखील शरद पवार यांनी दिली. गेल्या वर्षी आणि यंदा देखील सोयाबीन-कापसाचा प्रश्न दिल्ली दरबारी मांडून शेतकर्‍यांना न्याय देण्याची तुमची भूमिका कौतुकास्पद असल्याचे शरद पवार यांनी रविकांत तुपकरांना सांगितले, हे उल्लेखनीय. दरम्यान केंद्रीय वाणिज्य मंत्री आणि आजी – माजी केंद्रीय कृषी मंत्री यांची भेट घेऊन सोयाबीन – कापूस उत्पादक शेतकर्‍यांच्या समस्यांबाबत केलेला पाठपुरावा हा शेतकर्‍यांना न्याय देण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.
—————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!