साेलापूर (जिल्हा प्रतिनिधी) – दलित वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत सोलापूर जिल्ह्यासाठी 55 कोटी रुपये मिळाले असून या निधीचे वाटप पुढील आठवड्यात करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा समाज कल्याण सुनील खमीतकर अधिकारी यांनी दिली.
सध्या तालुकास्तरावर तसेच जिल्हास्तरावर दलित वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत विविध विकासकामे करण्यासाठी प्रस्ताव स्वीकारले जात आहेत. त्यामुळे पात्र दलित वस्ती मधून प्रस्ताव येणे अपेक्षित आहे. या दलित वस्ती सुधारणा योजनेच्या माध्यमातून दलित वस्तीमध्ये पाणीपुरवठा करणे, बंदिस्त गटार करणे, सिमेंट रस्ता करणे, पेव्हिग ब्लॉक बसविणे, पाण्याच्या सोयीसाठी टाकीचे बांधकाम करणे, आरो प्लांट बसविणे आदी विविध कामे करण्यात येणार आहेत.
दरम्यान, राज्यातील सत्तांतरामुळे गेल्या चार-पाच महिन्यापासून दलित वस्ती सुधारणा योजनेच्या कामांना निधी नसल्यामुळे ग्रामीण भागातील दलित वस्ती मधील लोकप्रतिनिधी मधून संताप व्यक्त केला जात होता. अनेक दलित वस्ती सुधारणा योजनेचा राखीव निधी असताना देखील केवळ राज्यातील सत्तांतरामुळे वस्त्यांना निधी मिळत नसल्याचे खंत व्यक्त केली जात होती. परंतु आता राज्यात सरकार स्थिर झाले असून आता तरी लवकर या कामांना मंजूरी मिळतील का असा सूर व्यक्त केला जात आहे.