– सोलापुरात खळबळ : पाच लाखांपर्यंतच्या ठेवींना डीआयसीजीसीअंतर्गत विमा संरक्षण
– साताराची जिजामाता महिला सहकारी बँकेचा परवानाही रद्द; धाराशिवमधील समर्थ अर्बनवरही निर्बंध
सोलापूर (हेमंत चौधरी) – भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) सोलापुरातील समर्थ सहकारी बँकेवर निर्बंध घातले आहेत. बँकिंग नियमन कायदा-१९४९ च्या कलम ५६ सह कलम ३५ अ च्या उपकलम (१) अंतर्गत हे निर्बंध घालण्यात आले असून, या निर्बंधानुसार, काल, दि. ७ ऑक्टोबरच्या व्यवहाराच्या समाप्तीपासून समर्थ बँक लेखी पूर्व मंजुरीशिवाय कोणतेही कर्ज आणि आगाऊ रक्कम मंजूर किंवा नूतनीकरण करू शकत नाही. कोणतीही गुंतवणूक करू शकत नाही. निधी उधार घेणे आणि नवीन ठेवी स्वीकारणे यासह कोणतेही दायित्व सहन करू शकत नाही. दायित्वे पूर्ण करताना किंवा अन्यथा कोणतेही पेमेंट वितरित करू शकत नाही, किंवा वितरित करण्यास सहमती देऊ शकत नाही. कोणत्याही तडजोड किंवा व्यवस्था करू शकत नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. तर बँकेवरील ही बंधने लवकरात लवकर हटतील, असा विश्वास समर्थ सहकारी बँकेचे अध्यक्ष दिलीप अत्रे यांनी व्यक्त केला आहे.
बँकेच्या सध्याच्या आर्थिक स्थितीचा विचार करून ठेवीदारांना त्यांच्या खात्यातून पैसे काढण्यासदेखील आरबीआयकडून मनाई करण्यात आली असून, ठेवीदारांना डीआयसीजीसी योजनेअंतर्गत त्यांच्या ठेवीवर ५ लाखांपर्यंत ठेव विमा मिळू शकतो, असेही आरबीआयने प्रसिद्धी पत्रकामध्ये स्पष्ट केले आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने काल राज्यातल्या काही सहकारी बँकांवर निर्बंध लादले. आर्थिक परिस्थिती खालावत असल्याने सातार्याच्या जिजामाता महिला सहकारी बँकेचा परवाना रिझर्व्ह बँकेने रद्द केला होता. या बँकेच्या खातेधारकांना डीआयसीजीसीच्या अंतर्गत ५ लाखापर्यंतच्या ठेवी परत मिळतील. ९४ टक्क्यांहून अधिक ठेवीदार या विमा संरक्षणासाठी पात्र आहेत. २०१६ मध्येही या बँकेचा परवाना रद्द झाला होता पण बँकेने दिलेल्या आव्हानानंतर २०१९ मध्ये तो पुन्हा दिला होता. यासह, सोलापूरची समर्थ सहकारी बँक आणि धाराशिवची समर्थ अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेवरही रिझर्व्ह बँकेने सहा महिन्यांसाठी निर्बंध लादले. रिझर्व्ह बँकेच्या परवानगीशिवाय या बँकांना कुठलेही कर्ज देऊ शकणार नाही, कुठलीही गुंतवणूक करू शकणार नाही. खातेधारकांना त्यांच्या खात्यातून पैसेही काढता येणार नाहीत. मात्र डीआयसीजीसीच्या विमा संरक्षणांतर्गत ५ लाखापर्यंतच्या ठेवी काढता येतील. याशिवाय शिरपूर मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेवरचे निर्बंध आता ८ जानेवारी २०२६ पर्यंत कायम राहणार आहेत. समर्थ बँकेवरील निर्बंधामुळे सोलापुरात खळबळ उडाली असून, ठेवीदारांची चांगलीच धाकधूक वाढली आहे. सहा महिन्यांपासून या बँकेचे कर्जवाटप जवळपास ठप्प पडले होते. तर ठेवींवर व्याज देण्याचा प्रश्नदेखील निर्माण झाला होता. आर्थिकस्थिती प्रचंड खालावल्याने अखेर आरबीआयने निर्बंध लादले आहेत.
—————