– पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते ऑनलाईन वितरण; बुलढाणा कृषी विज्ञान केंद्रात थेट प्रक्षेपणासह मार्गदर्शन सत्र!
बुलढाणा/सिंदखेडराजा (सुरेश हुसे) – प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत शेतकर्यांच्या खात्यावर थेट मदतीचा २० वा हप्ता आज, शुक्रवार २ ऑगस्ट २०२५ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते ऑनलाईन पद्धतीने वितरित केला जात आहे. या निमित्ताने बुलढाणा येथील कृषी विज्ञान केंद्रात सकाळी ११ वाजता विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव हे प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी झाले. यांच्यासोबतच जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद जाधव पाटील, आमदार संजय गायकवाड आणि आमदार धीरज लिंगाडे आदी मान्यवरही कार्यक्रमास उपस्थित होते. केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत पात्र शेतकर्यांना दरवर्षी तीन समान हप्त्यांमध्ये एकूण सहा हजार रुपयांची थेट आर्थिक मदत दिली जाते. हंगाम सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर शेतकर्यांना आर्थिक आधार मिळावा या उद्देशाने दर दोन हजार रुपयांचे तीन टप्पे लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केले जातात. यावर्षीचा २० वा हप्ता पंतप्रधान मोदींच्या हस्ते संपूर्ण देशभर वितरित केला जात आहे. या राष्ट्रीय कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण बुलढाण्यातील कृषी विज्ञान केंद्रात करण्यात आले. यावेळी उपस्थित शेतकर्यांसाठी विविध विषयांवर कृषी तज्ज्ञांचे मार्गदर्शन सत्र देखील आयोजित करण्यात आले होते.
———