– पिंपळगाव सराईत शेतकरीपुत्राने घेतला गळफास!
– चिखली तालुक्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच; सरकारने गांभीर्याने घेण्याची गरज!
चिखली (राजेश लोखंडे) – तालुक्यातील भरोसा येथील शेतकरी दाम्पत्य गणेश थुट्टे आणि रंजना थुट्टे यांनी हुमणी अळीने सोयाबीन पीक उद्धवस्त झाल्याने आणि बँकांचे असलेले कर्ज यामुळे दि.२४ जुलै रोजी शेतातील निंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली होती. ही घटना ताजी असतानाच तालुक्यातील पिंपळगाव सराई येथील शेतकरी पुत्राने आत्महत्या केल्याची घटना आज, दि.१ ऑगस्ट रोजी उघडकीस आली.
सविस्तर असे, की पिंपळगाव सराई येथील अल्पभूधारक शेतकरी राजेंद्र गुंड ( वय ५०) यांचा मुलगा शंकर राजेंद्र गुंड (वय २५) हा नेहमीप्रमाणे दि.१ ऑगस्ट रोजी सकाळी गाईचे दूध काढण्यासाठी गोठ्यात गेला, दूध काढल्यानंतर त्याने दुधाचे भांडे गोठ्यात ठेवले आणि गोठ्याच्या आडोशाला जाऊन गळफास घेऊन आत्महत्या केली. बराच वेळ झाल्याने शंखर घरी दूध घेऊन न आल्याने त्याचे वडील त्याला पहायला गेले असता, शंकर हा गळफास घेऊन लटकलेला दिसला. त्यानंतर त्यांनी आरडाओरडा केला असता, आजूबाजूचे लोक तिथे आले व त्यांना शंकरचे प्रेत लटकलेले दिसले. या घटनेची माहिती रायपूर पोलिसांना दिल्यावर रायपूर पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल सुधीर जोशी आणि बीट जमदार अझरुद्दीन काजी यांनी घटनास्थळी येऊन पंचासमक्ष पंचनामा करून सदरचे प्रेत खाली उतरवून उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय चिखली येथे पाठविले. एका अल्पभूधारक तरुण शेतकरीपुत्राने आत्महत्या केल्याने पुन्हा एकदा शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच असल्याचे पाहावयास मिळत असल्याने सरकारने गांभीर्याने घेण्याची गरज निर्माण असल्याचे बोलल्या जात आहे.