– कर्जत येथे कार्यकर्ता स्नेह-संवाद मेळावा
– माझ्या माणसांना त्रास दिल्यास धडा शिकवू – घुलेंचा इशारा
कर्जत (प्रतिनिधी) – मतदारसंघाच्या विकासासाठी भावनेला प्रत्येक वेळा मुरड घातली. मात्र कधी स्वाभिमानास तडा जाऊ दिला नाही. मतदारसंघात जादूची कांडी फिरवून कोणी विकास करू शकणार नाही, कर्जत-जामखेडला वैभव मिळवून देण्यासाठी आपल्यातील माणसाला ताकद द्यावी लागेल. तुमच्या सर्वांच्या सहकार्याने तुमच्या हिमतीवर आता जिंकायचे असून, लढाई नाही तर युद्धदेखील मित्रमंडळाच्या जीवावर सहज जिंकण्याची उमेद हा जनसमुदाय कायम देत आला आहे, असे प्रतिपादन प्रवीण घुले यांनी केले. ते कर्जत येथे कार्यकर्ता स्नेह-संवाद मेळाव्यात बोलत होते.
काही दिवसापूर्वी प्रवीण घुले मित्रमंडळाचे निवडक कार्यकर्त्यानी एकत्र येत माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण घुले यांनी भाजपात जावे, असा आग्रह धरला व त्यास घुले यांनी ही होकार दिला होता. त्यावेळीच ते भाजपात जाणार यावर शिक्कामोर्तब झाले होते, व तो कार्यक्रम कधी होतो, याकडे सर्वाचे लक्ष लागलेले असताना प्रवीण घुले मित्रमंडळाने तालुक्यातील आपल्या कार्यकर्त्याचा स्नेह-संवाद मेळावा घेत, आपली ताकद आजमावून पाहण्याचा प्रयत्न केला, व त्यास मोठे यश आले. यावेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाळासाहेब लोंढे यांनी केले. यावेळी आंबीजळगावचे सरपंच विलास निकत, हभप विष्णू महाराज परदेशी, नजीर शेख, ओंकार गायकवाड, कृष्णा लोखंडे, आदेश शेंडे, प्रशांत गायकवाड आदींनी मनोगते व्यक्त करताना आ. रोहित पवार यांच्या कार्यपद्धती वर व सर्वसामान्य कार्यकर्त्यांना त्यांच्याकडून मिळणार्या वागणुकीवर अप्रत्यक्ष जोरदार टीका केली. विधानसभेचा निकाल लागला आणि त्यांच्या स्वभावातील बदल मतदारसंघातील सर्वानाच पहावयास मिळाला. ज्यांनी त्यांच्या विजयासाठी जीवाचे रान केले त्यांनाही अपमानास्पद वागणूक मिळत राहिली. लोकांचे प्रश्न घेवून गेल्यास त्यांच्याकडे वेळच नसल्याचा अनुभव अनेकांनी घेतला, याशिवाय ठराविक व्यक्तीचे ऐकून काम केले जाऊ लागले, अशा भावना व्यक्त करत मतदार संघाचा व त्याच्या वर विश्वास ठेवणार्या अनेकांचा भ्रमनीराश झाला असल्याचे अनेकांच्या बोलण्यात येत होते.
स्नेह-संवाद मेळाव्याचे आकर्षण असणारे प्रवीण घुले काय बोलणार याकडे सर्वाचे लक्ष लागले होते. त्यांनी आपल्या पूर्वापार स्टाईलने मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांसमोर बोलताना राजकारणात स्वार्थ न पाहता, केवळ जनता केंद्रबिंदू मानून मतदारसंघाच्या विकासासाठी काही करता येईल, यासाठी प्रयत्न केला. आपल्या सर्वांची साथ ही मिळाली, या काळात विद्यमान लोकप्रतिनिधींना प्रश्न पडत होता, की प्रवीण घुलेकडे निवडणूक लढविण्यासाठी रसद येते कुठून? अरे भाऊ समोर बसलेला जनसमुदाय हीच प्रवीण घुलेंची संपत्ती आहे, आणि तीच राजकारणाची रसद आहे. आगामी काळात माझ्या माणसांना त्रास देण्याचा प्रयत्न कोणी करू नये. तसा प्रयत्न झाल्यास त्याला कसा धडा शिकवायचा तेसुद्धा आम्ही जाणतो. प्रवीण घुले या मित्रमंडळाच्या जीवावरच आजपर्यंत राजकारण करतो असे म्हणत, आगमी वाटचालीचे स्पष्ट संकेत दिले. शेवटी आभार सुरेश खिस्ती यांनी मानले. यावेळी महेश तनपुरे, श्रीराम गायकवाड, रमेश तोरडमल, विजय भंडारी, महेंद्र धांडे, अॅड नामदेव खरात, राजू बागवान, अमोल भगत, आदी सह अनेक गावातील कार्यकर्ते उपस्थित होते.