‘ब्रेकिंग महाराष्ट्र’कडून पर्दाफास!; चिखली तहसीलदारांना ही वाळूतस्करी दिसत नाही का?
– वाळूतस्करांना कोणत्या अधिकार्याचे अभय?
– चोरट्या मार्गाने रेतीच्या टिप्परची सर्रास रोडवरून वाहतूक
– अवैधपणे रेती वाहतूक करणारे टिप्पर ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’च्या कॅमेरात कैद!
कैलास आंधळे/ मेरा बुद्रूक (ता. चिखली) – वाळूतस्करांनी केवळ सिंदखेडराजा, देऊळगावराजा किंवा मेहकर तालुक्यातीलच नद्या पोखरल्यात असे नाही, तर चिखली तालुक्यातही मोठ्या प्रमाणात वाळूतस्करी सुरू असून, कोट्यवधी रुपयांचा चुना राज्य शासनाला लावला जात आहे. ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’च्या टीमने रात्रीच्या सुमारास जीव धोक्यात घालून या वाळूतस्करांच्या टिप्परचा पाठलाग करून वाळूतस्करीचा पर्दाफाश केला असून, हे सर्व व्हिडिओ आम्ही लवकरच राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना देत आहोत. चिखली तालुक्यातून चालणार्या या वाळूतस्करांना कोणत्या अधिकार्याचे अभय आहे? या वाळूतस्करांवर कारवाई कधी होणार? याप्रश्नाची उत्तरे जिल्हाधिकारी यांनीच आता जनतेला व राज्य सरकारला द्यावीत.
अंढेरा ते मेरा बुद्रूकमार्गे रेती तस्करीचे अवैध टिप्पर सरासपणे ह्या रोडवरून दररोज जात असताना, चिखलीच्या महसूल अधिकार्यांनी ह्या मार्गावरून अवैध रेती घेऊन जाणार्या टिप्परवर कोणतीही कारवाई केली, असे आजपर्यंत आढळून आलेले नाही. जे महसूल अधिकारी हे मेरा खुर्द मंडळमध्ये अतिवृष्टी झालेली असतानाही अतिवृष्टी न झालेल्या यादीमध्ये हे मेरा खुर्द मंडळ टाकू शकतात, त्यात अधिकार्यांकडून जनतेने काय अपेक्षा करावी, असे नागरिक बोलत आहेत. चिखली तालुक्यातील रेतीची जिल्ह्यामध्ये शासन दरबारी कोणताही लिलाव झालेला नसताना अवैधपणे रेती वाहतूक मेरा खुर्द मंडळातील काही गावातील मार्गावरून दिवसा-ढवळ्या, तसेच रात्री २ ते ३ वाजेपर्यंत चालू आहे, तरी त्यांच्यावर आजपर्यंत कोणतीही कारवाई झालेली नाही.
या रेतीतस्करांना कोणत्या महसूल अधिकार्याचा आशीर्वाद आहे? त्यातून कुणाच्या खिशात किती मलिदा जात आहे? याची गोपनीय चौकशी राज्य सरकारने करणे गरजेचे आहे. बुलढाणा जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी यांनी अवैधपणे रेती वाहतूक करणार्या टिप्परवर कारवाई करावी, मेरा खुर्द मंडळाच्या काही मार्गावरून अवैधपणे रेतीतस्करी चालू असतानाही कोणतीही कारवाई न झाल्यामुळे त्याचाही जाब संबंधित महसूल अधिकार्यांना विचारावा, व योग्य ती कारवाई करावी, अशीच मेरा खुर्द मंडळातील सर्व गावातील शेतकर्यांची मागणी आहे. मेरा बुद्रूकमार्गे चालणार्या अवैध रेती वाहतूक करणार्या टिप्परवर जिल्हाधिकारी यांनी कारवाई करणे अपेक्षित असून, अन्यथा याबाबतचे सर्व व्हिडिओज हे महसूल मंत्र्यांना ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’च्यावतीने दिले जाणार आहेत.
—————–