Breaking newsHead linesMaharashtraPuneWorld update

मंत्री चंद्रकांत पाटलांच्या तोंडावर शाईफेक!

– फुले, आंबेडकर, कर्मवीरांबद्दल संतापजनक वक्तव्य करणे भोवले!

पिंपरी-चिंचवड (विशेष प्रतिनिधी) – भारतीय जनता पक्षाचे नेते व मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काल औरंगाबादेत कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी संतापजनक वक्तव्य केले होते. त्याचे तीव्र पडसाद अखेर उमटले असून, समता परिषदेच्या संतप्त कार्यकर्त्यांनी मंत्री पाटील यांच्या तोंडावर शाईफेक करत आपला संताप व्यक्त केला. या वेळी बहुजन समाजातील या तरूणांनी बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले झिंदाबादच्या घोषणादेखील दिल्यात. यातील शाईफेक करणार्‍या तरुणासह इतर तिघांना पिंपरी चिंचवड पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांच्याविरोधात कारवाई सुरू होती. रात्री उशिरा आंबेडकरी कार्यकर्ते व भाजपचे कार्यकर्ते पाेलिस ठाण्यातच आमने-सामने आले हाेते. मनोज गरबडे असे शाईफेक करणा-या तरूणाचे नाव असून, ताे समता सैनिक दलाचा कार्यकर्ता आहे. त्याच्याविरुद्ध गुन्हे दाखल झाले तर, महापुरुषांचा अवमान करणा-या चंद्रकांत पाटलांवरही गुन्हे दाखल करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते मारूती भापकरसह आंबेडकरी कार्यकर्त्यांनी केलेली आहे.

मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काल केलेल्या वक्तव्यावरुन वातावरण तापले आहे. चंद्रकांत पाटील हे आज पिंपरीत आले असताना समता सैनिक दलाच्या काही कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर अचानक शाईफेक केली. यामुळे काही काळ एकच गोंधळ उडाला. ही शाईफेक झाल्यानंतर शाई फेकणार्‍यांनी ‘निषेध असो, निषेध असो’, अशा घोषणा दिल्या. तसेच, महात्मा फुले व बाबासाहेब आंबेडकर झिंदाबादच्याही घोषणा दिल्यात. शाईफेक केल्यानंतर काही  कार्यकर्त्यांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी शाईफेक करणार्‍यांना पकडले. ही शाईफेक झाल्यानंतर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया व्यक्त करताना संताप व्यक्त केला. मी कुणालाही घाबरत नाही. समोर या असे म्हणतानाच चंद्रकांत पाटील यांनी राज्यात झुंडशाही सुरू असल्याचे म्हटले. निषेध करायचा असेल तर तो सनदशीर मार्गाने करता आला असता. या कृतीचा निषेध करा, असे आवाहन चंद्रकांत पाटील यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार, अजित पवार, उद्धव ठाकरे आणि सुषमा अंधारे यांना केले आहे.

चंद्रकांत पाटील यांनी काल भाषण करताना महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याविषयी बोलताना वादग्रस्त विधान केले होते. शिक्षणाचा प्रचार करण्यासाठी या महापुरुषांनी भीक मागतल्याचे धक्कादायक विधान त्यांनी केले होते. त्यातच, मंत्री पाटील हे आज पिंपरीत मोरया गोसावी या गणपती देवस्थानाच्या संजीवन समाधी सोहळ्याला हजेरी लावणार होते. या दरम्यान एका कार्यकर्त्याच्या घरी आले असता एका अज्ञात व्यक्तीने चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक केली. विशेष म्हणजे, अशाप्रकारची घटना घडू शकते, अशी शंका पोलिसांना आधीच होती. त्यामुळे संबंधित कार्यकर्त्याच्या घराबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पण तरीही ही अनपेक्षित घटना घडली. शाईफेक करणार्‍या तीन तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सुरू होती.

मिळालेल्या माहितीनुसार, शाईफेक करणारे कार्यकर्ते हे समता सैनिक दल या संघटनेचे होते. समता सैनिक दलाच्या मनोज गरबडे या कार्यकर्त्याने चंद्रकांत पाटील यांच्या अंगावर शाई फेकल्याचं सांगितलं जात आहे. गरबडे हा अनेक वर्षांपासून समता सैनिक दलात कार्यरत आहे. तो चिंचवड परिसरात वास्तव्याला आहे. तसेच तो अनेक सामाजिक कार्यात देखील कार्यरत आहे. कट्टर आंबेडकरवादी विचारांचा कार्यकर्ता म्हणून मनोज गरबडे याची ओळख असून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून त्याने चंद्रकांत पाटलांवर शाईफेक केल्याचे समजते. या घटनेनंतर पोलिसांकडून त्याला ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्या समर्थनार्थ अनेक कार्यकर्ते चिंचवड पोलिस स्टेशनमध्ये दाखल झाले होते.


चंद्रकांत पाटलांविरुद्ध संतापाची लाट!

महापुरुषांबद्दल अवमानजनक वक्तव्य केल्याप्रकरणी ठाकरे गट उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात विरोधक चांगलेच आक्रमक झालेले आहेत. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये चंद्रकांत पाटलांविरोधात निदर्शंने केली. पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. तर पुणे जिल्हा विद्यार्थी काँग्रेस एनएसयुआयच्यावतीने काळे झेंडे दाखवून त्यांचा ताफा आडवण्याचा प्रयत्न करण्यात आला.
——————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!