Breaking newsHead linesMaharashtra

एसटी कर्मचार्‍यांना ऑक्टोबरचा पगार मिळणार, राज्य सरकारकडून २०० कोटी मंजूर!

मुंबई (प्रतिनिधी) – राज्यातील एसटी महामंडळाच्या कर्मचार्‍यांना उशिरा का होईना ऑक्टोबर महिन्याचा पगार करण्यास राज्य सरकारने २०० कोटी रुपये मंजूर केलेले आहेत. त्यामुळे एसटी कर्मचार्‍यांचा रखडलेला पगार होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. एसटी कर्मचार्‍यांच्या वेतन अदा करण्यासाठी शासनाकडून दिरंगाई झाली होती. त्यामुळे एसटी कर्मचार्‍यांचा पगार रखडा होता. आता २०० कोटी रुपये मंजूर झाल्याने पगार होण्याची चिंता सध्यातरी दूर झाली असून, अजून १६० कोटी रुपये लागणार आहेत. तसेच, सात तारखेला पगार करण्याचे आश्वासनदेखील फेल गेल्याने कर्मचारीवर्गात तीव्र नाराजी आहे.

कोरोनापासून एसटी महामंडळ प्रचंड तोट्यात असून, तत्पूर्वी झालेल्या मोठ्या संपामुळे एसटीचे आर्थिक कंबरडे मोडले गेले आहे. त्यामुळे एसटीला निधीची वारंवार कमतरता पडत असून, तोटा सातत्याने वाढत चाललेला आहे. निधीची कमतरता लक्षात घेऊन त्यांच्या ९३ हजार कर्मचार्‍यांना पगार देण्यासाठी तीन हजार कोटी रुपयांहून अधिक निधी महाविकास आघाडी सरकारकडून दिला गेला होता. अलीकडेच, शिंदे-फडणवीस सरकारने कर्मचार्‍यांना ‘ऐतिहासिक’ पगारवाढीची घोषणा करुन संप मागे घेण्याचे आवाहन केले होते. एसटी कर्मचार्‍यांच्या संपामुळे एसटीला ६०० कोटींहून अधिक रुपयांचे नुकसान झाले होते. ही परिस्थिती दिवसेंदिवस सुधारण्याचे नाव घेत नाही. त्यातच, कर्मचार्‍यांचा ऑक्टोबर २०२२ या महिन्याचा पगार रखडला होता. त्यामुळे एसटी कर्मचार्‍यांतून तीव्र नाराजी व्यक्त होत होती. या कर्मचार्‍यांनी राज्य सरकारला इशाराही दिला होता. या इशार्‍याची दखल राज्य सरकारने घेतली असून, २०० कोटी रुपयांचा निधी पगारासाठी मंजूर केला आहे. २०२२ -२०२३ या आर्थिक वर्षामध्ये उपलब्ध असलेल्या तरतूदीमधून भागविण्यात यावा, असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यानुसार आता रखडलेला ऑक्टोबरचा पगार होणार आहे.


तसेच, सरकार आपले आश्वासन पाळत नसल्याचेही स्पष्ट झालेले आहे. सरकारने एसटी कर्मचार्‍यांना सात तारखेला पगार करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र ते पाळले गेले नाही. त्यामुळे एसटी संघटना सरकारविरोधात अवमान याचिका दाखल करण्याच्या तयारीत होती. एसटी कर्मचा-यांच्या वेतनासाठी दर महिन्याला ३६० कोटी रुपये लागतात. आता २०० कोटी दिले असले तरी आणखी १६० कोटी लागणार आहेत.
—————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!