कर्जत (प्रतिनिधी) – बाल विवाह रोखणे ही आपली जबाबदारी असून, याबाबत समाजाला शहाणे करणे हे महत्वाचे आहे, यासाठी जास्तीत जास्त जागृती केली तर या प्रश्नाला आपण न्याय देऊ शकू, असे प्रतिपादन गट विकास अधिकारी अमोल जाधव यांनी व्यक्त केले. बालविवाह प्रतिबंधक अभियाना अंतर्गत स्नेहालय संचलित उडान या प्रकल्पाची माहिती देण्यासाठी कर्जत पंचायत समितीमध्ये ग्रामसेवक, अंगणवाडी पर्यवेक्षिका, शिक्षक, लग्न लावणारे व्यावसायीक आदींच्या आयोजित कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी गटविकास अधिकारी अमोल जाधव हे होते. याप्रसंगी ते बाेलत हाेते.
स्नेहप्रेमचे फारुक बेग यांनी प्रास्ताविक करताना या अभियानाच्या माहितीसाठी आयोजित कार्यशाळेबाबत माहिती दिली. प्रथम बाल विवाह संदर्भात प्रतिज्ञा घेण्यात आली. गावामध्ये ग्राम बाल संरक्षण समिती कशी स्थापन करायची याबाबत चित्रफित दाखविन्यात आली. यावेळी महीला व बाल कल्याणचे प्रकल्पाधिकारी प्रशांत मिटकरी, समाजसेविका मनीषा सोनमाळी, नगराध्यक्षा उषा राऊत, पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ, यांनी मनोगते व्यक्त केली.
उडान बाल विवाह प्रतिबंधक अभियानचे समन्वयक प्रवीण कदम यांनी कार्यशाळेत मार्गदर्शन करताना गावातील सरपंच हे या समितीचे अध्यक्ष व अंगणवाडी सेविका या सचिव असतात तर ग्रामसेवक हे बाल संरक्षण अधिकारी म्हणून काम करतात अशी माहिती देताना बाल विवाह हा समाजातील खूप मोठा प्रश्न असून तो सोडविण्यासाठी आपल्या सर्वांना प्रयत्न करण्याची गरज असल्याचे म्हटले.
स्नेहालयचे महेश सुर्यवंशी यांनी विविध कायद्याची माहिती देत उपस्थितांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. आज काल ४० वर्षाची महिला घर सांभाळायला तयार नाही मात्र १६ वर्षाच्या बालिकेला विवाहानंतर सर्व जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी दबाव आणला जात आहे. बाल विवाहामुळे भारताचे मोठे नुकसान होत असून आजकाल मोबाईल मुळे अनेक प्रश्न उभे राहत असून बाल विवाहाचे प्रमाण खूप वाढले आहे, अशा विवाहातून निर्माण होणारे मूल अधू, अपंग, मुकबधीर अथवा अपरिपक्व होत आहेत. या परिस्थितीला रोखण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी असल्याचे म्हटले.
अध्यक्षीय भाषणात गट विकास अधिकारी अमोल जाधव यांनी बाल विवाह केला जाणार नाही यासाठी अगोदरच विशेष जनजागृती केल्यास अनेक प्रश्न सुटतील याबाबतच्या कडक कायद्याची विवाह सोहळ्यात सहभागी असणाऱ्या सर्व व्यवसाईकाना जाणीव करून दिल्यास नक्कीच प्रतिबंध बसेल, असे सांगत गाव पातळीवर या भीषण प्रश्नाला आपल्याला तोंड द्यावे लागते, त्यामध्ये आपण स्नेहालय वा उडान सारख्या अभियानाची मदत घेऊ शकता असे म्हंटले, या कार्यशाळे मुळे अनेक माहिती नसलेल्या बाबी समजल्याचे त्यांनी म्हटले. यावेळी विस्तार अधिकारी राजा अटकोरे, पत्रकार स्वाती ढवळे, यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते. शेवटी आशिष बोरा यांनी आभार मानले.