लोणार (तालुका प्रतिनिधी) – बीबी येथील वसंतराव नाईक कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी लांब उडी व क्रॉसकंट्री या खेळांमध्ये नेत्रदीपक यश प्राप्त केले असून, या यशस्वी खेळाडू विद्यार्थ्यांची विभागीय स्तराकरिता निवड झाली आहे. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल सर्वस्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. क्रीडा, शिक्षण, संस्कार व शिस्त यासाठी हे विद्यालय तालुकाभरात ओळखले जाते.
जिल्हा मैदानी संघटना बुलढाणा व जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय शालेय मैदानी स्पर्धेत बीबी येथील वसंतराव नाईक कनिष्ठ महाविद्यालयाच्या रामप्रसाद रमेश खंडागळे याने १७ वर्ष वयोगटातील लांब उडी (लॉंग जंप) मध्ये जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक पटकावला. त्याची विभागीय स्तरावर निवड करण्यात झाली आहे. तर क्रॉसकंट्री या खेळामध्ये नागेश जगन सानप व शुभम दशरथ कायंदे यांनी जिल्ह्यातून प्रथम क्रमांक घेऊन उत्कृष्ट कामगिरी करून विभागीय स्तरासाठी पात्र झाले आहेत. या यशस्वी विद्यार्थ्यांचे क्रीडा शिक्षक एस. आर. राठोड हे विभागीय स्तराकरिता सराव घेत आहेत. महाविद्यालयाचे संस्था सचिव अभयदादा चव्हाण, प्राचार्य राठोड सर, क्रीडाशिक्षक, सर्व शिक्षक शिक्षकेतर व पालक यांनी विजयी खेळाडूंचे कौतुक केले आहे.