शाळा सुरू करण्यासाठी फुले-आंबेडकरांनी ‘भीक’ मागितली!
– भाजपच्या नेत्यांना वर्गणी, देणगी, मधुकरी, भीक यातला फरक कळत नाही का?: राज्यातील जनमाणस संतप्त
– चंद्रकांत पाटील यांनी भीक मागून मंत्रिपद मिळवले; आमदार-खासदारही भडकले
औरंगाबाद (जिल्हा प्रतिनिधी) – महाराष्ट्रातील महापुरुषांचा अपमान करण्याची भाजपमधील चढाओढ आज पुन्हा चव्हाट्यावर आली, आणि संपूर्ण राज्यात बहुजन समाजामध्ये संतापाची लाट उसळली आहे. शाळांसाठी बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुलेंनी भीक मागितली, असले अपमानजनक वक्तव्य भाजपचे ज्येष्ठ नेते व मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. त्यामुळे सर्वत्र संतापजनक प्रतिक्रिया उमटत असून, भाजप व शिंदे गट वगळता सर्व पक्षीय नेत्यांनी या वक्तव्याचा निषेध केला आहे. ‘भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी मंत्रिपद मिळावे, यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे भीक मागितली होती, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर टीकेची झोड उठवली.
औरंगाबादच्या पैठण संतपीठच्या कार्यक्रमात चंद्रकांत पाटील बोलत होते. ‘या देशात शाळा कुणी सुरू केल्या? कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सुरू केल्या, बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केल्या. महात्मा फुलेंनी केल्या. या शाळा सुरू करताना गर्व्हनमेंटने त्यांना अनुदान दिले नाही, त्यांनी लोकांकडे भीक मागितली. शाळा सुरू करतोय पैसे द्या,’ असे चंद्रकांत पाटील म्हणाले. ‘सरकारवर अवलंबून का राहताय? कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांनी या देशात शाळा सुरु केल्या. या सर्वांना शाळा सुरु करताना सरकारने अनुदान नाही दिले. यांनी लोकांकडे भीक मागितली. शाळा सुरु करायचीय आम्हाला पैसे द्या. तेव्हा १० रुपये देणारे होते. १० कोटी देणार लोक आहेत ना’, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
चंद्रकांत पाटील यांचा या वक्तव्यामुळे मात्र सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. चंद्रकांत पाटील यांना भीक आणि देणगी, वर्गणी यातील फरक कळत नाही का? भाजपचे नेते हेतुपुरस्सर महापुरूषांची बदनामी करत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यानंतर आता त्यांनी फुले, आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांचाही अपमान करण्याचे सोडले नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया राजकीय नेत्यांसह जनसामान्यांतून उमटत आहेत.
वाद निर्माण होताच चंद्रकांत पाटील यांनी आपल्या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. ‘त्या काळात आपण माधुकरी मागून शिकलो, माधुकरी म्हणजे काय तर भिक मागणे. भाऊराव पाटील धान्य गोळा करायचे हे तुम्हाला माहित आहे का? भीक मागून मी माझी संस्था वाढवली हा प्रचलीत शद्ब आहे. यात मी काय चुकीचं बोललो? उलट मी त्याचं ऋण व्यक्त करण्यासाठीच बोललो, मात्र विरोधक ध चं मा करतात. आता मला मुक्याची भाषा शिकावी लागेल, पण त्यातही अडचणी आहेत. कारण विरोधकांकडे दुसरं कामच उरलं नाही’ असं चंद्रकांत पाटील यांनी आपल्या स्पष्टीकरणात म्हटलं आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जिंतेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत आपली नाराजी व्यक्त केली आहे. ‘महाराष्ट्रात भाजपा नेत्यांकडून महापुरुषांचा अपमान करण्याची स्पर्धाच सुरू झालेली आहे असंच वाटत आहे. एकापाठोपाठ एक महापुरुषांची बदनामी करणारे वक्तव्य येत आहेत. अगोदर छत्रपती शिवाजी महाराज, आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, भाऊराव पाटील. चंद्रकांत पाटलांचा जाहीर निषेध..!’, असं ट्विट आव्हाड यांनी केले आहे.
————–