-शिवाजी किसनराव शिराळे पाटील यांच्या निवेदनाची दखल; शेतकरी, शेतमजूर व सर्वसामान्य नागरिकांमध्ये जनजागृती करण्याबाबत सूचना
बुलढाणा (शिराळे पाटील) : बुलढाणा जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित झाल्यानंतर शासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या विविध शासकीय सवलती, योजना आणि मदतीची माहिती ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर, भूमिहीन मजूर तसेच सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात यावी, या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते शिवाजी किसनराव शिराळे पाटील यांनी जिल्हा प्रशासनाकडे निवेदन सादर केले होते.
या निवेदनाची दखल घेत जिल्हाधिकारी कार्यालय, बुलढाणा येथून १९ ऑक्टोबर २०२६ रोजी संबंधित विभागांना अधिकृत पत्र पाठविण्यात आले आहे. या पत्राद्वारे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जिल्हा माहिती अधिकारी तसेच बुलढाणा जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांना दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शासनाने जाहीर केलेल्या विविध सवलती आणि योजनांची माहिती ग्रामपंचायत स्तरावर सार्वजनिक वाचनाद्वारे तसेच जनजागृतीच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचविण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.