-देऊळघाट येथे विकास परिवर्तन सभा उत्साहात; गावाच्या विकासासाठी सर्व समाजघटकांनी एकत्र येण्याचे आवाहन
बुलढाणा (महेंद्र हिवाळे) : बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील मौजे देऊळघाट येथे स्थानिक नागरिकांच्या वतीने विकास परिवर्तन सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला आमदार श्वेता महाले पाटील यांनी संबोधित करताना गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व समाजघटकांनी जात, धर्म आणि पक्षभेद बाजूला ठेवून एकजुटीने पुढाकार घेण्याचे आवाहन केले.
यावेळी बोलताना आमदार श्वेता महाले पाटील म्हणाल्या की, देऊळघाटचा विकास साधायचा असेल आणि गावाचा चेहरामोहरा बदलायचा असेल, तर सर्व ग्रामस्थांनी संघटित होऊन काम करणे गरजेचे आहे. गावाच्या विकासासाठी आपण सर्वजण एक आहोत, ही भावना प्रत्येकाच्या मनात निर्माण झाली पाहिजे. ‘गाव करी ते राव काय करी’ या म्हणीप्रमाणे गावकऱ्यांनी ठरवले, तर गावाचा विकास निश्चितपणे साधता येऊ शकतो. मुस्लिम समाजाच्या राजकीय आणि सामाजिक विकासाचा मुद्दा उपस्थित करताना आमदार महाले यांनी काँग्रेसवर टीका केली. काँग्रेसने आजवर मुस्लिम समाजाचा प्रामुख्याने सत्तेसाठी आणि मतांसाठी वापर केला; मात्र सत्ता मिळाल्यानंतर समाजाचा शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक उत्कर्ष व्हावा, यासाठी अपेक्षित काम केले नाही, असा आरोप त्यांनी केला. उलट, मुस्लिम समाजाच्या मनात इतर समाजांबद्दल द्वेषाची भावना निर्माण करून दोन धर्मांमध्ये दरी निर्माण करण्याचे काम काँग्रेस आणि त्यांच्या नेत्यांनी केले, असेही त्या म्हणाल्या. धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या राजकारणामागील हेतू मुस्लिम बांधवांनी समजून घ्यावा आणि अशा राजकारणाला बळी न पडता विकासाच्या मुख्य प्रवाहात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. मुस्लिम समाजाच्या विकासाबाबत बोलताना त्या म्हणाल्या की, समाजाला केवळ मतदानापुरते मर्यादित न ठेवता शिक्षण, सामाजिक सुविधा आणि विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणे महत्त्वाचे आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या माध्यमातून सर्व समाजघटकांना समान पद्धतीने विकासाच्या संधी उपलब्ध करून देण्याचे काम सुरू आहे. धाड येथे मुस्लिम समाजासाठी ५० लाख रुपयांच्या निधीतून शादीखाना उभारण्यात आला असून, चिखली मतदारसंघातील इतर ठिकाणीही अशा सामाजिक सुविधांसाठी पुढाकार घेण्यात आला आहे. घरकुल योजनेसह विविध शासकीय योजनांचा लाभ देताना कोणताही भेदभाव केला जात नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
देऊळघाटमध्ये चांगले रस्ते, पाणीपुरवठा, अंतर्गत रस्ते, नाल्यांची व्यवस्था, जिल्हा परिषद शाळांमधून गरीब विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण तसेच प्रत्येक समाजघटकासाठी सभागृह अशा विविध मूलभूत सुविधांची आवश्यकता आहे. या सुविधा मिळविण्यासाठी ग्रामस्थांनी एकजुटीने प्रयत्न करावेत. शासनाच्या विविध योजनांचा लाभ गावातील प्रत्येक पात्र नागरिकापर्यंत पोहोचविण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही त्यांनी दिली. देऊळघाटच्या विकासासाठी केवळ सभेला उपस्थित राहून चालणार नाही, तर प्रत्येक ग्रामस्थाने विकासप्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवला पाहिजे. गावातील प्रश्न सोडविण्यासाठी सामूहिक प्रयत्न आणि सातत्यपूर्ण पाठपुरावा आवश्यक आहे. गावाची ओळख विकासाच्या माध्यमातून निर्माण झाली पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि शेतकऱ्यांच्या संघर्षाचाही त्यांनी उल्लेख केला. शेतकरी कुटुंबांच्या अडचणी लक्षात घेऊन देऊळघाट येथील ग्रामस्थांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी मदतीचा हात पुढे केला, याबद्दल त्यांनी सर्वांचे मनापासून आभार मानले. स्वतः शेतकरी असतानाही संकटात असलेल्या इतर शेतकरी बांधवांसाठी मदतीची भावना दाखविणे हा सामाजिक संवेदनशीलतेचा आदर्श असल्याचे त्या म्हणाल्या.
शेवटी देऊळघाटच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येऊन परिवर्तनाचा संकल्प करावा, असे आवाहन करत आमदार श्वेता महाले पाटील यांनी उपस्थित ग्रामस्थांचे आभार मानले. या सभेला भाजप जिल्हाध्यक्ष विजयराजजी शिंदे, इद्रिस मुलतानी (भाजप अल्पसंख्याक आघाडी), सलीम भाई घाणीवाले (प्रदेश सचिव, अल्पसंख्याक आघाडी), भाजप जिल्हा महामंत्री दत्ता पाटील, जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांतजी बरदे, शहराध्यक्ष मंदार बाहेकर, तालुकाध्यक्ष सतीश पाटील, सलीम भाई परवेज (सचिव, अल्पसंख्याक आघाडी), मुन्ना बेंडवाल, नारायण हेलगे (जिल्हा सचिव), मुकुंद देशपांडे (जिल्हा सचिव), कौस्तुभ पाटील, राजेश पाठक, नंदू भाऊ लवंगे, नगरसेवक आकाश दळवी, महमंद अकील भाई, हरी नारायण गायकवाड, नीलकुमार बंगाळे, कार्यक्रमाचे आयोजक रिझवान खान, समीर खान यांच्यासह देऊळघाट येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.