-आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी एक लाखाची मदत; पशुधनासाठी १०५ क्विंटल चारा बियाण्यांचे वाटप
चिखली (महेंद्र हिवाळे) : संभाव्य पाणीटंचाई आणि दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी चिखली विधानसभा मतदारसंघातील सर्व शासकीय यंत्रणांचा विशेष आढावा घेणारी समन्वय बैठक तहसील कार्यालय, चिखली येथे आमदार श्वेता महाले पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत ग्रामीण पाणीपुरवठा, जलजीवन मिशनची कामे, पिण्याच्या पाण्याचे स्रोत, पशुधनासाठी चाऱ्याची उपलब्धता तसेच शेतकरी कुटुंबांना मदत अशा विविध महत्त्वपूर्ण विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
या बैठकीत आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी एक लाख रुपयांच्या मदतीचे धनादेश वितरित करण्यात आले. तसेच पशुधनासाठी चारा उपलब्ध व्हावा, यासाठी शेतकऱ्यांना १०५ क्विंटल चारा बियाण्यांचे वाटप करण्यात आले. ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होऊ नये, यासाठी गावनिहाय पाणीपुरवठा योजनांचा आणि उपलब्ध जलस्रोतांचा आढावा घेण्यात आला. कोलारा, भालगाव, आंधई, हातनी, उदयनगर, किन्होळा, ब्रह्मपुरी, महिमळ, श्रीकृष्णनगर यांसह इतर गावांतील पाणीपुरवठ्याची सद्यस्थिती, उपलब्ध जलस्रोत, त्यांची क्षमता आणि आवश्यक उपाययोजनांबाबत संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून माहिती घेण्यात आली.
उदयनगरच्या पाणीपुरवठ्याबाबत आमदारांची नाराजी
उदयनगर आणि परिसरात नियमित पाणीपुरवठा होत नसल्याची बाब समोर आल्यानंतर आमदार श्वेता महाले यांनी पाणीपुरवठा विभागाच्या अभियंत्यांना जाब विचारत नाराजी व्यक्त केली. नागरिकांना नियमित पाणी मिळणे ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी आहे. त्यामुळे पाणीपुरवठ्यातील अडचणी तातडीने दूर करून नागरिकांना दिलासा देण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी, असे निर्देश त्यांनी दिले.
गावांमध्ये समन्वय बैठका घेऊन रखडलेल्या योजना मार्गी लावा
काही गावांमध्ये स्थानिक पातळीवरील समन्वयाअभावी पाणीपुरवठ्याच्या योजना रखडल्याचे निदर्शनास आले. अशा योजना मार्गी लावण्यासाठी तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांनी प्रत्यक्ष गावांमध्ये जाऊन ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी आणि संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांच्या समन्वय बैठका घ्याव्यात. स्थानिक अडचणी समजून घेऊन त्यावर तोडगा काढावा आणि पाणीपुरवठ्याची कामे विनाकारण प्रलंबित राहणार नाहीत, याची दक्षता घ्यावी, अशा सूचना आमदारांनी दिल्या.
जलजीवन मिशनच्या कामांचाही आढावा
जलजीवन मिशनअंतर्गत सुरू असलेल्या गावांमधील कामांची प्रगती, पूर्ण झालेली कामे, अपूर्ण कामांची कारणे आणि कामे पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेल्या कार्यवाहीबाबतही सविस्तर आढावा घेण्यात आला. ज्या गावांमध्ये कामे अपूर्ण आहेत, तेथील अडचणी दूर करून कामांना गती देण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.
दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासनाला सज्ज राहण्याच्या सूचना
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासनाकडून दुष्काळी परिस्थिती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत. त्या अनुषंगाने चिखली मतदारसंघातही प्रशासनाने आतापासूनच नियोजन करावे, असे आमदारांनी सांगितले. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागासह कृषी, पशुसंवर्धन आणि पाणीपुरवठा विभागांनी समन्वयाने काम करावे. पिण्याचे पाणी, शेतीसाठी आवश्यक पाणी, जनावरांसाठी चारा आणि पाणीटंचाईग्रस्त गावांसाठी पर्यायी व्यवस्था यांना प्राधान्य द्यावे. गरज पडल्यास टँकरद्वारे पाणीपुरवठ्याचे नियोजन करून शेतकरी व नागरिकांना वेळेत मदत मिळेल, याची दक्षता घ्यावी, असे निर्देशही त्यांनी दिले. आगामी काळात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये, नागरिकांना वेळेवर आणि नियमित पाणीपुरवठा व्हावा, तसेच शेतकरी आणि पशुपालकांना आवश्यक मदत मिळावी, यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे. केवळ कागदोपत्री आढावा न घेता प्रत्यक्ष परिस्थितीवर लक्ष ठेवून आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी भूमिका आमदार श्वेता महाले यांनी बैठकीत मांडली. या बैठकीला तहसीलदार विजय सवडे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत बिडगर, गटविकास अधिकारी समाधान वाघ, नायब तहसीलदार मुरलीधर गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे शंतनू बोन्द्रे, कृष्णकुमार सपकाळ, ओमसिंग राजपूत, अमोल साठे, संजय महाले, बळीराम काळे, संतोष काळे पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी व पदाधिकारी उपस्थित होते.