-पत्रकार अशोक खरात यांचा स्तुत्य उपक्रम; शाळेच्या रंगरंगोटीसाठी आर्थिक मदत देत सामाजिक बांधिलकीचा आदर्श
साखरखेर्डा (अशोक इंगळे) : आईच्या निधनाचे दुःख मनात असतानाही तिच्या स्मृती चिरंतन जपण्यासाठी समाजोपयोगी कार्याला प्राधान्य देत पत्रकार अशोक खरात यांनी स्तुत्य उपक्रम राबविला. आईच्या तेरवीच्या दिवशी शाळेच्या रंगरंगोटीसाठी ११ हजार १११ रुपयांची आर्थिक मदत देऊन त्यांनी शिंदी गावासमोर सामाजिक बांधिलकीचा आदर्श ठेवला आहे.
शिंदी येथील सरपंच सौ. साधनाताई अशोक खरात यांच्या सासूबाई आणि पत्रकार अशोक खरात यांच्या मातोश्री स्व. अनुसयाबाई आत्माराम खरात यांचे २४ ऑक्टोबर रोजी संभाजीनगर येथील सिग्मा हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान निधन झाले. त्या पंचायत समितीचे माजी उपसभापती स्व. आत्मारामबापू खरात यांच्या पत्नी तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माजी संचालक होत्या. २७ ऑक्टोबर रोजी त्यांचा रक्षाविसर्जनाचा कार्यक्रम पार पडला, तर ३ नोव्हेंबर रोजी तेरवीचा कार्यक्रम मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत साधेपणाने संपन्न झाला.
दरम्यान, शिंदी येथील जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळेचा कायापालट करण्यासाठी ग्रामस्थांनी लोकवर्गणीच्या माध्यमातून पुढाकार घेतला आहे. या उपक्रमात सहभागी होत अशोक खरात यांनी शाळेच्या रंगरंगोटीसाठी ११ हजार १११ रुपयांचा धनादेश शाळेचे मुख्याध्यापक रियाज सय्यद यांच्याकडे सुपूर्द केला. धार्मिक कार्यक्रमांवरील अनावश्यक खर्च टाळून तोच पैसा शैक्षणिक कार्यासाठी उपयोगात आणण्याचा खरात कुटुंबाचा निर्णय समाजाला सकारात्मक संदेश देणारा ठरला आहे. आईच्या आठवणी केवळ शब्दांत न ठेवता शिक्षणाच्या माध्यमातून त्या कायम जिवंत राहाव्यात, या भावनेतून केलेले हे योगदान प्रेरणादायी ठरत आहे. यापूर्वीही अशोक खरात यांनी शाळेच्या परिसरात पेव्हर ब्लॉक बसविण्यासाठी १२ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यास सहकार्य केले आहे. एवढेच नव्हे, तर शाळेच्या इतर विकासकामांसाठी पाच लाख रुपयांचा विशेष निधी मंजूर करून घेण्यातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. गावाचा शैक्षणिक आणि सर्वांगीण विकास व्हावा, ही त्यांची सातत्यपूर्ण भूमिका राहिली आहे. यावेळी अशोक खरात, डॉ. दिलीपराव खरात, अनिल खरात, सरपंच सौ. साधना खरात, सौ. शशिकला जाधव, सौ. सुनीता वैराळ, बाबुराव जाधव, विजय वैराळ आणि गंभीरराव खरात उपस्थित होते.