किनगावजट्टू (प्रतिनिधी) – येथील श्रीराम मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात येत असून, मंदिराच्या बांधकामाकरिता अयोध्या नगरी येथून एक वीट आणली गेली. या पवित्र विटेचे आगमन होताच होताच टाळ, वीणा, पखवाजाच्या निनादात भाविकांनी जयघोष केला. गावातील श्रीराम मंदिर हे गावाच्या मध्यभागी पुरातन गढीच्या जागेत असून मंदिरात प्रभू श्रीराम, सीतामाई, हनुमंत राय यांच्या पंचधातूच्या मूर्त्या आहेत. या मूर्त्या अंदाजे तीनशे वर्षांपूर्वीपासून असल्याचे सांगितले जाते.
गावातील या मंदिराची देखभाल पूर्वीपासून बिन्नीवाले परिवाराकडे आहे. येथे श्रीराम नवमीनिमित्त नऊ दिवस अन्नदान केले जाते. श्रीराम नवमीला श्रीराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. यामध्ये पंचक्रोशीतील सर्व भाविक सहभागी होतात. उत्सवानिमित्त देवीच्या झाकीसह विविध देवी देवतांच्या झाक्या काढण्यात येतात. सदर कार्यक्रमात सर्व भाविकांचे सहकार्य लाभते. दरम्यान, येथील सेवानिवृत्त शिक्षक विठ्ठलराव सानप हे श्रीराम मंदिराचा जीर्णोद्धार करीत असून, त्याकरिता श्रीराम जन्मभूमी आयोध्या नगरी येथून नंदू दिवठाणकर यांनी एक वीट आणली.
मंगळवारी या विटीचे आगमन होताच बसस्थानक परिसरात टाळ, वीणा, पखवाजाच्या निनादात भाविकाच्यावतीने जयघोष करण्यात आला. पालखी सजवून त्या एका विटाची गावातून श्रीराम जय राम जय जय राम च्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीमध्ये भजनी मंडळाचे बबन दमधडे, संजय महाजन, सखाराम राऊत, रघुनाथ सानप, सीताराम जावळे, श्रीराम बिन्नी वाले, किसन जामदार, रामप्रसाद खरात, प्रमोद तरवडे, राजू सानप, डॉक्टर बिल्लीवाले, रंगनाथ बिनीवाले, शाम बिनीवाले यांच्यासह बहुसंख्येने महिला व पुरुष सहभागी झाले होते. मिरवणूक मंदिराचे प्रांगणात आल्यानंतर त्या विटेची राजू सानप यांच्याहस्ते विधिवत पूजन करण्यात आले, यावेळी सर्व भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. शेवटी तीर्थप्रसाद वाटप करण्यात आला.