गुजरातमध्ये भाजप, हिमाचल प्रदेशात काँग्रेस!
नवी दिल्ली (आवेश तिवारी) – गुजरात व हिमाचल राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल अगदी अपेक्षित असेच लागलेले आहेत. गुजरातमध्ये भाजपला सर्वाधिक १५६ जागा मिळाल्या असून, मागील विधानसभेपेक्षा ५७ जागांची वाढ झाली आहे. तर काँग्रेसला अवघ्या १७ जागा मिळाल्या आहेत. त्यात काँग्रेसच्या ६० जागा पडल्याने काँग्रेसला मोठा फटका बसला. तर आम आदमी पक्षाला अवघ्या ५ जागांवर समाधान मानावे लागले आहे. दुसरीकडे, हिमाचल प्रदेशात सर्वाधिक ४० जागा जिंकून काँग्रेसने निर्विवाद बहुमत प्राप्त केलेले आहे. या निवडणुकीत काँग्रेसच्या १९ जागा वाढल्या असून, भाजपला २५ जागांवर समाधान मानावे लागले आहे. तर आम आदमी पक्षाला या राज्यात खातेही खोलता आले नाही.
गुजरातमध्ये भाजपचा विजय होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. काँग्रेसनेही निवडणुकीत फारसा जोर लावला नसल्याची चर्चा होती. तर, आम आदमी पक्षाने प्रचाराची राळ उडवून वातावरण निर्मिती केली होती. मात्र, भाजपने रेकोर्डब्रेक विजय मिळवत सगळ्यांनाच धक्का दिला. काँग्रेसची दाणादाण उडाली असून आम आदमी पक्षाने लक्षणीय मते घेत 5 जागांवर विजय मिळवला आहे. दरम्यान, या विजयाबद्दल महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा दिल्या आहेत. “गुजरातमधील विजयाबद्दल मी भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान मोदी यांचे खास अभिनंदन करतो. गुजरातचा विजय विक्रमी आणि ऐतिहासिक आहे” असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपला शुभेच्छा दिल्या.
गुजरातमध्ये आम आदमी पक्षाने लक्षणीय मते घेतली. गुजरातमध्ये आम आदमी पक्षाने सुमारे 13 टक्के मिळाली आहेत. या मतांमुळे आप पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून दर्जा मिळवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ‘आप’ची दिल्ली आणि पंजाबमध्ये सत्ता असून गोवा विधानसभा निवडणुकीतही लक्षणीय मते घेतली होती. आता, गुजरातमध्येही 13 टक्के मते घेतलीत. त्याशिवाय, दिल्ली महापालिका निवडणुकीच्या निकालात ‘आप’ने बाजी मारली.
दरम्यान, आज हिमाचल प्रदेशचा निकाल लागला. काँग्रेसने ही हिमाचल प्रदेशमध्ये मजल मारली आहे. तसेच उद्या सोनिया गांधी यांचा वाढदिवस आहे. सोनिया यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना हे मोठं गिफ्ट भेटलं असल्याच्या चर्चा आता सुरू झाल्या आहेत. आजच हिमाचलमध्ये सत्तापालट आणि उद्या सोनिया गांधी यांचा वाढदिवस हे सर्व जुळून आले आहे. तर सोनिया गांधी यांचा वाढदिवस उद्या 9 डिसेंबर रोजी रणथंबोर येथे राहुल गांधी, मुख्यमंत्री अशोक गेहलोत, पीसीसी प्रमुख गोविंद सिंग दोतासरा, माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट, प्रभारी सुखजिंदर सिंग रंधावा यांच्यासोबत साजरा करणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही गुजरात आणि हिमाचलच्या निवडणुकांवर प्रतिक्रिया व्यक्त केली. गुजरातच्या निकालांवर ते म्हणतात, “सगळ्या कार्यकर्त्यांना माझं एकच सांगणं आहे- तुम्ही सगळे चॅम्पियन आहात. या कार्यकर्त्यांच्या मेहनतीशिवाय हे शक्य नव्हते. हे कार्यकर्ते पक्षाची खरी ताकद आहेत. हिमाचलच्या निकालांवर ते म्हणतात, “भाजपबदद्ल जे प्रेम हिमाचल प्रदेशच्या लोकांनी दाखवलं त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. येणाऱ्या काळात राज्यातील लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही काम करत राहू.”
या निर्णायक विजयासाठी मी हिमाचलच्या जनतेचे मनापासून आभार मानतो असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं आहे. सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांचं आणि नेत्यांचं अभिनंदन. तुमच्या कष्ट आणि समर्पणाने हा विजय झाला आहे. जनतेला दिलेली वचनं आण्ही पूर्ण करू हे आश्वासन मी पुन्हा देतो. आम्ही गुजरातच्या लोकांचा जनादेश आम्ही स्वीकार करतोय. आम्ही पुनर्गठन करून आणखी कष्ट घेऊ आणि तिथल्या लोकांच्या हक्काची लढाई लढत राहू असंही ते म्हणाले.
मल्लिकार्जुन खरगे यांनी हिमाचल प्रदेशच्या जनतेचे आभार मानले आहेत. आमच्या सर्व कार्यकर्त्यांचे आणि पदाधिकाऱ्यांचे आभार. लोकशाहीत जय-पराजय होतच असतो. गुजराचतच्या जनतेच्या जनादेश आम्ही स्वीकार करतो. विचारधारेत कोणतीही तडजोड न करता आम्ही लढत राहू आणि ज्या उणीवा आहेत त्या दूर करू असंही ते म्हणाले.