– गावाला निधी देऊनही पाणी पुरवठा योजना झाली नसल्याने तीव्र संताप!
चिखली (विशेष प्रतिनिधी) – मंगरूळ गावाच्या ग्रामविकास अधिकार्याने वर्षभरात एकही ग्रामसभा न घेता, आता अलिकडे तीस दिवसांत तीन ग्रामसभा घेण्याचा विश्वविक्रम प्रस्थापित केलेला आहे. गावाची पाणी समस्या गंभीर झाली असून, आमदार तथा माजी पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी पाणी योजनेसाठी निधी देऊनही गावाला पाणी योजना मिळालेली नाही. संबंधित ग्रामविकास अधिकारी, गावाचे पुढारी यांच्याबद्दल ग्रामस्थांत तीव्र संतापाची लाट निर्माण झालेली आहे.
सविस्तर असे, की विदर्भातील चिखली व मराठवाड्यातील जाप्रâाबाद तालुक्याच्या सीमेवर असलेले मंगरूळ हे गाव विकासापासून कोसो दूर आहे. येथील ग्रामविकास अधिकारी यांनी बारा महिन्यापासून एकही ग्रामसभा घेतली नाही. परंतु तीस दिवसांमध्ये तीन ग्रामसभा घेण्याचा विक्रम केला आहे. ११ नोव्हेंबररोजी ग्रामविकास अधिकारी यांनी मंगरूळ येथे ग्रामसभा बोलावली. परंतु गावातील लोकांचा रोष पाहून सदर ग्रामसभा ही रद्द करण्यात आली होती. त्यानंतर १६ नोव्हेंबररोजी ग्रामसभा घेण्यात आली. त्यामध्ये तंटामुक्ती अध्यक्ष यांची निवड करण्यात आली. गावामध्ये पाण्याची व्यवस्था नाही, तसेच गावातील खांब्यावर लाईटची व्यवस्था नाही, महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी मंगरूळ गावाला ५३ लाखाची योजना दिली. परंतु गाव पुढारी आणि ग्रामविकास अधिकारी व संबंधित ठेकेदार यांच्या संगणमताने सदर योजना ही बारगळली असून, गावामध्ये आजरोजी पिण्याची पाण्याची व्यवस्था नाही. गावातील लोकांना पिण्याचे पाणी हे गावातील पाणवठ्यावरून किंवा विहिरीतून काढून डोक्यावरून आणून वापरावे लागते. ग्रामविकास अधिकारी यांनी बारा महिन्यात एकही ग्रामसभा न घेण्याचा विक्रम तर केलाच. परंतु, तीस दिवसांमध्ये तीन ग्रामसभा घेण्याचे कारण काय, असा प्रश्न मंगरूळ येथील ग्रामस्थांना पडला आहे. मंगरूळचे ग्रामविकास अधिकारी हे तालुक्याच्या ठिकाणाहून ये जा करत असल्यामुळे लोकांचे तसेच शाळेचे संबंधित कामे प्रलंबित असल्याची ओरडदेखील होत आहे.
—————–