लोणार (तालुका प्रतिनिधी) – लोणार तालुक्यातील पिंप्री खंदारे येथील सामाजिक कार्यकर्ते परमेश्वर उगलमुगले यांनी उत्कृष्ट दर्जाच्या रस्त्यासाठी सुरू केलेल्या उपोषणाची सांगता लेखी आश्वासनाने आज (दि.7) सकाळी १० वाजेदरम्यान झाली आहे.
लोणार या पर्यटनस्थळाला मेहकर-जालना महामार्गावर जोडणार्या रस्त्याचे झालेले निकृष्ट दर्जाचे काम उत्कृष्ठ व्हावे, यासाठी पिंप्री खंदारे येथील सामाजिक कार्यकर्ते परमेश्वर उगलमुगले यांनी दि. ०५ डिसेंबरपासून आमरण उपोषण सुरू केले होते. उपविभागीय उपअभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग देऊळगावराजा बी एन काबरे यांनी त्यांच्या सर्व मागण्या लेखी आश्वासन देऊन मान्य केल्या आहेत. त्यामुळे त्यांनी दि. ५ डिसेंबररोजी सुरू केलेले उपोषण तूर्तास स्थगित केले आहे. आज सकाळी १० वाजे दरम्यान जिल्हा परिषदेचे माजी सभापती अभयदादा चव्हाण, गावातील ज्येष्ठ नागरिक श्री कटारे, व उपअभियंता श्री काबरे साहेब यांच्याहस्ते लिंबूशरबत प्राशन करुन त्यांनी उपोषण सोडले. उपोषणस्थळी गावचे सरपंच प्रतिनिधी म्हणून प्रकाशभाऊ चौधर, अनिल गवई, सह गावातील बरेचसे नागरिक व पत्रकार रमेश खंडागळे, सुधाकर डोंगरदिवे, बाळू जाधव व हिवरा खंड येथील हसन भाई व इतर अनेक नागरिक हजर होते.