मिसाळवाडीच्या सरपंचपदी विनोद तथा बाळू पाटील बिनविरोध, औपचारिक घोषणा फक्त बाकी!
– सर्व ग्रामपंचायत बिनविरोध करण्यावर मिसाळवाडी ग्रामस्थांचे एकमत!
चिखली (एकनाथ माळेकर) – ग्रामपंचायत निवडणुकांची जोरदार रणधुमाळी पेटत असताना, संपूर्ण राज्यात मुलींच्या सर्वोत्तम जन्मदरामुळे नावाजलेल्या मिसाळवाडी ग्रामपंचायतीने पुन्हा एक आदर्श प्रस्तुत केला आहे. विद्यमान सरपंच विनोद तथा बाळू पाटील यांच्या नेतृत्वावर सर्वानुमते शिक्कामोर्तब करत, त्यांना बिनविरोध निवडून देण्याचा निर्धार आज झालेल्या ग्रामस्थांच्या बैठकीत व्यक्त करण्यात आला. त्यामुळे बाळू पाटील यांची विजयी घोषित होण्याची फक्त प्रशासकीय औपचारिकता बाकी उरली आहे. तसेच, संपूर्ण ग्रामपंचायत बिनविरोध करण्यावर ग्रामस्थांचे एकमत झाले असून, उपसरपंचपदही बिनविरोध केले जाणार आहे, तसेच सर्व सदस्यही बिनविरोध केले जाणार असून, याउपरही कुणी अर्ज दाखल केलाच तर त्याचे डिपॉजिट जप्त होईल, अशी एकजूट दाखविण्याचा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केलेला आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतीची बिनविरोध निवडणुकीची फक्त औपचारिकता उरली असून, अशा प्रकारे बिनविरोध होणारी मिसाळवाडी ही जिल्ह्यातील पहिलीच ग्रामपंचायत ठरली आहे.
मिसाळवाडी ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच बाळू पाटील यांच्या नेतृत्वात आज ग्रामस्थ व प्रमुख विरोधक यांची एकत्रित बैठक संत गजानन महाराज मंदीर येथे पार पडली. या बैठकीत गावातील एकोपा कायम रहावा, मिसाळवाडी हे आदर्श गाव म्हणून राज्यभरात नावारुपाला आले असून, हा लौकिक कायम टिकला पाहिजे. वैयक्तिक हेवेदावे व राजकारण बाजूला सारून आपण ग्रामपंचायत बिनविरोध करावी, अशी भावना सर्वांनी व्यक्त केली. त्याला सरपंच बाळू पाटील व प्रमुख विरोध हनुमान मिसाळ यांच्यासह गावातील ज्येष्ठ नागरिक व तरुणवर्गाने मोठ्या प्रमाणात समर्थन दिले. त्यानुसार, सरपंच पदासह सर्व ग्रामपंचायत बिनविरोध करण्याचे सर्वानुमते ठरले. त्यानुसार, सरपंचपदासाठी बाळू पाटील यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
बाळू पाटील यांच्या नेतृत्वात गावाचा चांगल्या प्रकारे विकास झाला असून, ते सर्व जाती-धर्माच्या लोकांना सोबत घेऊन काम करतात. अडल्यानडल्यांच्या मदतीला धावून जातात. तसेच, त्यांच्याच कार्यकाळात गावाचा विविध माध्यमांतून राज्यभर लौकिक पसरला आहे, त्यामुळे त्यांना सरपंचपदी बिनविरोध निवडून देण्यावर सर्व ग्रामस्थांनी शिक्कामोर्तब केले. तसेच, उपसरपंचासह इतर सदस्यांच्या जागादेखील बिनविरोध निवडून देण्याचे एकमताने ठरविण्यात आले आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतीची बिनविरोध निवडणुकीची प्रशासकीय घोषणेची फक्त औपचारिकता उरलेली आहे.
सर्व ग्रामस्थ व सरपंच बाळू पाटील यांच्यासह विरोधकांनी ग्रामपंचायत बिनविरोध करण्याचे निश्चित केलेले आहे. याउपरही कुणी अर्ज टाकून गावातील वातावरण खराब करण्याचा प्रयत्न केला तर, त्याचे डिपॉझिट जप्त होईल, इतक्या मताधिक्क्याने त्याला पाडायचे, असा निर्धार ग्रामस्थांसह वरिष्ठ नेतृत्वाने व्यक्त केलेला आहे.
—————-