– पोलिस अधीक्षक संजय बारकुंड यांची माहिती
धुळे (ब्युरो चीफ) – मदतीच्या बहाण्याने वाहनचालकांना लुटणार्या महिला व टोळीला आझाद नगर पोलिसांनी जेरबंद केले आहे. लूट करताना वापरलेले चाकू, लाकडी, दांडा, मिरचीपूड, लोखंडी पाईप व चार दुचाकीदेखील पोलिसांनी जप्त केली असून, या टोळीत अजून काही संशयितांचा समावेश असल्याचे सांगत लवकरच संपूर्ण टोळीला जेरबंद करणार असा विश्वास पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
महामार्गावर वाहनांना थांबवून मदत मागणार्या महिलेसह तिच्या टोळीने मंगळवारी रात्री पारोळा चौफुलीवर चालकास मारहाण करून पैश्यांसह मोबाईल पळवला. याचदरम्यान आझाद नगर पोलिसांच्या गस्ती पथकाला संबधित चालकाने घडलेली हकीकत सांगितली. पथकाने तत्काळ वरिष्ठांना माहिती देत संशयित महिलेला ताब्यात घेतले. यावेळी मारहाण करून लुटलेल्या चालकाचा मोबाईल महिलेच्या ताब्यात मिळून आल्याने पोलिसांनी संबधित महिलेस बोलते करत तिच्या ७ साथीदारांना रात्रीच ताब्यात घेतले. सदर कारवाई पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, उपअधीक्षक किशोर काळे, सहाय्यक पोलिस अधीक्षक ऋषिकेश रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली आझाद नगर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रमोद पाटील यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक पावरा, महिला पोलिस उपनिरीक्षक लक्ष्मी करणकाळ, हेड कॉन्स्टेबल शकील शेख, प्रकाश माळी, आरिफ सैय्यद, राजेंद्र ढीसले, योगेश शिंदे, संदिप कढरे, संतोष घुगे, शोएब बेग, आतिक शेख, एस एन मोरे, सुशील शेंडे, यांच्या पथकाने केली.
—————