Breaking newsHead linesMaharashtraPune

प्रसिद्ध साहित्यिक, माजी कुलगुरू डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांचे निधन

पुणे (प्रतिनिधी) – डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू, ज्येष्ठ साहित्यिक, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष आणि प्रसिद्ध समीक्षक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले (वय ७५) यांचे दीर्घ आजाराने बुधवारी दुपारी पावणेदोनच्या सुमारास निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, कन्या, सून व नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. गेल्या दोन दिवसांपासून ते आजारी असल्याने त्यांच्यावर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र आज त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच त्यांचे निधन झाले.

मराठी ग्रामीण साहित्यात डॉ. कोतापल्ले यांचे मोठे योगदान आहे. ग्रामीण कथालेखक, कादंबरीकार, कवी, समीक्षक अशी त्यांची ओळख आहे. ‘राजधानी’, ‘वारसा’, ‘सावित्रीचा निर्णय’ या त्यांच्या दीर्घकथा प्रसिद्ध आहेत. ‘गांधारीचे डोळे’, ‘मध्यरात्र’, ‘पराभव’ या त्यांच्या कादंबर्‍या मनाचा ठाव घेणार्‍या आहेत. महात्मा फुले यांज्या जीवनावरील डॉ. कोत्तापल्ले यांचा ‘ज्योतीपर्व’ हा ग्रंथ त्यांच्या सामाजिक व परिवर्तनवादी विचारांची साक्ष देतो. साहित्यसेवा करतानाच त्यांच्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूपदाची जबाबदारी देण्यात आली. ही जबाबदारीही त्यांनी यशस्वीपणे पार पाडली.

नागनाथ कोत्तापल्ले यांचा जन्म २९ मार्च १९४८ या दिवशी नांदेड जिल्ह्यातील मुखेड येथे झाला होता. शालेय शिक्षण मुखेडच्या जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये आणि बीए मराठीचे शिक्षण देगलूर महाविद्यालय येथे त्यांनी पूर्ण केले होते. त्यामध्ये ते मराठवाड्यात तिसरे तर मराठी विषयात प्रथम आले होते. त्यांनी १९८० मध्ये औरंगाबादमधील मराठवाडा विद्यापीठातून डॉ. यु. म. पठाण यांच्या मार्गदर्शनाने ‘शंकरराव पाटील यांच्या साहित्याचा चिकित्सक अभ्यास’ या विषयावर पीएचडी केली होती. नागनाथ कोतापल्ले १९७७ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात प्राध्यापक होते. त्यानंतर ते पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख म्हणूनही त्यांनी यशस्वी कारकीर्द पार पाडली होती. २००५ ते २०१० पर्यंत त्यांनी मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू म्हणूनही काम पाहिले होते.

नागनाथ कोत्तापल्ले यांनी नॅक, राज्य मराठी विकास संस्था, साहित्य अकादमी, राज्य ग्रंथ पुरस्कार समिती, बाल पुरस्कार समिती आणि एसएससी बोर्डाच्या मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष पदावर त्यांनी काम केले होते. त्याचबरोबर नागनाथ कोतापल्ले हे १९८८ ते ९५ या काळात मराठवाडा साहित्य परिषदेचे कार्यवाह, १९९५ ते ९६ मध्ये साहित्य महामंडळाचे कोषाध्यक्ष आणि साहित्य संस्कृती मंडळाच्या मराठी वाङ्मयकोशाचे समन्वय संपादकही होते. तसेच ‘प्रतिष्ठान’ या नियतकालिकाचे संपादक म्हणूनही त्यांनी वैविध्यपूर्ण काम केले होते.
मुंबईतले युवक साहित्य संमेलन, श्रीगोंद्यात आठवे ग्रामीण साहित्य संमेलन आणि कराडजवळ उंडाळे येथील साहित्य संमेलन, पुण्यातील पहिले औंध उपनगरीय मराठी साहित्य संमेलन २००३ राज्यस्तरीय सूर्योदय मराठी साहित्य संमेलन इत्यादी संमेलनांची अध्यक्षपदे नागनाथ कोतापल्ले यांनी भूषविली आहेत.

डाॅ. कोत्तापल्ले यांना 14 नोव्हेंबर रोजी विषाणू संसर्गाचे निदान झाल्याने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्रास वाढल्याने त्यांना अतिदक्षता विभागात हलवण्यात आले. कृत्रिम श्वासोच्छ्वास यंत्रणेचा आधार त्यांना देण्यात आला होता. दोन दिवसांपासून ते अत्यवस्थ होते. अखेरीस बुधवारी त्यांची प्राणज्योत मालवली.
——————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!