गूड न्यूज! पोलिस भरतीचे अर्ज भरण्यासाठी १५ दिवसांची मुदतवाढ!
– १८ हजार जागांसाठी आतापर्यंत आलेत ११.८० लाख अर्ज
मुंबई (प्राची कुलकर्णी) – राज्यात पोलिस भरतीची तयारी करत असलेल्या तरुणांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील पोलिस भरतीबाबत मोठी घोषणा केली असून, आता अर्ज भरण्यासाठी आता १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. फडणवीस यांनी यासंदर्भात ट्वीट करत माहिती दिली आहे. राज्यातील पोलिस भरतीसाठी अर्ज सादर करण्यास १५ डिसेंबर २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून, आतापर्यंत ११.८० लाख अर्ज प्राप्त झाले असल्याचे देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
महाराष्ट्र पोलिस खात्याअंतर्गत पोलिस शिपाई, चालक अशा सुमारे १८ हजार पदांसाठी सध्या भरती प्रक्रिया सुरू आहे. उमेदवारांना अर्ज करण्यासाठी ३० नोव्हेंबर ही अखेरची तारीख देण्यात आली होती. मात्र, अर्ज करण्यासाठी शेवटचे काही तास शिल्लक राहिलेले असताना ऑनलाइन अर्ज करण्यासाठीची वेबसाइट सतत हँग होणे किंवा सर्व्हर डाउन होणे, अशा विविध समस्यांना उमेदवारांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे पोलिस भरती अर्ज भरण्यासाठी १५ दिवसांची मुदतवाढ द्यावी, अशी मागणी आमदार धनंजय मुंडे यांनी ट्वीटद्वारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. त्याची दखल आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली असून, अर्ज भरण्यास मुदतवाढ दिली आहे.
पोलिस भरतीचे नोटिफिकेशन निघाल्यानंतर नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र कोणत्या वर्षीचे सादर करावे, याबाबत उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचा बराच वेळ वाया गेला. तो संभ्रम दूर झाल्यानंतर अर्ज करणार्या विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे किंवा तांत्रिक बाबी सांभाळणार्या एजन्सीच्या चुकीमुळे आता तांत्रिक अडचणी येत आहेत, असेही धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केले होते.
दरम्यान, अर्ज सादर करण्यातील अडचणी, विविध प्रमाणपत्र व भूकंपग्रस्त उमेदवारांना अर्ज करण्यासाठी वेळ मिळावा, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलेले आहे. पुढील काही दिवसात राज्यात जवळपास २० हजार पोलिस भरती केली जाणार असून, यासाठी अर्ज मागवण्यात आले होते. उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी शेवटची तारीख ३० नोव्हेंबर आहे. दरम्यान, पोलिस भरती प्रक्रियेसाठीच्या राज्य शासनाच्या वेबसाईटमध्ये अनेक तांत्रिक अडचणी येत होत्या. या पार्श्वभूमीवर उमेदवारांकडून या भरतीसाठी अर्ज करण्यास मुदत वाढ द्यावी, अशी मागणी उमेदवारांकडूनदेखील केली जात होती.
——————