रविकांत तुपकरांच्या ठिय्या आंदोलनाचा दणका; २५ हजार शेतकर्यांचे रिजेक्ट केलेले ‘क्लेम रीडिसाईड’ करण्यास पीकविमा कंपनी तयार!
– वस्तूनिष्ठ पंचनाम्यांच्याआधारे भरीव रक्कम जमा करा – रविकांत तुपकर
बुलढाणा (एकनाथ माळेकर) – शेतकर्यांच्या पीकविम्यात फसवणूक करून कोट्यवधींचा मलिदा लाटणार्या एग्रिकल्चर इन्सुरन्स कंपनीविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर हे चांगलेच आक्रमक झाले असून, तातडीने पैसे जमा केले नाही तर आक्रमक आंदोलनाचा इशारा दिला आहे. काल (दि.२८) कृषी अधीक्षक कार्यालयात केलेल्या धडक आंदोलनामुळे कंपनीने २५ हजार शेतकर्यांचे रिजेक्ट केलेले ‘क्लेम रीडिसाईड’ करण्याचे मान्य केले असून, तसे पत्र जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयास दिले आहे. तर पीकविम्यापोटी तोकडी रक्कम मिळालेल्या शेतकर्यांना वस्तूनिष्ठ पंचनाम्यांच्या आधारे भरीव रक्कम जमा करण्याची मागणी तुपकर यांनी लावून धरलेली आहे.
स्वतः कोट्यवधी रुपयांचा मलिदा खाऊन शेतकर्यांच्या खात्यात अत्यल्प रक्कम जमा करुन शेतकर्यांची क्रूरथट्टा करणार्या पीकविमा कंपन्यांना काल रविकांत तुपकर व संतप्त शेतकर्यांनी चांगलाच धडा शिकवला. शेकडो कोटींचा अपहार करणार्या पिकविमा कंपन्यांविरोधात आक्रमक होत, जिल्हा बुलडाणा कृषी अधीक्षक यांच्या कार्यालयात धडक देत तुपकर यांनी ठिय्या मांडला होता. यावेळी जिल्हा कृषी अधीक्षक संतोष डाबरे व एआयसी पीकविमा कंपनीचे जिल्हा कॉर्डिनेटर दिलीप लहाने यांना चांगलेच धारेवर धरले. कंपनीच्या अधिकार्यांनी केलेला काळाबाजार उघडकीस आणला. दुपारी १२ वाजेपासून सायंकाळी ६ वाजेपर्यंत चाललेल्या या आक्रमक आंदोलनामुळे अखेर पीकविमा कंपनी नरमली व जिल्ह्यातील रिजेक्ट केलेल्या २५ हजार शेतकर्यांचे क्लेम रीडिसाईड करण्याचे कंपनीने मान्य केले, व तसे लेखी पत्र दिले.
परंतु, पिकविम्या पोटी तोकडी रक्कम मिळालेल्या शेतकर्यांना वस्तुनिष्ठ पंचनाम्याच्या आधारे भरीव रक्कम जमा करण्याची मागणी आक्रमकपणे तुपकर व शेतकर्यांनी लावून धरलेली आहे. त्याबाबतीत कंपनीने अजून निर्णय घेतला नाही, तरी शेतकर्यांनी तालुका कृषी अधिकारी व विमा कंपनीचे अधिकारी यांच्याकडे ऑफलाईन तक्रार देवून त्याची रिसिव्हड (पोच) घ्यावी. त्यासाठी आमचा पाठपुरावा चालूच असणार आहे, असे आवाहन रविकांत तुपकर यांनी केलेले आहे. तसेच आमच्या आक्रमक पवित्र्यानंतर कृषी विभागाने कृषी विभागाची व शेतकर्यांची फसवणूक केल्याने एआयसी पिकविमा कंपनीच्या मुंबई व बुलढाण्यातील अधिकार्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी शहर पोलीस ठाण्यात रितसर तक्रार देऊन गुन्हा दाखल करण्याची प्रकिया चालू केली. सर्व शेतकर्यांना न्याय मिळेपर्यंत आमचा लढा सुरूच राहील, असेही तुपकर यांनी सांगितले.
दरम्यान, पीकविमा कंपनीने ज्या शेतकर्यांचे क्लेम रिजेक्ट केले, त्या शेतकर्यांनी पीकविमा नुकसानीबाबत तक्रारी दाखल करण्यास सुरुवात केली असून, आज दिवसभर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते विनायक सरनाईक हे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय येथे तळ ठोकून होते. संपूर्ण जिल्हाभरातून मोठ्या प्रमाणात तक्रारी दाखल होत असल्याने, जिल्ह्यातील पीकविमा देण्यात कंपनीने केलेल्या शेतकर्यांच्या फसवणुकीचा आकडा काही कोटींच्या घरात जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
—————-