लोणार (तालुका प्रतिनिधी) – तालुक्यातील मांडवा येथे अज्ञात चोरट्यांनी घर फोडून सुमारे ७० हजार रुपये रोख, चार तोळे सोने चोरून नेल्याची खळबळजनक घटना आज सकाळी उघडकीस आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडालेली आहे.
मांडवा येथील पंढरी आश्रुबा नागरे (वय ४०) यांच्या घरी दिनांक २८ नोव्हेंबरच्या रात्री दोन वाजेच्या सुमारास अज्ञात चोरटे आले. त्यांनी घर फोडून घरातील ७० हजार रुपये रोख, चार तोळे सोने चोरून नेले. पंढरी नागरे हे हॉटेल व्यावसायिक आहेत. ते सकाळी उठले असता त्यांना घराचा दरवाजा उघडा दिसला. त्यांनी घरात जाऊन पाहिले असता, घरामध्ये सर्व सामान अस्ताव्यस्त दिसले. चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ बीबी पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत, पंचनामा केला व श्वान पथकाच्या सहाय्याने माग शोधण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हे दाखल केले असून, अधिक तपास ठाणेदार डीएल तावरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी करत आहेत.
——————-