कापूस, सोयाबीन आंदोलन पेटले, पोलिसांच्या नोटिसीनंतरही रविकांत तुपकर अरबी समुद्रातील जलसमाधी आंदोलनावर ठाम!
– तुपकरांसाठी माजी मंत्री सुबोध सावजी मैदानात, पोलिसांनो, तुपकरांना दिलेली नोटीस मागे घ्या, शेतकर्यांचा आवाज दाबू नका – सावजी
बुलढाणा (एकनाथ माळेकर) – सोयाबीनला एका क्विंटलमागे ६ हजार रुपये, तर कापसाला १२,५०० रुपये हमीभाव द्यावा, यासह इतर मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्पेâ उद्या (दि.२४) अरबी समुद्रात जलसमाधी आंदोलन करण्यात येत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर हे आज आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह मुंबईकडे रवाना झाले असून, अरबी समुद्रातील आमची प्रेते पाहून तरी मंत्रालयात बसलेल्या सरकारचे डोळे उघडतील, अशी घणाघाती टीका तुपकर यांनी केली आहे. दरम्यान, तुपकर यांना मुंबईच्या सीमेवर रोखले जाणार असल्याची माहिती हाती आली आहे.
रविकांत तुपकर म्हणाले, की अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकर्यांच्या मागण्यांकडे हे सरकार लक्ष देत नाही. त्यामुळे राज्यभरातील शेतकरी आत्महत्या करत आहेत. सरकारला आमची प्रेतच पहायची असतील तर आता अरबी समुद्रात पहा. मंत्रालयाच्या खिडकीतून तुम्ही हे दृश्य पहा, असा निर्वाणीचा इशारा शेतकरी नेते रविकांत तुपकरयांनी दिला आहे. बुलढाण्यातील हजारो शेतकरी आता मुंबईच्या दिशेने निघाले असून, अरबी समुद्रात हे शेतकरी जलसमाधी आंदोलन करणार आहेत. विशेषतः सोयाबीन आणि कापसाला योग्य भाव द्यावा, नुकसान भरपाई मिळावी, अशा मागण्या शेतकर्यांच्या आहेत.
६ नोव्हेंबरला आम्ही बुलढाण्यात ५० हजार शेतकर्यांनी मोर्चा काढला. आमचं जगणं मान्य करा, अशी हाक सरकारला दिली. सरकारला आमचे प्रेतच पहायची असतील तर ती अरबी समुद्रात पहावीत, आम्ही हजारो शेतकरी मुंबईच्या दिशेने निघालो आहोत. सरकार निगरगठ्ठ झालं आहे. सोयाबीन उत्पादक शेतकरी ५० टक्के आहे तर कापूस उत्पादक शेतकरी १८ टक्के आहे. ६८ टक्के शेतकर्यांच्या भावनेशी खेळ खेळण्याचं काम सरकार करतंय, अशी टीकाही तुपकर यांनी केली आहे.
—————–
पीक विमा कंपन्यांनी फसवले
तुपकर म्हणाले, शेतकरी 68 टक्के शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत आहे. सरकार निगरगट्ट झाले आहे. सरकारला आमची प्रेतेच बघायची असतील तर बघून घ्यावी. पीक विमा कंपन्यांनीही शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. नियमीत हफ्ते भरूनही शेतकऱ्यांना विमा मिळत नाही. शेतीला दिवसा वीज द्यावी, अशी आमची मागणी आहे. मात्र, सरकारने अजून यावर निर्णय घेतलेला नाही.