आळंदीत उद्यापासून ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा
आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : अलंकापुरीतील माऊलींचे मंदिराच्या महाद्वार प्रवेशद्वारात श्रीगुरू हैबतरावबाबांच्या पायरी पूजनाने संत ज्ञानेश्वर महाराजांचे ७२७ व्या संजीवन समाधी दिन सोहळ्याअंतर्गत कार्तिकी यात्रेतील वार्षिक उत्सवा गुरुवारी ( दि.१७ ) पायरी पूजनाने सुरुवात होत आहे. अशी माहिती माऊलींच्या पालखी सोहळ्याचे मालक ह्.भ.प. बाळासाहेब महाराज आरफळकर, आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त योगेश देसाई यांनी दिली. ७२७ व्या संजीवन समाधी दिन सोहळ्यातील श्री गुरुहैबतराव बाबा पायरी पूजन, तत्पूर्वी श्रीना पवमान अभिषेख, दुधारती, भाविकांचे श्रींचे चल पादुकांवर महापूजा, महानैवेद्य, श्रींचे दिंडीची मंदिर प्रदक्षिणा, विना मंडपात परंपरेने योगीराज ठाकूर व बाबासाहेब आजरेकर यांचे वतीने कीर्तन सेवा, धुपारती, गुरुवार निमित्त नित्य नैमित्तिक श्रींचे पालखीची मंदिर प्रदक्षिणा, शेजारती त्यानंतर हैबतरावबाबा पायरीपुढे ह.भ.प.वास्कर महाराज, मारुतीबुवा कराडकर, हैबतराव आरफळकर यांचे वतीने परंपरेने हरीजागर सेवा होणार असल्याची माहिती व्यवस्थापक माऊली वीर यांनी दिली.
सोहळ्यात पहाटे नैमित्तिक घंटानाद , पवमान अभिषेक , पालखी सोहळ्याचे मालक राजाभाऊ आरफळकर,बाळासाहेब आरफळकर व आरफळकर परिवार यांचे हस्ते श्रीगुरू हैबतबाबांच्या पायरीचे पूजन धार्मिक मंगलमय वातावरणात होणार आहे. या प्रसंगी आळंदी देवस्थानचे पदाधिकारी, आळंदी पालिका, प्रशासन, महसूल, पोलीस प्रशासन तसेच श्रीचे मानकरी, सेवक,नागरिक आणि भाविक उपस्थित रहाणार आहेत. श्रींचे पुजारी वेदमंत्रोच्चारात पायरी पूजन धार्मिक विधी होईल. कार्तिकी यात्रेस राज्यभरातून हजारो भाविक आळंदीत दाखल झाले आहेत. यामुळे अलंकापुरीत भक्तिरसाला उधाण आलेले सर्वत्र पाहण्यास मिळत आहे. श्रीगुरू हैबतरावबाबांची पुण्यतिथी असल्याने मंदिरातील हैबतबाबा ओवरीत पूजा केली केली जाणार आहे. हैबतबाबांचे दिंडीची मंदिर व नगरप्रदक्षिणा होईल. भाविक आळंदीत दाखल झाल्याने अलंकापुरी भक्तिरसात चिंब होताना भाविक अनुभवतात. दरम्यान माउलींच्या चल पादुकांवर भक्तांकडून महापूजा होणार आहेत. मंदिरात श्रीचे दर्शनास भाविकांची गर्दी होत आहे. ज्ञानेश्वरीच्या पारायण प्रती भाविकांसाठी मोठ्या संख्येने मिळतील अशी व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती व्यवस्थापक माऊली वीर यांनी दिली.
यात्रेत आळंदी साठी पीएमपीएमएल तसेच एस.टी. च्या वतीने जास्त बसेस सोडल्या जातात. मात्र यात्रे तील तिकीट दर वाढ न करता भाविकांना सार्वजनिक वाहतूक सेवेने प्रवास सेवा उपलब्ध करून देण्याची मागणी आळंदी जनहित फाउंडेशनच्या वतीने सल्लागार बाळासाहेब पेटकर , अध्यक्ष राजेंद्र घुंडरे यांनी केली आहे. प्रवासी दरात कोणत्याही प्रकारची दरवाढ करू नये. राज्य परिवहन सेवा आणि पुणे पीएमपीएमएल च्या वतीने कार्तिकी यात्रा काळात भाविकांना जादा बसगाड्या सोडण्यात येणार आहेत. यात रात्री देखील गरजेनुसार बससेवा पुरविण्यात येणार आहेत.या बसगाड्या स्वारगेट, हडपसर, पुणे रेल्वे स्थानक, महापालिका भवन, निगडी, पिंपरी, चिंचवड, देहूगाव, भोसरी, रहाटणी आदी स्थानकां वरून सुटतील.ही सेवा रात्री १२ वाजेपर्यंत उपलब्ध असेल.रात्री १० नंतर नियमित तिकीट दरांपेक्षा जास्त दर आकारणी करू नये अशी मागणी भाविकांतून जोर धरत आहे. भाविकांना सुट्टे पैशामुळे गैरसोय होणार नाही. यासाठी यात्रा नियोजनात दखल घेण्यात यावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
यात्रा काळात श्रीचे देवदर्शनास आलेल्या वारकरी-भाविक आणि नागरिक यांचे सेवा सुविधांना तसेच सुरक्षेस प्राधान्य देत आळंदी देवस्थानने व्यवस्था प्रमुख विश्वस्त योगेश देसाई, विश्वस्त विकास ढगे पाटील, लक्ष्मीकांत देशमुख विश्वस्त मंडळाचे नियंत्रणात केली असल्याची माहिती व्यवस्थापक माउली वीर यांनी दिली. माउली मंदिरात विविध सेवांसाठी स्वयंसेवक नेमण्यात आले आहेत. दर्शनबारीतील वृद्ध आणि अपंगांसाठी फायबरची शौचालये उभारण्यात आली आहेत. याशिवाय नवीन दर्शनबारीत देखील भाविकांना विविध सेवा आणि सुलभ दर्शन होईल यासाठी नियोजन करण्यात आले आहे. तसेच भाविकांसाठी देवस्थानच्या वतीने सुलभ शौचालये, पिण्याचे पाणी, संरक्षित कठडे,कमी वेळेत जास्तीत जास्त भाविकांचे सुरक्षित दर्शन होईल असे नियोजन झाले आहे.
देवस्थानने वॉकी टॉकी वापर, मंदिर व दर्शनबारीत अधिकचे सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. मंदिरात धातुशोधक यंत्रणा बसविण्यात येत आहे. यात्राकाळात भाविकांना मंदिरात कोणतीही चीजवस्तू अथवा सामान सोबत नेता येणार नाही. वारीसाठी देवस्थानने सर्व विश्वस्तांच्या तसेच पुणे जिल्हा प्रशासनाचे सूचना प्रमाणे नियोजन केल्याची माहिती वीर यांनी दिली. कार्तिकी वारीच्या तयारीबाबत माहिती देताना वीर यांनी सांगितले,की देवस्थानकडून वारीची तयारी अंतिम झाली आहे.
इंद्रायणी काठच्या परिसरात तात्पुरत्या स्वरूपातील दर्शनबारी उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. दर्शनबारीत भाविकांना स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून मोफत चहा आणि नाश्टा देण्यात येणार आहे. याचबरोबर रांगेतील भाविकांना पिण्याच्या पाण्याची तीरावर भाविकांना माउलींच्या समाधीचे दर्शन घेता यावे यासाठी स्क्रीन उभारण्यात आल्या आहेत. मंदिर सुरक्षेसाठी देवस्थानने सुरक्षारक्षक नेमले आहेत. याशिवाय यात्राकाळात राज्यातून वाढीव पोलिसांची कुमकही तैनात झाली आहे. भाविकांना मंदिराच्या नवीन दर्शनबारीतून दर्शनासाठी प्रवेश देण्यात येणार आहे.तर बाहेर पडण्यासाठी महाद्वाराचा वापर केला जाणार आहे. भक्तनिवास आणि दर्शनबारीत भाविकांसाठी बाह्यरुग्ण विभाग तसेच रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.आळंदी ग्रामीण रुग्णालयात आरोग्य व्यवस्था प्रभावी रहाणार असल्याचे आळंदी ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. उर्मिला शिंदे यांनी सांगितले.
आळंदी मंदिर स्वच्छतेसाठी देवस्थानने स्वकाम सेवा मंडळ, विश्व सामाजिक सेवा संस्था अशा सामाजिक संस्थांकडून सेवक कार्यकर्ते नेमले आहेत. लाडू प्रसादाचे लाडू बनविण्याचे काम सुरू आहे. भाविकांना शुद्ध पाणी मिळावे, यासाठी जलशुद्धीकरण (आरओ) यंत्रणा विकसित करण्यात आली आहे.
आळंदीतील रस्ते सिमेंटीकरणाने भाविकांतून समाधान आहे. आळंदी नगरपरिषदेने इंद्रायणी नदीचे प्रदूषण कमी करण्यासाठी उपाय योजना केल्या असल्याचे मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी सांगितले.
श्री संत ज्ञानेश्वर महाराज ७२७ वा संजीवन समाधी सोहळा कार्तिकी वारी २०२२ मध्ये संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरातील सर्व कार्यक्रम लाईव्ह पाहण्याची सोय आळंदी देवस्थानने अधिकृत फेसबुक, युट्यूब, इंस्टाग्राम वर पाहण्यासाठी क्यू – आर कोड दिला असून तो स्कॅन करून कार्यक्रम पाहण्याचे आवाहन केले आहे.