– सोयाबीनला ४ ते ७ हजार तर कापसाला ६ ते ८ हजार रुपयांपर्यंत भाव
– सीसीआयच्या कापूस खरेदीला अद्याप मुहूर्त नाही
चिखली (एकनाथ माळेकर) – कपाशी व सोयाबीनचे उत्पादन घटल्याने या दोन्ही पिकांना चांगला बाजारभाव मिळण्याची शक्यता असून, शेतकर्यांनी विक्रीची घाई करू नये, असा सल्ला जाणकारांकडून दिला जात आहे. मागील सप्ताहात खरीप पिकांची आवक वाढलेली असून, विशेषतः कापूस, मका, सोयाबीन व कांदा यांची आवक गेल्या सप्ताहाच्या तुलनेने वाढलेली आहे. परंतु मागणी टिकून असल्याने वाढत्या आवकेचा परिणाम कांद्याखेरीज इतर पिकांवर जाणवला नाही. या सप्ताहात कापसाचे स्पॉट भाव ४ टक्क्यांनी, मक्याचे १.६ टक्क्याने व सोयाबीनचे ३.४ टक्क्यांनी वाढलेले आहेत, तर कांद्याचे मात्र घसरले होते. शेतकर्यांना यंदाच्या हंगामात कापसाला सरासरी ९ हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळू शकतो, असे अंदाज आहेत.
सद्या सोयाबीनची स्पॉट किमत (इंदूर) गेल्या सप्ताहात ४.८ टक्क्यांनी वाढून ५,५५६ रुपयांवर आली होती. या सप्ताहात ती पुन्हा ३.४ टक्क्यांनी वाढून ५,७४४ रुपयांवर आली आहे. सोयाबीनचा हमीभाव ४,३०० रुपये आहे. कांद्याच्या किमती ऑक्टोबर महिन्यात वाढत होत्या. कांद्याची स्पॉट किमत (पिंपळगाव) गेल्या सप्ताहात २,५६० रुपये होती; या सप्ताहात ती २,२२५ रुपयांवर वर आली आहे. कापसासाठी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिना विक्रीसाठी महत्वाचा असतो. कारण नवा कापूस या महिन्यात बाजारात दाखल होतो. ज्यामुळे बाजारात कापसाची आवक वाढते. आवक वाढल्याने बाजारात उद्योगही खरेदीसाठी उतरतात. मात्र, आवक वाढल्याने बाजारातील दर नरमतात. दुसरीकडे अमेरिकेत कापसाचे उत्पादन घटले आहे. त्यामुळे भारताला कापसाच्या दराबाबत चांगली संधी मिळू शकते. यामुळे शेतकर्यांनी कापूस विक्रीची घाई करू नये, असा सल्ला व्यापारी वर्तुळातून दिला जात आहे. कपाशीचे हमीभाव लांब धाग्यासाठी (प्रति क्विंटल) ६,३८० रुपये व मध्यम धाग्यासाठी ६,०८० रुपये आहेत.
यंदा अतिवृष्टी सततच्या पावसामुळे कापसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आता राज्यात कापूस वेचणीसाठी मजुरांची समस्या निर्माण झाली आहे. कापूस एकाच वेळी वेचणीला आल्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत कापूस वेचणीचे दर प्रति किलोला तीन ते पाच रुपयांनी वाढले आहेत. कापसाला मिळणार्या दराच्या तुलनेत साधारण १५ ते १७ टक्के रक्कम केवळ वेचणीवर खर्च होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यावर्षी सोयाबीन पाठोपाठ कापसाच्या पिकानेही शेतकर्यांची निराशा केली आहे. दरवर्षी बोण्डअळीचा सामना करावा लागणार्या या पिकाला यंदा अतिवृष्टीसह इतर कीड रोगांचा प्रतिकार करावा लागला. चांगल्या स्थितीत एकरी दहा ते पंधरा क्विंटलपर्यंत उत्पादन होत असते. परंतु यंदा मुश्किलीने एकरी पाच क्विंटलपर्यंत उत्पादन निघत आहे. त्यात सद्या भावही कमी मिळत आहे. यंदा दहा हजारापर्यंत भाव मिळण्याची अपेक्षा होती. परंतु सध्या सात हजाराच्या आतच भाव मिळत आहे. यंदा उत्पादन घटल्याने पुढे काही दिवसांत भाव वाढण्याची कापूस उत्पादक शेतकर्यांना आशा आहे.
शेतीची मशागत, खते, बियाणे, विविध औषधींच्या फवारण्या, कापूस वेचणीची मजुरी यावरचा खर्च पाहता, उत्पादन खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. एवढे होऊनही दोन ते तीन वेचणीतच कापूस मोकलण्याच्या मार्गावर आहे. एकरी वीस हजार रुपयांपर्यंत खर्च झाला असून, उत्पन्न मात्र प्रचंड घटले असल्याने केलेला खर्चही निघतो की नाही याची चिंता लागली असल्याचे कापूस उत्पादक शेतकरी सांगत आहेत.
गेल्या हंगामातील कापसाला हमीभावापेक्षा अधिकचा दर होता. परिणामी, शासकीय खरेदीला व्याप्ती नव्हती. या वर्षी ‘सीसीआय’ने खुल्या बाजारातून कापूस खरेदीच्या हालचाली सुरू केल्या होत्या. ‘सीसीआय’ने देशभरात ९०, तर राज्यात २० टक्के केंद्रांवर खरेदीचे नियोजन केल्याची माहिती भारतीय कापूस मंडळाच्या सूत्रांनी दिली होती. मात्र अजूनही ‘सीसीआय’ला खरेदीचा मुहूर्त सापडलेला नाही.
——————–