चिखली (शहर प्रतिनिधी) – सर्वोच्च न्यायालयाने उच्चवर्णीयांना आर्थिक मागास (इडब्लूएस)च्या नावाखाली १० टक्के आरक्षण देऊन आरक्षणाच्या मूळ उद्देशाला बाजूला सारत, उच्चवर्णीयांची सोय केली आहे. न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात व ओबीसींना ५२ टक्के आरक्षण मिळावे, या मागणी आज वंचित बहुजन आघाडीच्यावतीने एक दिवशीय धरणे आंदोलन करण्यात आले. तसेच, चिखली तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारला निवेदन देण्यात आले. या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
चिखली येथील तहसील कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाड़ी व महिला आघाडी, तसेच तालुक्यातील कार्यकर्ते, पदाधिकारी, हितचिंतक व जिल्हा पदाधिकारी यांनी एकदिवशीय धरणे आंदोलन केले, या नंतर चिखली तालुक्याच्यावतीने मुख्यमंत्री यांना तहसीलदारांच्यामार्फत निवेदन देण्यात आले. पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष अशोकसिंग सुरडकर, तालुकाध्यक्ष संजय धुरंधर, शहराध्यक्ष बाळू भिसे यांच्या नेतृत्वात पक्षाच्या आदेशानुसार हे एक दिवसीय धरणे आंदोलन पार पडले. सर्वोच्च न्यायालयाने उच्चवर्णीयांना आर्थिक मागास या असंविधानिक मार्गाने १० टक्के आरक्षण देवून उच्चवर्णीयांची सोय केली आहे. वास्तविक पाहता देशामध्ये जातीयता आणि हीनभावना या आधारावरती दुर्बलांना आरक्षण देण्याचे काम संविधानाने केले होते. परंतु आज इडब्लूएसच्या नावावर जन्मोजन्मीची सोय उच्चवर्णीयांनी केली आहे. आरक्षणाचा निकस आर्थिक मागासलेपण नसून, जातीहीनतेच्या भेदभावातून विकासापासून दूर असलेल्या समूहाला विकास साधण्यासाठी दिलेली संधी हा आहे. परंतु सर्वोच्च न्यायालयाने आर्थिक निकषावर आरक्षण देवून आरक्षणाच्या मूळ उद्देश बाजूला सारून उच्चवर्णीयांना आरक्षण देवून त्यांची सोय केली आहे. या अगोदर सर्वोच्च न्यायालयाने ५० टक्क्याच्या वर आरक्षण देता येणार नाही, ही त्यांचीच मर्यादा का मोडली? ती केवळ इडब्लूएसला आरक्षण देवून त्यांनी उच्चवर्णीयांची सोय केलेली आहे. आज देशात ओबीसी जातीसमूहाला त्यांच्या लोकसंखेच्या प्रमाणात म्हणजेच ५२ टक्के आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीकडून एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले, तसेच जोपर्यंत ओबीसींना आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत वंचित बहुजन आघाड़ी लढत राहील, पक्षाच्या चिखली तालुक्यातील पदाधिकार्यांनी ठणकावून सांगितले आहे.
आजच्या या धरणे आंदोलनात तालुका अध्यक्ष संजय धुरंधर, जिल्हा उपाध्यक्ष अशोकसिंह सुरडकर, शहर अध्यक्ष बाळाभाऊ भिसे, प्रवक्ते मिलिंद माघाडे, तालुका सचिव जितेंद्र निकाळजे, महासचिव सतीश पांडगळे, प्रदीप खंदारे, प्रदीप वाकोडे, अंबादास जाधव, संजय जाधव, देविदास जाधव, सुभद्रा गवई, शारदा लहाने, चंद्रभागा जाधव, सविता घेंवदे, शीलाबाई इंगळे, जया अंभोरे आदी उपस्थित होते.
—————-