आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : ब्रम्हमुर्ती प.पु. रघुनाथ बाबा ( श्रीक्षेत्र आळंदी ) यांच्या १३ व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त आळंदीत तपपूर्ती सोहळ्यात भाविकांना विविध धार्मिक कार्यक्रमांतर्गत पर्वणी लाभली आहे. या सोहळ्यास भाविकांची लक्षणीय उपस्थिती लाभली. या सोहळ्यास हजारो भाविकांची उपस्थिती असून, सोहळा हरिनाम गजरात भक्तिमय वातावरणात सुरु झाला असल्याचे मुख्य संयोजक ह.भ.प. ब्रम्हचारी स्वामी महाराज ज्ञानानंद सरस्वती यांनी सांगितले.
या सप्ताहात सकाळी काकडा, भजन, श्री ज्ञानेश्वरी पारायण, प्रवचन, श्री ज्ञानेश्वरी भावकथा स्वामी श्री गोविंददेव गिरीजी महाराज यांचे सुश्राव्य वाणीतून श्रवणास मिळणार आहे. याशिवाय हरिपाठ, हरिकीर्तन, महाप्रसाद वाटप होत आहे. सप्ताह कालावधीत तपोपुरती सोहळ्यास येणाऱ्या संत वृंदांचे स्वागत व पूजन आशीर्वचन होणार आहे. यावेळी शाम नारायण महाराज सुत्रसंचलन करीत आहेत. सोहळ्याचे पहिल्या दिवशी अमृत महाराज जोशी,दुसर्या दिवशी अशोक महाराज पांचाळ, तुकाराम महाराज मुंडे, जगन्नाथ महाराज पाटील यांची कीर्तन सेवा हरिनाम गजरात झाली. संदीपान महाराज शिंदे, संजय महाराज पाचपोर यांची कीर्तन सेवा हरिनाम गजरात होत आहे. सोहळ्यात वारकरी दिंडी मिरवणूक उत्साहात पार पडली. तत्पूर्वी धर्मध्वजारोहण मारुती महाराज कुरेकर यांचे हस्ते हरिनाम गजरात झाले.
सोहळ्यात भावार्थ दीपिका परायणास मोठा प्रतिसाद
या सोहळ्यात २ ते ८ नोव्हेंबर या कालावधीत कैवल्य साम्राज्य ज्ञानचक्रवर्ती श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या सानिध्यात परायणाची सेवा करण्यास भाविकांना पर्वणी लाभली आहे. यात ब्रह्ममूर्ती स्वानंद सुखनिवासी प.पु. रघुनाथ बाबा यांच्या १३ व्या पुण्यस्मरणा निमित्त तपोपुरती सोहळा होत आहे. यात भावार्थ दीपिका पारायण सुरु असून यास मोठा प्रतिसाद लाभला आहे. या वेळी श्री ज्ञानेश्वरी व्यासपीठ चालक ज्ञानेश्वर माउली सावर्डेकर, ज्ञानेश्वर माउली कुऱ्हाडे,पुंडलिक महाराज जाधव, सचिन महाराज कऱ्हाळे, गोपाळ महाराज पवार नेतृत्व करीत आहेत.सोहळ्यात अमृत महाराज जोशी आणि अशोक महाराज पांचाळ यांची कीर्तन सेवा रुजू झाली असून तुकाराम महाराज मुंडे, जगन्नाथ महाराज पाटील, संदीपान महाराज शिंदे, संजय महाराज पाचपोर, मुकुंदकाका जाटदेवळेकर यांची कीर्तन सेवा लाभणार आहे. या सेवेचा भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन मुख्य संयोजक ह.भ.प. ब्रम्हचारी स्वामी महाराज ज्ञानानंद सरस्वती यांनी केले आहे.