Breaking newsHead linesMaharashtraPoliticsWorld update

महाराष्ट्रात परिवर्तन घडविण्याची संधी लवकरच मिळेल; शरद पवारांचा कार्यकर्त्यांना सूचक इशारा

– लहान – लहान कार्यकर्त्यांनी काम केल्याने परिवर्तन करण्याची ताकद निर्माण झाली आहे – शरद पवार
– एवढं काम करु की, महाराष्ट्राचे चित्र पालटण्याची ताकद आपल्यात;आपल्या कुणावर संकट आले तर ताकदीने उभे रहा – जयंत पाटील
– येणार्‍या काळात पक्ष नक्की एक नंबरचा बनेल, बळकट होईल -प्रफुल पटेल
– ईडीच्या कारवाईत भाजप नेते का नाहीत ;ते काय धुतल्या तांदळासारखे आहेत का? – छगन भुजबळ
– मिडिया व राजकीय लोकांमध्ये डॉयलॉगचे नाते असावे प्रलोभन व धाकाचे नसावे – खासदार सुप्रियाताई सुळे

शिर्डी (विशेष प्रतिनिधी) – आजच्या शिबिरातून एक चांगला संदेश राज्यात जात आहे. लहान – लहान कार्यकर्त्यांनी काम केल्याने परिवर्तन करण्याची ताकद निर्माण झाली आहे, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादीचा कार्यकर्ता पूर्ण ताकदीने हा पक्ष मजबूत करणार आहे. महाराष्ट्रात परिवर्तन घडवण्याची ताकद आणि हिंमत तुमच्यामध्ये आहे, ही संधी लवकरच मिळेल, असा विश्वासही व्यक्त करत पवारांनी या शिबिराच्या माध्यमातून राज्याला आगामी राजकारणाचे संकेत दिलेत.

‘राष्ट्रवादी मंथन वेध भविष्याचा’ या टॅगलाईनखाली राष्ट्रवादीचे शिर्डीत दोन दिवसीय राज्यस्तरीय शिबीर पार पडले. हॉस्पिटलमधून थेट शिर्डीत येत शरद पवार यांनी तब्येतीमुळे थोडक्यात मार्गदर्शन केले. शरद पवार हे मागील काही दिवसांपासून रुग्णालयात उपचार घेत आहेत. अशा स्थितीतही त्यांनी आज शिर्डी येथे जाऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी ते कार्यकर्त्यांना सविस्तरपणे संबोधित करू शकले नाहीत. त्यांनी आपले भाषण थोडक्यात उरकले. उर्वरित भाषण राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे पाटील यांनी वाचून दाखवले. प्रकृती ठीक नसूनही ते शिर्डी येथे सुरू असलेल्या मंथन शिबिराला उपस्थित राहिले.

राष्ट्रवादीचे उत्तमरीत्या शिबीर झाले आहे. अनेकांची भाषणे ऐकण्याची संधी हॉस्पिटलमध्ये मिळाली. शिस्तबध्द पध्दतीने पक्षाला शक्ती देणारे शिबीर जयंत पाटील यांनी आयोजित केले त्याबद्दल शरद पवार यांनी त्यांचे कौतुक केले. या शिबिराला मिळालेला प्रतिसाद लक्षात घेता आता पुढे युवक, युवती , महिला, सर्व सेलचे घटक काम करत आहेत त्यांचेही स्वतंत्र शिबीर आयोजित करणार आहेत असेही जयंत पाटील यांनी सांगितल्याचे शरद पवार म्हणाले. हॉस्पिटलमध्ये सर्वच भाषणे ऐकली असं नाही पण काहींची ऐकली. वैद्यकीय अधिकार्‍यांनी दहा – पंधरा दिवस आराम करण्याचा सल्ला दिला आहे त्यानंतर मला काम करता येणार आहे असेही शरद पवार म्हणाले. शरद पवार यांच्या तब्बेतीमुळे त्यांचे विचार माजी गृहमंत्री दिलीप वळसे – पाटील यांनी यावेळी वाचून दाखवले.

एवढं काम करु की, महाराष्ट्राचे चित्र पालटण्याची ताकद आपल्यात;आपल्या कुणावर संकट आले तर ताकदीने उभे रहा – जयंत पाटील
सरकार गेलं की चिंता करायची नाही. एवढं काम करु की महाराष्ट्राचे चित्र पालटण्याची ताकद आपल्यात आहे. आम्हाला हिंदूत्व कुणाकडून शिकण्याची गरज नाही. आमचं हिंदूत्व छत्रपती शिवाजी महाराजांचे आहे असे सांगतानाच आपल्यात एकतेचा अभाव होता कामा नये. संकट आलं की पाठीशी ताकदीने उभे राहिले पाहिजे. आत्मविश्वास ठेवा. कुठल्याही मंत्री किंवा आमदारांनी एवढ्या वर्षात चुकीचे कधी काम केले नाही. त्यामुळे आपल्या कुणावर संकट आले तर ताकदीने उभे रहा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले. शिबीरात शेवटच्या दिवशी जयंत पाटील यांनी पक्षाचे नवनवीन व्हिजन यावेळी मांडले आणि कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण केला. राज्यात ज्याप्रकारे सरकार यायला हवे ते आले नाही. भाजपच्या १०५ मध्ये अस्वस्थता आहे कारण हे सरकार ४० जणांसाठीच काम करत असल्याची भीती भाजप नेत्यांमध्ये आहे असा दावा जयंत पाटील यांनी यावेळी केला. राष्ट्रवादी व पवारसाहेब काय करतात याबाबत राज्यात चर्चा असते. आपण कुणाशी लढणार आहोत याचे मार्गदर्शन दोन दिवस या शिबीरात झाले. आईवडिलांना शिव्या द्या पण मोदींना नको बोलतात त्यांच्याविरोधात आपली लढाई आहे असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. सोयीचे असेल ते कसे वाजवायचे आणि आपण बोलतो तेच बाहेर वाजते त्यांच्याविरोधात आपली लढाई आहे. जिल्हाधिकार्‍यांना दारु पिता का असं विचारणारा मंत्री या मंत्रीमंडळात आहे. हे कोणत्या पातळीवर आहेत लक्षात येत आहे त्याविरोधात आपली लढाई असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले. अतिवृष्टी झाली त्या सर्व ठिकाणी ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी करणारा ठराव आज या शिबिरात करण्यात आला. महाराष्ट्रासोबत दुसरं राज्य स्पर्धा करु शकत नाही परंतु घाबरुन दुसर्‍या राज्यात जाणारा प्रकल्प थांबवला जात नाही याबाबत तीव्र नाराजी जयंत पाटील यांनी व्यक्त केली. पूल पडणे हा ईश्वरी संकेत असे मोदी पश्चिम बंगालच्यावेळी बोलले असतील तर आता गुजरातमध्ये हा संकेत दिसला पाहिजे असा खोचक टोलाही जयंत पाटील यांनी यावेळी लगावला.
विधानसभेत आपल्या आमदारांनी चांगली कामगिरी केली आहे. रोहित पवार, अनिल पाटील, अमोल मिटकरी, यांच्यासह अनेक आमदारांना विधानसभेत थांबा असं बोलावं लागतं आहे अशी कामगिरी आहे. ही नवीन पिढी राष्ट्रवादीचा रथ पुढे नेल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास जयंत पाटील यांनी विधानसभेतील युवा आमदारांच्या कामकाजावर बोलताना व्यक्त केला. आपला पक्ष ताकदीने उभा करुया. पुढच्या काळात सक्षम व सर्वसामान्यांचा विचार करणारा पक्ष आहे हे चित्र निर्माण करुया. २३ वर्षात चार वेळा सत्ता स्थापन करायला मिळाली आहे. महापुरुषांकडून प्रेरणा घेऊन आपला पक्ष काम करतोय. २०२४ ला राष्ट्रवादीचे रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. २५ वर्ष पूर्ण होत आहे त्यामुळे ताकदीने काम केले तर एक नंबरचा पक्ष बनेल असे आवाहनही जयंत पाटील यांनी केले. महागाई वाढली आहे. गॅसची सबसिडी दिली नाही हे लोकांना सांगण्याची गरज आहे. भाजपच्या कामाने जनतेच्या मनात निराशा वाढलीय. भाजप शंभर टक्के संसदेत निवडून जाणार असे चित्र निर्माण केले जात आहे परंतु आकडेवारी पाहिली तर याला छेद देणारे चित्र आहे असेही जयंत पाटील यांनी काही आकडेवारी सांगत स्पष्ट केले. सध्या ५० खोक्यांची चर्चा जोरदार सुरू आहे. शेंबड्या पोरांनाही ही चर्चा माहीत झाली आहे म्हणून हीच शेंबडी पोरं नागपूरात जाऊन आंदोलन करत आहेत असा टोलाही जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला. राष्ट्रवादीच्या नेत्यांना त्रास दिला जात आहे तरीही राष्ट्रवादी लढा देत आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांना टार्गेट करण्याचे काम सुरू आहे आव्हान देणारा एकमेव पक्ष आहे त्यामुळे हल्ला होत आहे असेही जयंत पाटील म्हणाले. भूमिका आणि नवीन जबाबदारी याबाबतही जयंत पाटील यांनी आपले विचार मांडले. पक्षात एकनिष्ठ असणारा कार्यकर्ता पुढे आला पाहिजे असे मत जयंत पाटील यांनी व्यक्त केले. आयुष्यभर यशवंतराव चव्हाण यांच्या दिशेने काम करत जनतेला सोबत घेऊन ‘लोक माझे सांगाती’ प्रमाणे काम आदरणीय शरद पवारसाहेब करत आहेत असेही जयंत पाटील म्हणाले. डिसेंबरमध्ये पक्षाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होईल आणि रिजनलप्रमाणे निवडणूक घेतली जाईल. ‘पक्षात सुवर्ण संधी, सुवर्ण वेळ, विजयाचे सहा स्तंभ’ आपण आणणार आहोत असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. आपलं अपयश झाकण्यासाठी टिव्हीवर दाखवले जातात. त्यावेळी त्यांचे अपयश काय आहे शोधायला हवे. हे एकसंघपणे काम करायला हवे. लीडर मॅपिंग सारखी एक सामुहिक जबाबदारी दिली जाणार आहे. स्वतः जिंकणार्‍या सोबत अजुन एक जिंकवण्याची जबाबदारी आहे. आपण ताकदीने एकत्र काम केले तर राज्यात शंभरी गाठायला वेळ लागणार नाही असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
——
येणार्‍या काळात पक्ष नक्की एक नंबरचा बनेल, बळकट होईल -प्रफुल पटेल
महाविकास आघाडीचे जनक पवारसाहेब आहेत. तेच आपला आदर्श असताना राष्ट्रवादी काँग्रेस एक नंबर का झाली नाही हा मंथनाचा विषय आहे असेही प्रफुल पटेल म्हणाले. एक नंबरचा पक्ष करायचा असेल तर त्यांचा विचार नक्कीच घराघरात पोहोचवला पाहिजे. येणार्‍या काळात पक्ष नक्की एक नंबरचा बनेल, बळकट होईल असा विश्वास खासदार प्रफुल पटेल यांनी व्यक्त केला. २०१४ पासून राजकारणाची दिशा बदलली आहे. या बदललेल्या राजकारणात टिकायचे असेल तर त्यानुसार परिवर्तन करायला हवे असे मत खासदार प्रफुल पटेल यांनी व्यक्त केले.
——
ईडीच्या कारवाईत भाजप नेते का नाहीत ; ते काय धुतल्या तांदळासारखे आहेत का? – छगन भुजबळ
ईडीने कारवाई केलेल्या यादीत एकही भाजप नेते नाहीत. ते फक्त धुतल्या तांदळासारखे आहेत का? केंद्रीय यंत्रणा या स्वतंत्र आहेत असे सांगता हा काय दांभिकपणा आहे. तुमच्याकडे गेल्यावर शुभ्र कसा होता. शिखंडीसारखे का लढता असा संतप्त सवालही छगन भुजबळ केंद्रसरकारला केला. ईडीची कारवाई का तर लवकर जामीन नाही म्हणून… नवाब मलिक, अनिल देशमुख यांची काय केस आहे हे सर्वांना माहीत आहे ते नक्की बाहेर येतील असे सांगून पवारसाहेब आपल्या कार्यकर्त्यांना एकटं सोडत नाहीत असेही आवर्जून छगन भुजबळ यांनी सांगितले. आपल्या संस्कृतीचा आम्हाला आदर आहे. ६० महिलांना नोबेल पारितोषिक मिळाले त्यातील एकाही महिलेच्या कपाळावर टिकली नव्हती. आपल्या अगोदर १२० देशात टिकली लावली नव्हती. आता चक्र उलट फिरत आहे असेही छगन भुजबळ म्हणाले. एकनाथ शिंदे शेती करत आहेत म्हणून ते मनोहर भिडे आंब्याची झाडे लावा सांगायला गेले असावेत. त्यांच्यात नेमकी चर्चा काय झाली माहीत नाही मात्र फार मोठे राजकारण सुरू आहे. सावित्रीबाई फुले यांच्या कपाळावर भलंमोठं कूंकू होतं तरीपण त्यांच्यावर दगड, शेण का मारले.अशा मनुवादी लोकांच्याविरोधात लढण्यासाठी ताकद छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले आंबेडकर यांच्याकडून मिळते. सध्या देशाची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. बेरोजगारी, महागाई वाढली आहे यापासून लक्ष विचलित करण्यासाठी हे प्रयत्न सुरू आहेत असाही आरोप छगन भुजबळ यांनी केला. आता दिवाळी झाली काही जणांना खायलाही मिळाले नाही आनंदाचा शिधा तर लोकांच्या घरी पोचलाच नाही. नोटेवर देवांचे फोटो छापा अशी मागणी करता अरे आधी लोकांच्या हातात पैसा द्या मग नोटांवर फोटो छापा असे खडेबोल छगन भुजबळ यांनी सुनावले. एसटी विलीनीकरण करण्यासाठी पवारसाहेबांच्या घरावर मोर्चा काढण्यात आला. आता तुमचं सरकार आलं ना मग का एसटीचे विलिनीकरण होत नाही, का आंदोलन होत नाही असा सवालही छगन भुजबळ यांनी उपस्थित केला. मुख्यमंत्री बोलत आहेत मोठ्ठा प्रकल्प राज्यात येणार आहे. मात्र त्यांनी फॉक्सकॉन प्रकल्प नेला आणि आपल्याला पॉपकॉर्न दिला आहे अशा शब्दात छगन भुजबळ यांनी सरकारवर टीका केली. महाराष्ट्राचे महत्त्व कमी करण्याचे काम होतेय. महाराष्ट्राला कमकुवत करु नका महाराष्ट्र हा देशाचा आधार आहे हे लक्षात ठेवा असा स्पष्ट इशाराही छगन भुजबळ यांनी दिला. गुजरात मॉडेल मोरबी पुल कोसळला त्यात दीडशे माणसं मृत्युमुखी पडली. युकेच्या पंतप्रधानांनी आश्वासन दिले ते पूर्ण केले नाही म्हणून त्यांना राजीनामा द्यावा लागला आणि मी गेली आठ वर्ष पंधरा लाख रुपये कधी मिळणार याची वाट बघत आहे असा टोलाही छगन भुजबळ यांनी लगावला.
—-
मिडिया व राजकीय लोकांमध्ये डॉयलॉगचे नाते असावे प्रलोभन व धाकाचे नसावे – खासदार सुप्रियाताई सुळे
पक्षासाठी केसेस अंगावर घेतात त्या सर्व युवकांचे आभार सुरुवातीलाच आपल्या भाषणात खासदार सुप्रियाताई सुळे यांनी यावेळी मानले. राजकारणात चांगली पॉलिसी यावी म्हणून मी संसदेत काम करत आहोत टिका करायची तेव्हा नक्की करतो पण पॉलिसीवर आम्ही जास्त लक्ष देतो असे सांगतानाच ५० हजार कोटी रुपये स्मार्ट सिटीवर खर्च केले तर जवळपास एक लाख कोटी रुपये खर्च झाले मग या स्मार्ट सिटी झाल्या का? याची चौकशी होण्याची आवश्यकता असल्याची मागणी खासदार सुप्रियाताई सुळे यांनी केली. रामाला आम्ही कधीच विसरलो नाही तो आपला अविभाज्य भाग आहे. हा पक्ष जमीनदारांचा नाही हा सर्व कष्टकर्‍यांचा पक्ष आहे. त्यामुळे व्यासपीठावर येऊन आपल्यावर कोण टिका करत असेल तर ते आम्हाला पटणार नाही अशा शब्दात आपली नाराजी खासदार सुप्रियाताई सुळे यांनी व्यक्त केली. प्रलोभन आणि धाक सध्या वाढत आहे. मिडिया व राजकीय लोकांचे चांगले संबंध असतात. त्यांच्यामध्ये डॉयलॉगचे नाते असावे प्रलोभन व धाकाचे नसावे असेही खासदार सुप्रियाताई सुळे यांनी स्पष्ट केले. बंडखोर आमदारांवर ५० खोक्यांचा आरोप झाला त्यावेळी ५० खोके घेतले नाही याबाबत कुठल्याही आमदारांनी खुलासा केला नाही. याचा अर्थ स्पष्ट आहे असेही खासदार सुप्रियाताई सुळे म्हणाल्या. यावेळी खासदार सुप्रियाताई सुळे यांनी धाक व प्रलोभने याबाबतची काही उदाहरणे व दाखले दिले. राष्ट्रवादीकडून तयार थिंक टँक दुसर्‍या पक्षात गेलेले आहेत. आमच्या पक्षाच्या टँलेंटवर ते पक्ष वाढवत आहेत. १०५ पैकी ५० आमदार राष्ट्रवादी काँग्रेस व कॉंग्रेसचे आहेत असा थेट हल्लाबोलही खासदार सुप्रियाताई सुळे यांनी केला. आम्ही इंटरटेनर नाही आम्ही पॉलिसीमेकर आहोत. आम्ही संसदेत पॉलिसीवर काम करतो त्यामुळे चॅनेलवाले अजेंडा ठरवतात आणि आपण बोलतो पण यापुढे आपण अजेंडा ठरवुया आणि त्यांनी त्यावर बोलले पाहिजे. आपण प्रतिक्रिया दिली नाही म्हणून अडचण येत नाही असे स्पष्ट मत खासदार सुप्रियाताई सुळे यांनी मांडले. लढेंगे और जितेंगे भी..असे सांगतानाच सध्या असंवेदनशील राजकारण सुरू आहे. येत्या काळात आपल्याला याविरोधात लढायचे आहे यासाठी तयार रहा असे आवाहनही खासदार सुप्रियाताई सुळे यांनी केले. आठ वर्षांत काय केले ते तरी सांगा असा थेट सवाल मोदींना करतानाच या बागुलबुवातून बाहेर पडुया आपण केलेले काम जनतेला सांगुया. यशवंतराव चव्हाण यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडवुया… त्यांचे स्वप्न पूर्ण करुया. आपला पक्ष पूर्ण ताकदीने सत्तेत कसा येईल आणि राज्यात आणि देशात एक नंबरचा पक्ष कसा होईल यासाठी प्रयत्न करूया असे आवाहनही खासदार सुप्रियाताई सुळे यांनी केले.
——-
जो आज साहिबे मसनत है, कल नहीं होंगे, किरायेदार है, जाती मकान थोडी है? – धनंजय मुंडेंचा हटके अंदाजात सरकारला इशारा
‘मै जानता हूँ कि दुश्मन भी कम नही, लेकिन हमारी तरह हथेली पे जान थोडी है, जो आज साहिबे मसनद है कल नही होंगे, किरायदार है जाती मकान थोडी है, सभी का खून है शामिल यहा की मिट्टी मे किसी के बाप का हिंदुस्तान थोडी है’राहत इंदौरी यांच्या या शायरीच्या माध्यमातून माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांनी केंद्र व राज्य सरकारला सत्ता व सरकार कायमचे कोणाचेच नसते व देशाच्या इतिहासात सर्वांचेच योगदान आहे, तो इतिहास कोणालाही पुसता येणार नाही, याची आपल्या हटके अंदाजात आठवण करून दिली. यावेळी केंद्र व राज्य सरकार विरोधात धनंजय मुंडे यांनी तुफान फटकेबाजी करत, सुरत गुवाहाटी, गोवा मार्गे मुंबई या शिंदे सरकार स्थापनेपूर्वीच्या घटनाक्रमावरून सत्ताधार्‍यांना चांगलेच धारेवर धरले. हे सरकार केवळ स्वार्थ आणि खोके यासाठीच स्थापन झाले असून याची जाणीव आता सर्वसामान्य माणसाला देखील झाली असल्याने, ते कोणालाच भावत नाहीये, असेही म्हणायला धनंजय मुंडे विसरले नाहीत. दरम्यान राज्य सरकार आपापसात सगळे काही आलबेल आहे हे दाखवायची कसरत करत असताना राज्याची परिस्थिती मात्र हाताबाहेर जाताना दिसत आहे. अतिवृष्टी व परतीच्या पावसाने राज्यातील शेतकरी अक्षरश: कोलमडून पडला असून सरकारची शेतकर्‍यांना कसलीही मदत झाली नाही. राज्यातील शेतकर्‍यांना मदत करण्यासाठी ओला दुष्काळ जाहीर करायला जर हे सरकार असमर्थ असेल, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष याविरुद्ध रस्त्यावर उतरून संघर्ष करेल; असा इशाराही धनंजय मुंडे यांनी यावेळी बोलताना दिला. वेदांता – फॉक्सकॉन पाठोपाठ एका म्ाागून एक मोठमोठ्या गुंतवणुकीचे प्रकल्प महाराष्ट्राच्या बाहेर अन्य राज्यांमध्ये जात असून ते रोखण्यासाठी राज्यसरकार काहीही करत नाही, हे स्पष्ट दिसत आहे; परंतु यामुळे लाखो युवकांना मिळणारे रोजगार मात्र एक प्रकारे हिरावूनच घेतले आहेत, हे स्पष्ट दिसून येते. त्यामुळे एकमेकांवर आरोप करत बसण्यापेक्षा राज्यसरकारने महाराष्ट्र बाहेर गेलेल्या प्रकल्पातून जेवढी रोजगार निर्मिती होणार होती, तेवढे रोजगार राज्यातील तरुणांना उपलब्ध करून देण्याचा ठराव आगामी अधिवेशनात करावा, अशी मागणीही करणार असल्याचे धनंजय मुंडे यावेळी बोलताना स्पष्ट केले.
खासदार शरद पवार हे देशाचे नेतृत्व करणारे व्यक्तिमत्व असून विविध राज्यांनी आपल्या राज्यातील नेतृत्वाला संपूर्ण पाठिंबा देऊन दिल्लीश्वराविरोधात लढण्यासाठी ताकद दिली आहे; याची ममतादीदींसारखे अनेक उदाहरणे आहेत. त्याचप्रमाणे आता सबंध महाराष्ट्र देखील पवारसाहेबांच्या पाठीमागे उभा राहावा, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपापल्या भागात काम करण्याची गरज असल्याचेही धनंजय मुंडे म्हणाले.
‘राष्ट्रवादी मंथन वेध भविष्याचा’ या शिबिराचा दुसरा व शेवटचा दिवस असून सकाळच्या सत्रात खासदार सुनिल तटकरे, माजी मंत्री राजेश टोपे यांनी आरोग्याबाबत तर माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी अल्पसंख्याक व गृहनिर्माण विभागाबाबत माहिती दिली तर ज्येष्ठ विचारवंत प्रा.हरी नरके यांनीही आपले विचार व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!