– शेतकरी एकटा पडलाय, त्याला सर्वांनी साथ द्या, मोर्चात या – रविकांत तुपकर
बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – उद्या बळीराजाची फौज आपल्या घामाचे दाम मागण्यासाठी मोठ्या संख्येने बुलढाण्यात दाखल होत आहे. राज्यव्यापी आंदोलनाची सुरुवात ही आपल्या बुलढाण्यातून होत आहे. या बळीराजाच्या स्वागतासाठी, सन्मानासाठी, त्यांच्या पाठीशी भक्कम उभे राहण्यासाठी आणि त्यांना सहानुभूती देण्यासाठी या ‘एल्गार मोर्चा’त सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करत, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने सोयाबीन आणि कापूस उत्पादकांच्या मागण्यांसाठी उद्या (६ नोव्हेंबर) बुलढाण्यात आयोजित एल्गार मोर्चाचे निमंत्रण शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी जिल्हावासीयांना दिले आहे. आज बळीराजा एकाकी पडलेला असताना त्याला तुमच्या साथीची गरज आहे. त्यामुळे शहरातील डॉक्टर, वकील, इंजिनिअर, नोकरदार, व्यापारी, विचारवंत, साहित्यिक, दुकानदार अशाच सर्वच क्षेत्रातील नागरिकांनी बळीराजाच्या पाठिशी उभे रहावे, असे आवाहनही तुपकरांनी केले.
ते म्हणाले, की बळीराजा आता संकटात आहे. अतिवृष्टीने त्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. जे पीक वाचले त्याला सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे भाव राहिलेला नाही. यावर्षी तर सोयाबीन-कापसाचा उत्पादन खर्चही भरुन निघणार नाही, अशी अवस्था आहे. यावर्षी सोयाबीनचा एका क्विंटलचा उत्पादन खर्च ६ हजार रुपये आहे. तर मिळणारा भाव ४ हजार रुपये आहे. कापसाचा एका क्विंटलचा उत्पादन खर्च ८ हजार ५०० रूपये आहे आणि बाजारात कापसाला भाव फक्त ६ ते ७ हजार आहे. त्यामुळे शेतकरी आज तोट्यात आला आहे. त्याचा परिणाम शेतकरी आत्महत्याकडे प्रवृत्त होत आहे. ही सर्वांसाठी चिंतनाची बाब असल्याचे तुपकर म्हणाले. शेतकर्यांचा आता सर्वांवरचा विश्वास उडालेला आहे, त्यामुळे शेतकरी, शेतमजूर आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत आहे. या बळीराजाच्या स्वागतासाठी, सन्मानासाठी, त्यांच्या पाठीशी भक्कम उभे राहण्यासाठी आणि त्यांना सहानुभूती देण्यासाठी या ‘एल्गार मोर्चा’त आपण सहभागी व्हावे, शेतकर्यांना प्रत्यक्ष भेटून धार द्या. तुम्हा शहरवासीयांच्या आधाराची शेतकर्यांना प्रचंड आवश्यकता असल्याचे रविकांत तुपकर म्हणाले.
शेतकरी भावांनो, आपला हक्क मागण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या एल्गार मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते तथा युवा नेते कार्तिक खेडेकर यांनीदेखील केले असून, ही आपल्या अस्तित्वाची लढाई आहे, ती कापूस, सोयाबीनला भाववाढ घेऊनच जिंकावी लागेल, असेही त्यांनी नीक्षून सांगितले.
——————-