आदित्य ठाकरेंच्या ७ तारखेला बुलढाणा, मेहकरात वादळी सभा
– बंडखोरांचा आदित्य ठाकरे घेणार जोरदार समाचार?
बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – युवासेनेचे प्रमुख तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, माजी मंत्री आदित्य ठाकरे यांची बुलढाणा येथील जाहीर सभा वादळी ठरण्याची चिन्हे आहेत. या सभेला मिळणारा मोठा प्रतिसाद पाहाता, पोलिसांनी ती गांधी भवनऐवजी दुसरीकडे घेण्याची सूचना शिवसेनेला दिली. दिनांक ७ नोव्हेंबररोजी आदित्य यांच्या बुलढाणा व मेहकर येथे वादळी सभा होणार असून, ते बंडखोरांवर तुटून पडणार असल्याचे संकेत प्राप्त होत आहे. या सभाच रद्द करण्याचे षडयंत्र रचले गेले होते. परंतु, तसे झाले तर जनभावना संतप्त होतील, व शिवसैनिक रस्त्यावर उतरतील, अशी भीती वाटल्यामुळेच पोलिसांना पुढे करून, गांधी भवनाऐवजी दुसरीकडे सभा घ्यावी, असा सल्ला शिवसेनेला दिला गेला असावा, असा तर्क जिल्ह्यात लावला जात होता.
शिवसेना नेत्या सुषमा अंधारे व युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या बंडखोरांच्या मतदारसंघात वादळी सभा होत असून, त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे या दोन नेत्यांच्या सभांना परवानगी नाकारून त्या होऊ न देण्याचा कट रचला असल्याची चर्चा राज्यात सुरु आहे. त्यामुळेच काल जळगावमध्ये सुषमा अंधारे व सिल्लोडमध्ये आदित्य ठाकरे यांच्या सभेला परवानगी नाकारली गेली होती. त्यानंतर, आज बुलढाण्यात गांधी भवन येथील आदित्य ठाकरेंच्या सभेला परवानगी नाकारण्यात आली होती. नंतर शिवसेना आक्रमक झाल्यानंतर गांधी भवनाऐवजी दुसरीकडे सभा घेण्याची सूचना पोलिसांनी केली. त्यानुसार, शिवसेनेचे नेते अन्यत्र मोठी जागा शोधत होते.
दरम्यान, याबाबत ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ने बुलढाण्याचे ठाणेदार प्रल्हाद काटकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले, की आदित्य ठाकरे यांच्या सभेला पोलिसांनी परवानगी नाकारलेली नाही. आयोजकांनी गांधी भवन येथे सभेचे नियोजन केले होते. मात्र, ती जागा मुख्य मार्गाला लागून आहे. तसेच, तेथे शहरातील मुख्य पाच रस्ते एकत्र येतात. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होण्याची शक्यता होती. शिवाय, गर्दी झाल्यास लोकांना उभे राहण्यासाठीही जागा अपुरी आहे. त्यामुळे गांधी भवनाऐवजी दुसरे स्थळ शोधावे, अशा सूचना आयोजकांना दिलेल्या आहेत. त्या त्यांनी मान्य केल्याचेही ठाणेदार काटकर यांनी सांगितले.
————–