पवारांच्या भेटीसाठी मुख्यमंत्री शिंदे, उद्धव ठाकरे रुग्णालयात!
– शरद पवार आज शिर्डीतील राष्ट्रवादीच्या मंथन शिबिराला उपस्थित राहण्याची शक्यता
मुंबई (प्राची कुलकर्णी) – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या प्रकृतीत अद्याप सुधारणा नसल्याने उद्या (शनिवारी) ते शिर्डी येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंथन शिबिराला हजेरी लावतील की नाही, याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यांनी मात्र पवार हे हेलिकॉप्टरने शिबिरास येत असल्याचे सांगितले आहे. दरम्यान, पवारांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सायंकाळी ब्रीच कॅण्डी रुग्णालय गाठून पवारांची भेट घेतली. शिवसेनेतील बंडखोरीनंतर शिंदे यांची ही पहिलीच पवारभेट आहे. दरम्यान, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीदेखील रुग्णालयात जावून पवारांची भेट घेतली व प्रकृतीची विचारपूस केली. पवार हे गेल्या चार दिवसांपासून न्यूमोनियाने आजारी असून, त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरु आहेत. आज अचानक मुख्यमंत्र्यांनी सर्व दौरे रद्द करून पवारांची भेट घेतल्याने व त्यापाठोपाठ उद्धव ठाकरेदेखील पवारांच्या भेटीला गेल्याने राजकीय चर्चांना उधाण आले होते. राष्ट्रवादीच्या मंथन शिबिरानंतर राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार असल्याचे भाकित जयंत पाटील व अजित पवार यांनी केले होते. त्यानंतर आज शिंदे-ठाकरे यांनी पवारांची भेट घेतल्याने, भाजपच्या गोटातदेखील अस्वस्थता पाहायला मिळाली होती.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे प्रकृती अस्वास्थ्यामुळे ब्रीच कॅण्डी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मागील चार दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. दरम्यान, आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व कार्यक्रम रद्द करुन पवारांच्या भेटीला रुग्णालयात दाखल झाले. शिंदे यांचे आज ठाणे आणि मुंबईत काही कार्यक्रम होते. मात्र, ते सर्व रद्द करुन पवारांच्या भेटीला रुग्णालयात पोहोचले. या भेटीनंतर एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले, की शरद पवारांच्या प्रकृतीची मी विचारपूस केली. त्यांची तब्येत चांगली आहे, न्यूमोनियादेखील रिकव्हर झाला आहे. माझ्याशी खूप चांगले बोलले. पवार यांची तब्येत उत्तम आहे. मात्र ते उद्या राष्ट्रवादीच्या शिबीराला उपस्थित राहणार आहेत. काही तपासण्या करून त्यांना डिस्चार्ज मिळणार असल्याचेही शिंदे म्हणाले. आपण सदिच्छा देण्यासाठीच आलो होते, असेही शिंदे यांनी नमूद केले. तर या भेटीसंदर्भात शिंदे गटाचे प्रवक्ते व मंत्री दीपक केसरकर म्हणाले की, पवारसाहेब ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्या तब्येतीची काळजी सर्वांनाच आहे. आम्ही दौर्यावर आहे. मात्र आम्ही सातत्याने त्यांच्या तब्येतीची विचारपूस करत असतो. दरम्यान, शिंदे यांच्या भेटीनंतर माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेदेखील पवारांच्या भेटीसाठी रुग्णालयात दाखल झाले होते. त्यांनीदेखील पवारांची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी पवार-ठाकरे यांच्यात बराचवेळ खासगी चर्चा झाली.
शरद पवार यांच्या आरोग्याविषयी माहिती देताना राष्ट्रवादीचे नेते राजेश टोपे म्हणाले, की ‘दिवाळीत किमान ५० हजार लोकांना शरद पवार भेटले होते. लोकांना भेटल्यामुळे, बोलल्यामुळे संसर्ग झाला आहे. परंतु, त्यांची तब्येत ठीक असून, इच्छाशक्तीच्या बळावर ते लवकर बरे होतात. मोठ्या आजारांना त्यांनी हरवले, न्यूमोनिया किरकोळ विषय आहे,’ असा विश्वास राजेश टोपे यांनी व्यक्त केला. ‘न्यूमोनियाबद्दल रोजच्या रोज तपासणी केली जाते. त्यानुसार डॉक्टर सल्ला देत राहतात. शरद पवार यांना आराम करण्याची गरज आहे. परंतु, शिर्डीतील राष्ट्रवादीच्या शिबीराला ते उपस्थित राहतील. त्यानंतर थोडा आराम करतील. परत आपल्या नियमीत कामाला लागतील, अशी आशा आहे. मला शरद पवारांनी कारखाना सुरु केला का? मोळी टाकली का?,’ असेही विचारल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले.
शरद पवार यांच्यावर गेल्या दोन दिवसांपासून मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. काल त्यांना डिस्चार्ज मिळणार होता. मात्र डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना रुग्णालयात थांबावे लागले. राष्ट्रवादीच्या शिबीरलाही ते उपस्थित राहू शकले नाहीत. मात्र त्यांनी ऑनलाईन पद्धतीने आपली उपस्थिती दर्शवली व मार्गदर्शन केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन दिवसांचे मंथन शिबीर शिर्डी येथे सुरू झाले आहे. याचा शुभारंभ आज झाला. प्रकृती ठीक नसल्याने पवार या शिबीराला प्रत्यक्षात उपस्थित राहू शकले नाही. मात्र, व्हिडीओ कॉन्फर्सिंगद्वारे पवारांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली.
——————-