अमर छत्तीसे
श्रीगोंदा : नगरपालिकेचे लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. शुभांगी मनोहर पोटे यांच्याविरोधात १९ पैकी १६ नगरसेवकांनी जिल्हाधिकारी यांचेकडे अविश्वास ठराव दाखल केला, तर पक्षातंर बंदी कायद्यान्वये नगराध्यक्ष सौ. पोटे व नगराध्यक्ष पती नगरसेवक मनोहर पोटे यांना अपात्र करण्यात यावे, या तक्रारी बाबत सोमवार दि. ७ रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समोर सुनावणी होणार असल्यामुळे पोटे पती-पत्नीवर अपात्रतेची टांगती तलवार आहे.
आज जिल्हाधिकारी यांच्या कडे नगरसेवक गणेश भोस यांच्या नेतृत्वाखाली सत्ताधारी कॉंग्रेसचे ५ व विरोधी भाजपचे ११ नगरसेवकांनी नगराध्यक्ष सौ. शुभांगी पोटे यांना पदावरून हटविण्याची मागणी केली. लोकनियुक्त नगराध्यक्षा विरोधात असा ठराव दाखल होण्याची ही राज्यातील पहिली घटना आहे. नगराध्यक्ष मनमानी कारभार करतात. नगरसेवकांना विश्वासात घेत नाहीत. कामात दुजाभाव करतात अशा तक्रारी केल्या आहेत. त्यामुळे त्यांना पदावरून हटविण्याची मागणी केली आहे. तर नगराध्यक्ष सौ शुभांगी मनोहर पोटे व त्यांचे पती नगरसेवक मनोहर पोटे हे कॉंग्रेसच्या चिन्हावर निवडून आले आहेत, पण गत विधानसभा निवडणुकीत भाजपचे काम केल्याची तक्रार संभाजी ब्रिगेडचे टिळक भोस यांनी तत्कालीन नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे दाखल केली होती. पण आघाडी सरकारने या प्रकरणाकडे कानाडोळा केला. मात्र आता स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास खाते असल्याने या प्रकरणावर सोमवारी सुनावणी होणार आहे. त्यामुळे पोटे पती पत्नी वर अपात्रतेची टांगती तलवार आहे. एकंदरीत या घडामोडीने पालिकेचे राजकारण ढवळून निघाले आहे.
सर्वांना विश्वासात घेऊनच कामकाज केले आहे – पोटे
गेल्या साडेतीन चार वर्षापासून शहरातील सर्व प्रभागात कामे करताना सर्वांना विश्वासात घेऊन कामकाज केले. कधीही दुजाभाव केला नाही. केलेले आरोप चुकीचे आहेत. या नगरसेवकांना आताच कसा साक्षात्कार झाला आहे, अशी प्रतिक्रिया नगराध्यक्ष पती तथा नगरसेवक मनोहर पोटे यांनी दिली.