मेहकर (रवींद्र सुरुशे) – कुस्त्यांचे माहेरघर समजले जाणारे मेहकर तालुक्यातील देऊळगाव माळी येथे यावर्षीदेखील भव्य कुस्त्यांची आम दंगल रंगणार असून, तब्बल एक लाख रुपयांची जंगी लूट होणार आहे. विशेष बाब म्हणजे, यंदा महिलांच्यादेखील कुस्त्या होणार आहेत.
लाल मातीतील खेळ लोप पावत आहे. हा खेळ टिकला पाहिजे म्हणून कुस्त्यांचे माहेरघर समजले जाणारे मेहकर तालुक्यातील देऊळगाव माळी हे गाव कुस्त्यांची दंगल आयोजित करत आहे. त्याच अनुषंगाने कित्येक वर्षाची परंपरा म्हणून दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी क्रांतीसुर्य क्रीडा तालीम संघ व गावकर्यांच्यावतीने प्रति पंढरपूर म्हणून समजल्या जाणार्या देऊळगाव माळी येथे दिनांक ६ नोव्हेंबर, रविवारला महाराष्ट्राच्या लाल मातीतील खेळ म्हणजेच कुस्ती या खेळाचे आयोजन करण्यात आले आहे.
तब्बल एक लाख रुपयांची जंगी लूट सहा नोव्हेंबरला कुस्ती खेळाच्या माध्यमातून होणार आहे. महिलांच्या कुस्त्यांमध्ये सिंगल जोडी लावून रक्कम ठरवण्यात येणार आहे. स्पेशल ऑफरचे पैलवान नंबरमध्ये खेळतील, त्यांना सिंगल जोड खेळण्यासाठी विशेष प्राधान्य देण्यात येईल, अशी माहिती क्रांतीसुर्य तालीम संघ यांच्याकडून मिळाली आहे. तरी या लाल मातीतील खेळाचा समस्त पंचक्रोशीतील पहिलवान मंडळी तसेच प्रेक्षकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन क्रांती सूर्य क्रीडा तालीम संघाचे अध्यक्ष किसन बळी व समस्त पदाधिकारी यांच्यावतीने करण्यात आले आहे.