भारत जोडो यात्रेत सहभागी व्हा; काँग्रेसचे बुलढाणेकरांना आवाहन
– राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेनिमित्त घेतला पक्षांतर्गत आढावा
लोणार/सिंदखेडराजा (तालुका प्रतिनिधी) – काँग्रेसचे नेते खा. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा हा काही इव्हेंट नाही तर, मूव्हमेंट आहे. देशाची एकात्मता अबाधित राहण्यासाठी आज भारत जोडणे काळाची गरज आहे. बुलढाणेकर जनतेनेदेखील या भारत जोडो यात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले. पटोले यांनी बुलढाणा जिल्हा दौरा केला. तसेच, पक्षांतर्गत नियोजनाचा आढावा घेतला. त्यांच्या या दौर्याने जिल्हा काँग्रेसला ऊर्जितावस्था प्राप्त झाल्याचे दिसून आले.
आज (दि.4) सिंदखेडराजा येथे औरंगाबादवरून भारत जोडो यात्रेच्या नियोजनासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे आले होते. जिल्हा परिषद सदस्य मनोज कायंदे यांनी पूर्ण कार्यक्रमाचे आयोजन केले होते. अळणा फाट्यापासून ३०० मोटरसायकलींची रॅली काढण्यात आली होती. स्वतः नाना पटोले, माजी आमदार राहुल बोंद्रे, प्रदेश उपाध्यक्ष संजय राठोड, प्रदेश सरचिटणीस श्याम उमाळकर, मनोज कायंदे व इतर मान्यवर त्यावेळी सोबत होते. नाना पटोले यांनी स्वतः मोटारसायकल चालवली, त्यानंतर चिखली रोडवर हॉलमध्ये सिंदखेडराजा व देवळगावराजा तालुक्याचा कार्यक्रम व आढावा बैठक झाली. त्यामध्ये मनोज कायंदे, श्यामभाऊ उमाळकर, संजय राठोड व माजी आमदार जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांची समायोचित भाषणे झाली, व नाना पटोले यांनी पूर्ण भारत जोडो यात्रेचे उद्दिष्ट, त्याची कार्यप्रणाली आणि राहुल गांधी यांचा त्याग, याबाबत मार्गदर्शन करून विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. त्यानंतर चिखली येथे अनुराधा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये राहुल बोंद्रे यांनी कार्यक्रम आयोजित केले होते. यामध्ये चिखली तालुका, मेहकर तालुका, व लोणार तालुक्याची आढावा बैठक घेण्यात आली. त्या ठिकाणीदेखील राहुल बोन्द्रे यांनी प्रस्तावित केले, त्यानंतर प्रदेश उपाध्यक्ष संजय राठोड, श्याम उमाळकर यांची भाषणे झाली, आणि त्यानंतर नाना पटोले यांनी सखोल असे मार्गदर्शन केले. या बैठकीनंतर पत्रकार परिषद झाली.
सगळ्याना नाना पटोले यांनी पदयात्रेचे निमंत्रण दिले, व सहभागी होण्याचे आवाहनही केले. ही पदयात्रा देशासाठी ही इव्हेंट नसून मूव्हमेंट आहे, असे उद्गार त्यांनी काढले. याप्रसंगी जिल्ह्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यामध्ये जळगावहून आलेले श्री बंटी पाटील, मेहकर आणि लोणार तालुक्यातून आलेले सर्व नगरसेवक, पक्ष नेते एडवोकेट अनंतराव वानखेडे, देवानंद पवार राजूभाऊ मापारी, भूषण मापारी, कैलास सुभदाने, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक गजानन खरात सर, बादशाह खान, शहराध्यक्ष पंकज हजारी, माजी नगराध्यक्ष विलास चनखोरे, समद भाई शेख, तोफिक शेठ कुरेशी, शैलेश बावस्कर, राजेश अंभोरे, सौ.आरतीताई दीक्षित, युनुसभाई पटेल, नारायण पचेरवाल, नितीन तुपे, चिखली येथील समाधान सुपेकर, विष्णू पाटील, सोशल मीडियाचे जिल्हाध्यक्ष श्लोकांद डांगे व इतर मान्यवर उपस्थित होते. हॉल पूर्णपणे भरलेला होता, मेहकर, लोणार आणि चिखली तालुक्यातील महिला व नेते मंडळी उपस्थित होती, आणि आभारानंतर बैठक संपन्न झाली.
——————