सोलापुरात मंत्री तानाजी सावंत यांनी महिला राष्ट्रवादी काँग्रेस फोडली
– पंढरपूर येथे मंत्री तानाजी सावंत यांच्या नेतृत्वात पक्षप्रवेश सोहळा
सोलापूर (हेमंत चौधरी) – तिकडे शिर्डी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्यस्तरीय चिंतन अधिवेशन सुरु असताना, आणि राष्ट्रवादीचे नेते तथा विरोधी पक्षनेते अजित पवार हे राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार पडणार असल्याचे भाकित करत असताना, इकडे सोलापुरात मंत्री तानाजी सावंत यांनी महिला राष्ट्रवादी काँग्रेस फोडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्याध्यक्षा मनिषा नलावडे यांच्यासह इतर प्रमुख महिला नेत्यांनी आज पंढरपुरात मंत्री सावंत यांच्या नेतृत्वात बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात जाहीर प्रवेश केला आहे.
तीनच दिवसांपूर्वी महिला राष्ट्रवादी काँग्रेसने शेतकर्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी जोरदार आंदोलन केले होते. तर आजच शिर्डीत राष्ट्रवादीचे चिंतन शिबीर सुरु झालेले आहे. त्यातच आता सोलापूर महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षा मनिषा नलावडे, दक्षिण विधानसभा अध्यक्षा सुनंदा साळुंखे, युवती राष्ट्रवादीच्या अध्यक्षा अश्विनी भोसले, सेवा दलाच्या अध्यक्षा अनिता गवळी, शहर संघटक महंता आसादे, महिला आघाडीच्या सचिव राजश्री पवार, वार्ड अध्यक्षा भाग्यश्री भालेराव, राजश्री कोगणुर, अनिता गवळी यांच्यासह प्रमुख आघाडीच्या महिला नेत्यांसह महिला कार्यकर्त्या व पदाधिकारी यांनी बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात प्रवेश केला. शहर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आता प्रमुख नेत्याच न उरल्याने राष्ट्रवादीला सोलापुरात मोठे भगदाड पडले आहे. आगामी महापालिका निवडणुकीत पक्षाला त्याचा मोठा फटका बसणार असून, महापालिका ताब्यात घेण्याचे नियोजन करत असलेले मंत्री तानाजी सावंत यांच्या पक्षाला त्याचा मोठा राजकीय फायदा होणार आहे.
—————