चिखली (एकनाथ माळेकर) – सोयाबीन, कापसाला भाववाढ देण्यात यावी, आणि मागील व यावर्षीचादेखील पीकविमा शेतकर्यांना तातडीने देण्यात यावा, तसेच पीएम-किसान योजनेचा हप्ता तातडीने अदा करण्या यावा, यासह विविध मागण्यांसाठी ६ नोव्हेंबररोजी बुलढाण्यात सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकर्यांचा भव्य एल्गार मोर्चा आयोजित करण्यात आला असून, या मोर्चाचे नेतृत्व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर हे करणार आहेत. या मोर्चात राजकीय पक्षाचे झेंडे बाजूला सारून, शेतकरी म्हणून सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते विनायक सरनाईक यांनी केलेले आहे.
मागील वर्षी सोयाबीन व कापसाला भाव मिळण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्याचे नेते रविकांत तुपकर यांनी भव्य मोर्चा काढला होता. तसेच, अन्नत्याग आंदोलन, रास्ता रोको व विविध आंदोलनांच्या माध्यमातून शेतकर्यांच्या पदरी सोयाबीन-कापसाला चांगला भाव, त्याचप्रमाणे पीकविमा मिळवून दिला होता. त्याचप्रमाणे यावर्षीसुद्धा सोयाबीन-कापसाचे दर पडलेले असल्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडलेला आहे. सोयाबीनला साडेआठ हजार रुपये द्यावे, तसेच कापसालादेखील भाववाढ मिळावी, परतीचा पाऊस व अतिवृष्टीने सोयाबीन, कापूस व इतर खरिपांच्या पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे. या पिकांची नुकसान भरपाई द्यावी, मागील व यावर्षीचादेखील पीकविमा तातडीने देण्यात यावा, पीएम-किसान योजनेचा हप्ता तातडीने द्यावा, मागील वर्षीचे ८,६०० रुपये शेतकर्यांना देण्यात यावे, यासह विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढला जाणार असल्याचे विनायक सरनाईक यांनी सांगितले आहे.